'तेल' लावून या शेअर बाजारात!

'तेल' लावून या शेअर बाजारात!

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ४५,०७९ अंशांवर, तर निफ्टी १३,२५८ अंशांवर बंद झाला. आर्थिक विकासदरातील सुधारणा आणि जागतिक बाजारातील तेजीमुळे ‘सेन्सेक्स’ तसेच ‘निफ्टी’ने गेल्या आठवड्यात तेजी दर्शवीत नवा उच्चांक गाठला. मागील आठवड्यात व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेणाऱ्या रिझर्व्ह बँकेने देशाच्या आर्थिक विकासदराबाबत आशादायी अंदाज व्यक्त केला असला, तरी महागाईचे आव्हान कायम असल्याचे वक्तव्य केले आहे. 

‘मॅरिको’मध्ये तेजीचे संकेत
‘सेन्सेक्स’च्या आलेखानुसार ४३,४५२ ही आगामी कालावधीसाठी महत्त्वाची आधार पातळी आहे. आलेखानुसार मॅरिको, टायटन, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स आदी अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर तेजीचा आलेख दर्शवीत आहेत. मॅरिको या कंपनीच्या शेअरचा भाव रु. ३३३ या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत तेजीचा कल दर्शवीत आहे. मागील शुक्रवारी ‘मॅरिको’च्या शेअरने रु. ३९५ ला बंद भाव दिला आहे. आलेखानुसार आगामी काळात रु. ४०४ या पातळीच्या वर ‘मॅरिको’च्या शेअरने बंद भाव दिल्यास मध्यम अवधीमध्ये या शेअरमध्ये आणखी भाववाढ होणे अपेक्षित आहे. मॅरिकोचे पॅराशूट ऑइल हे अत्यंत लोकप्रिय आहे. सफोला कूकिंग ऑइल, सफोला ओट्स, लिवोन हेयर टॉनिक, मेडिकेअर (शॅम्पू), सेट वेट(जेल), निहार नॅचरल आदी अनेक नामवंत उत्पादने मॅरिको कंपनीची आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

२५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा
भारतात कोकोनट हेयर ऑइल विक्रीमध्ये कंपनीचा मार्केट शेअर सर्वाधिक आहे. मॅरिको ही फूड सेगमेंट म्हणजेच खाद्य प्रभागातदेखील सफोला हनी (मध), सफोला मिल मेकर, सोया चंक आदींची निर्मिती करीत व्यवसायवृद्धी करीत आहे. भारतातील व्यवसायाबरोबर ‘मॅरिको’ने बांगलादेश, इजिप्त, मलेशिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांत देखील व्यवसायाचा विस्तार केला आहे. फंडामेंटल्सचा विचार करता, कंपनी २५ टक्क्यांपेक्षा जास्त ‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टेड कॅपिटल’ म्हणजेच भांडवलावर उत्तम परतावा मिळवत आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दीर्घकाळासाठी टप्प्याटप्प्याने खरेदी
भांडवल आणि कर्ज यांचा विचार करता कंपनीचे भांडवलाचे प्रमाण जास्त आहे. आगामी काळात उत्पादनांच्या विक्रीपाठोपाठ नफा वाढविण्याचे कंपनीपुढे आव्हान व उद्दिष्ट आहे. कंपनीच्या एकूण व्यवसायप्रणालीचा विचार करता दीर्घ अवधीसाठी मॅरिकोच्या शेअरसाठी मर्यादित भांडवल राखीव ठेवून टप्प्याटप्प्याने खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. एकूण शेअर बाजाराचे ‘व्हॅल्युएशन’ महाग असल्याने टप्प्याटप्प्यानेच खरेदीचे धोरण ठेवणे योग्य ठरू शकेल.

वरील लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com