esakal | सोन्याबरोबरच आता चांदीचीही ‘चांदी’! 
sakal

बोलून बातमी शोधा

gold

शेअर बाजार वधारून महाग झाला आहे.तर सोन्यानेदेखील तेजीची झळाळी दर्शविली आहे आता चांदी वधारण्याची शक्यता आहे.गोल्ड-सिल्वर रेशो तपासून पाहता सोन्याच्या भाववाढी पाठोपाठ चांदीत भाववाढ होण्याची शक्यता आहे.

सोन्याबरोबरच आता चांदीचीही ‘चांदी’! 

sakal_logo
By
भूषण गोडबोले

गेल्या  वर्षभरात सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यावर आता सर्वत्र सोन्याबद्दल चर्चा होताना दिसत आहे. सोन्याचा भाव २०१३ पासून तब्बल ६ वर्ष २५००० ते ३५००० या पातळ्यांमध्येच फिरत होता म्हणजेच २०१३ पासून जुलै २०१९ पर्यंत सोन्यात केलेल्या गुंतवणुकीवर विशेष परतावा मिळत नव्हता. जुलै २०१३ ते जुलै २०१९ याच काळात सेन्सेक्सने म्हणजेच भारतीय शेअर बाजाराने २०००० ते ४०००० पर्यंत अशी दुप्पट वाढ दर्शविली. ज्यावेळस सोन्याने ३५०००चा टप्पा ओलांडला तेव्हा गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष कमी होते. कारण त्याआधी मागील सहा वर्षात सोन्यात केलेल्या गुंतवणुकीवर विशेष परतावा मिळाला नव्हता. तसेच सोन्याने ३५००० हजारांचा टप्पा ओलांडल्यावर सामान्य गुंतवणूकदारांच्या मते ६ वर्षाच्या तुलनेत सोने खूप महाग झाले होते. यांनतर म्हणजेच जुलै २०१९ नंतर शेअर बाजाराने विशेष परतावा दिला नाही आणि ३५०००ला असणारे सोने ५००००ला गवसणी घालत आहे. स्वित्झर्लंड येथील प्रसिद्ध गुंतवणूकदार मार्क फेबर म्हणतात, ‘व्हॅल्युएशनने खूप महाग झालेल्या असेट क्लास किंवा मालमत्तेध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा मला ज्या असेट क्लास किंवा मालमत्तेत बराच काळ वाढ झालेली नाही मात्र भविष्यात वाढ होण्याची क्षमता आहे, अशा ठिकाणी गुंतवणूक करणे पसंत आहे. कारण त्या ठिकाणी खूप मोठा परतावा मिळू शकतो.’ या गुंतवणुकीच्या पद्धतीला ‘कॉँट्ररीयन अप्रोच’ म्हणतात. २००८मध्ये भारतीय शेअर बाजारातील निफ्टी ६३०० वर गेली होती. प्राईज अर्निंग रेशो व्हॅल्युएशननुसार त्यावेळस निफ्टी २८ अंकाला होती, म्हणजेच खूप महाग झाला होता. यानंतर बाजारात पडझड झाली आणि ऑक्टोबर २०१०मध्ये पुन्हा निफ्टी ६२८० झाला. त्यावेळसदेखील पीईनुसार शेअर बाजार पुन्हा एकदा २५पेक्षा जास्त झाल्याने महाग झाल्याचे संकेत देत होता. अशा वेळेस चांदीने ३००००ची पातळी ओलांडून पुढील ९ महिन्यात ३०००० ते ७०००० पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढ दर्शविली. शेअर बाजारातील कंपन्यांच्या बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस, कॅश-फ्लो स्टेटमेंट आदी वरून व्हॅल्यूशन समजू शकते. मात्र सोन्या-चांदीचे शेअर बाजारातील कंपन्यांसारख्या बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स नसतात. त्यामुळे याची तुलना इतर असेट क्लासमधील व्हॅल्यूशनशी त्याचप्रमाणे चालू महागाई दराचा अभ्यास करून तसेच सोन्या चांदीतील मागणी-पुरवठ्याच्या तक्त्यानुसार विचार करून गुंतवणुकीचा निर्णय घेता येऊ शकतो. सद्यःस्थितीमध्ये शेअर बाजाराचे पीई मूल्यांकन महाग झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तब्बल ९ वर्षानंतर चांदी तेजीत 
अशावेळेस चांदीचा विचार करता २०११पासून २०१६पर्यंत पडझड दर्शविल्यानंतर चांदीने २०१६ ते २०२० याकाळात ३२६२६ ते ५०६७२ या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ उतार दर्शविली आहे. तसे पाहता २०११ पासून मागील ९ वर्षे चांदीने वाढ दर्शविली नाही. मात्र जुलै २०२०मध्ये चांदीने ५००००च्या वर भाव देत मर्यादित पातळ्यांमध्येच अडकलेल्या अवस्थेमधून बाहेर पडल्याचे संकेत दिले आहेत. शेअर बाजार महाग असताना अशा पद्धतीने चांदीने तेजीचे संकेत दिल्याने तसेच तब्बल ९ वर्षे डिप्रेसड असेट क्लास म्हणजेच बराच काळ परतावा न दिलेली मालमत्ता म्हणून निदर्शन केल्याने आगामी काळात २ ते ५ वर्षात चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात म्हणजेच ७०००० हजार ते १लाख पर्यंत भाव वाढण्याची शक्यता आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता वेळ चांदी वधारण्याची 
शेअर बाजार वधारून महाग झाला आहे. तर सोन्यानेदेखील तेजीची झळाळी दर्शविली आहे आता चांदी वधारण्याची शक्यता आहे. गोल्ड-सिल्वर रेशो तपासून पाहता सोन्याच्या भाववाढी पाठोपाठ चांदीत भाववाढ होण्याची शक्यता आहे. मात्र डॉलरमध्ये विचार करता २०१६पासून चांदीचे भाव ११ ते २१ डॉलर प्रति. औन्स या पट्यातच फिरत आहेत. या पट्ट्यातून चांदीने बाहेर पडल्याचे संकेत दिल्यास आंतरराष्ट्रीय बाजारातूनदेखील चांदीसाठी तेजीचे संकेत मिळतील. 

चांदीत गुंतवणूक करताना या बाबी तपासा 
वरील सर्व बाबींचा विचार करता मर्यादित धोका स्वीकारून २ ते ५ वर्षासाठी चांदीत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. चांदी हा  एक मौल्यवान धातू आहे, तसेच चांदीचा वापर औद्योगिक क्षेत्रातदेखील केला जातो. भारतामध्ये चांदी एक्सचेंजवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात घेण्याची सोय नसल्याने फिजिकल स्वरूपात चांदी घेताना शुद्धता, व्यवहारातील पारदर्शकता, ज्वेलरने पुन्हा आपल्याकडून खरेदी करण्याची हमी, घडणावळ,जी. एस. टी., तसेच भाववाढीवर विक्री पश्चात लागणारा कर आदी बाबींचा विचार करून तसेच चांदीचे भाव अत्यंत चंचल असल्याने जोखीम ओळखूनच चांदीत परवडेल, असा धोका स्वीकारून गुंतवणूक करणे योग्य ठरेल. 
(सेबी रजिस्टर्ड गुतंवतणूक सल्लागार) 

(Edited by: Kalyan Bhalerao)