यावेळेस काहीतरी वेगळे होणार, की इतिहासाची पुनरावृत्ती?

भूषण गोडबोले 
Monday, 27 July 2020

एकीकडे रिझर्व्ह बॅंकेने बुडीत कर्जाचे प्रमाण विक्रमी टप्प्यावर जाण्याची शक्‍यता असल्याची चिंता व्यक्त केली असतानाही, शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्‍स’ असो, की ‘निफ्टी’ मात्र साप्ताहिक तत्त्वावर वाढताना दिसत आहे. 

लॉकडाउन, बेरोजगारी, आर्थिक विकास दरातील घसरण आदी सर्व इकॉनॉमिक इंडिकेटर्स निगेटिव्ह असतानादेखील मार्चमध्ये घसरलेला शेअर बाजार पुन्हा जोरदार तेजी दर्शवत सावरला आहे. एकीकडे रिझर्व्ह बॅंकेने बुडीत कर्जाचे प्रमाण विक्रमी टप्प्यावर जाण्याची शक्‍यता असल्याची चिंता व्यक्त केली असतानाही, शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्‍स’ असो, की ‘निफ्टी’ मात्र साप्ताहिक तत्त्वावर वाढताना दिसत आहे. 

शेअर बाजार सावरताना दिसत आहे, तर सोने-चांदीचे भाव देखील वाढत आहेत. अशा वेळेस गुंतवणूकदारांनी काय करावे? शेअर बाजार सावरला असला तरी ‘व्हॅल्युएशन’चा विचार करता प्राईज अर्निंग (पीई) रेशोनुसार ‘निफ्टी’ २९ ला पोचला आहे. थोडक्‍यात, २९ रुपये देऊन त्याला १ रुपयाची मिळकत म्हणजेच केवळ ३ टक्‍क्‍यांच्या आसपास अर्निंग यिल्ड दाखवत आहे. बॅंकेतील ठेवीवर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा खूप कमी आहे. पीई रेशोनुसार भारतीय शेअर बाजार अत्यंत महाग आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इतिहास देतो सावधानतेचा इशारा
नोबेल पुरस्कारविजेते अमेरिकी अर्थतज्ज्ञ रॉबर्ट शीलर यांच्या अभ्यासानुसार असे लक्षात येते, की शेअर बाजार पीई रेशोनुसार महाग होतो, त्यावेळस शेअर बाजारातील धोका वाढतो. तसेच महाग व्हॅल्यूएशनला केलेल्या गुंतवणुकीवर आगामी कालावधीत मिळणारा परतावा तुलनेने कमी मिळतो. भारताचा विचार केल्यास हेच पाहण्यास मिळते. २०००, २००८, २०१९, २०२० या वर्षात प्रत्येक वेळेस शेअर बाजार पीई रेशोनुसार महाग झाल्यावर बाजारात पडझड झाली किंवा आगामी ३ ते ५ वर्षांत अल्प परतावा मिळाला. अशाप्रकारे इतिहास सावधनेतचा इशारा देत असला तरी प्रत्येक वेळेस सर्वसामान्य गुंतवणूकदार ‘फोमो’च्या (फियर ऑफ मिसिंग आऊट) तत्वानुसार, बाजार वाढल्यावर मीच या वाढीपासून वंचित राहत असल्याचा विचार करून शेअर महाग असताना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून अडकतो. ब्रिटिश गुंतवणूदार जॉन टेम्पल्टन म्हणतात, ‘शेअर बाजारात सर्वांत खतरनाक चार शब्द आहेत आणि ते म्हणजे ‘धिस टाईम इट्‌स डिफरंट’. (या वेळेस काहीतरी वेगळे होणार) पण अभ्यासाने हे लक्षात येते, की काहीतरी वेगळे होण्याच्या ऐवजी इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसते. 

वाढत्या भावाला हुरळून जाऊ नका!
इतिहास लक्षात घेऊन सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी सद्यःस्थितीत वाढते भाव बघून हुरळून जात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याऐवजी मर्यादित प्रमाणात ‘निफ्टी ५०’ तसेच ‘निफ्टी नेक्‍स्ट ५०’ इंडेक्‍स फंडात अथवा लाँग टर्मच्या दृष्टिकोनातून ‘ब्रिटानिया’सारख्या ‘एफएमसीजी’ क्षेत्रातील स्पर्धात्मक वैशिष्ट्य किंवा एकाधिकार ठेवून स्थिर स्वरूपातील वाढ दर्शविणाऱ्या; तसेच पडझडीतून लवकर सावरू शकणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मर्यादित गुंतवणूक करणे हिताचे ठरू शकेल. पोर्टफोलिओचा विचार करता, एकंदरीत १५ ते २० टक्के शेअर बाजार, १५ ते २० टक्के सोने-चांदी, तर ६० टक्के सुरक्षित ठेव योजना किंवा लिक्विड फंडात पैसे ठेवणे योग्य ठरू शकेल.

मर्यादित भांडवलावरच करा ‘ट्रेडिंग’
आयटी इंडेक्‍स १४ हजारांच्या वर आहे, तोपर्यंत या क्षेत्रातील कंपन्यांचा ‘ट्रेडिंग’साठी विचार करणे योग्य ठरू शकेल. इन्फोसिस, एल अँड टी इन्फोटेक, एचसीएल टेक आदी कंपन्यांचे शेअर आलेखानुसार तेजीचा कल दर्शवत आहेत. एचसीएल टेक या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी भाववाढ होणे अपेक्षित आहे. ५४४ या पातळीचा स्टॉपलॉस ठेवून या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचा व्यवहार करणे फायदेशीर ठरू शकेल. दीपक नायट्राईट या कंपनीच्या शेअरचा भाव देखील जोपर्यंत ५१० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत आलेखानुसार तेजीचा कल दर्शवत आहे. टेक्‍निकल ॲनालिसिसनुसार बाजार तेजीचा कल दर्शवत आहे. मात्र, फंडामेंटल ॲनालिसिसनुसार, बाजार २९ पीई रेशोला असल्याने अत्यंत महाग असल्याचे लक्षात येते. आजपर्यंत अनेक वेळा या ‘व्हॅल्यूएशन’वरून निर्देशांकाने घसरण दर्शविली आहे. याचा विचार करता, मर्यादित भांडवलावरच ‘ट्रेडिंग’ करणे; तसेच ‘स्टॉपलॉस’ तंत्राचा वापर करणे नेहमीप्रमाणेच अत्यंत आवश्‍यक आहे. 

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhushan godbole article share market sensex