शेअर मार्केट : स्टॉक मार्केट, की मार्केट ऑफ स्टॉक

गेल्या दोन महिन्यांचा विचार करता एकूण शेअर बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे ‘सेन्सेक्स’ तसेच ‘निफ्टी’ हे निर्देशांक मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार करताना दिसत आहेत.
Stock Market
Stock MarketSakal

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५२,५८६ अंशांवर,तर ‘निफ्टी’ १५,७६३ अंशांवर बंद झाला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोळसा, नैसर्गिक वायू, इंधन शुद्धीकरण उत्पादने, स्टील, सिमेंट, वीजनिर्मिती आदी प्रमुख आठ क्षेत्रांमध्ये वार्षिक तुलनेत मागणी वाढली आहे. वार्षिक तत्वावर यंदाच्या जूनमध्ये प्रमुख क्षेत्रातील वाढ सकारात्मक असली तरी मासिक तत्वावर ती निराशाजनक असल्याचे लक्षात येत आहे. येत्या आठवड्यात एचडीएफसी लि., स्टेट बँक, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन, सिप्ला आदी अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होतील. त्याकडे बाजाराचे लक्ष असेल.

गेल्या दोन महिन्यांचा विचार करता एकूण शेअर बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे ‘सेन्सेक्स’ तसेच ‘निफ्टी’ हे निर्देशांक मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार करताना दिसत आहेत. मात्र, याच कालावधीत कोफोर्ज, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, एम्फसिस, गुजरात गॅस लि., जुबिलंट फूडस आदी अनेक कंपन्यांच्या शेअरनी उत्तम भाववाढ दर्शविली आहे. जून ते जुलै याच काळातील ‘आयपीओं’चा विचार करता, झोमॅटो, तत्व चिंतन फार्मा केमिकल, क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी आदी अनेक कंपन्यांच्या शेअरचे नोंदणीच्याच दिवशी ५० टक्क्यांपेक्षा अधिक भाववाढीसह बाजाराने स्वागत केले. एकंदरीत, निर्देशांकाचा विचार करता, गेल्या दोन महिन्यांत बाजारात विशेष हालचाल नाही.

मात्र, विविध कंपन्यांतील शेअरमधील हालचालींचा विचार करता, शेअर मार्केट हे ‘मार्केट ऑफ स्टॉक्स’ झाल्याचे दिसत आहे. आगामी काळासाठी १५,४५० अंश ही ‘निफ्टी’साठी महत्त्वाची आधार पातळी आहे. बाजारात जेव्हा मोठ्या प्रमाणात पडझड होते, तेव्हा मात्र ‘मार्केट ऑफ स्टॉक्स’ न राहता निर्देशांकातील घसरणीबरोबर एकंदरीत शेअर बाजारातच घसरण झाल्याचा इतिहास असल्याने ‘मार्केट ऑफ स्टॉक्स’ असताना देखील निर्देशांकाकडे काणाडोळा न करता, ‘ट्रेडिंग’ करताना सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल.

रूपा अँड कंपनीकडे लक्ष

रूपा अँड कंपनी ही होजिअरीसह विणलेल्या कपड्यांच्या निर्मितीमध्ये कार्यरत आहे. रुपा-फ्रंटलाइन, जॉन, एअर, मॅक्रोमॅन, युरो, बमचम्स, टॉरिडो, थर्मोकॉट, किडलाइन, फूटलाइन, सॉफ्टलाइन आदी नामवंत ब्रॅंड्सची उत्पादने आणि विक्री कंपनीमार्फत केली जाते. आलेखानुसार या कंपनीच्या शेअरने दोन जून २०२१ पासून रु. ५१९ ते ४३५ या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविला आहे. २७ जुलैपासून या कंपनीच्या शेअरमधील उलाढालीत लक्षणीय वाढ झाल्याचे लक्षात येत आहे. गेल्या शुक्रवारी चार टक्के वाढीसह रु. ५१९ ला बंद भाव देत हा शेअर तेजीचा कल दर्शवत आहे. आलेखानुसार येत्या आठवड्यात या कंपनीच्या शेअरने रु. ५१९ या भावपातळीला ओलांडून तेजीचा कल दर्शविल्यास जो पर्यंत भाव रु. ४३४ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये आणखी भाववाढ होऊ शकते. यामुळे आगामी काळात शॉर्ट टर्म ट्रेडिंग; तसेच मध्यम अवधीच्या गुंतवणुकीसाठी रूपा अँड कंपनीच्या शेअरकडे लक्ष ठेवणे फायदेशीर ठरू शकेल.

‘दीपक नायट्राइट’मध्ये तेजीचा कल

दीपक नायट्राइट ही एक भारतीय रसायन उत्पादक कंपनी आहे. सोडियम नायट्रेट, ऑप्टिकल ब्राइटनिंग एजंट आदी केमिकलच्या विक्रीत कंपनीचा बाजारपेठेत लक्षणीय हिस्सा आहे. सहा मे २०२१ पासून रु. १८९९ ते १७१० या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात शुक्रवारी एकाच दिवशी सात टक्के भाववाढ करीत या कंपनीच्या शेअरने रु. २०३९ ला बंद भाव देऊन मध्यम अवधीच्या आलेखानुसार तेजीचे संकेत दिले आहेत. जोपर्यंत भाव रु. १७०९ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत आगामी काळात या कंपनीच्या शेअरचा भाव चढ-उतार करीत आणखी वधारणे अपेक्षित आहे.

एखाद्या क्षेत्रात तेजीची लाट असताना शेअरचे भाव गगनाला भिडणार असल्यासारखे वाढत असतात; नव्हे तर उडत असल्यासारखे दिसतात. मात्र, तेजीची लाट ओसरली, की या शेअरचे विमान कोसळून जमिनीवर आपटल्याचा आपला बाजार साक्षीदार आहे. कधी ‘डॉट-कॉम बबल’, तर कधी ‘पॉवर, इन्फ्रा रॅली’ असे अनेक प्रकारचे बुडबुडे बाजाराने पाहिले आहेत. यामुळे बाजारात तेजीच्या काळात तेजीतील शेअरची निवड केली तरी देखील मर्यादित भांडलावर मर्यादितच धोका स्वीकारून शॉर्ट टर्म आणि मध्यम अवधीसाठी ट्रेडिंग करताना आवश्यकतेनुसार ‘स्टॉपलॉस’चा वापर करणे हितावह ठरू शकेल.

लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com