शेअर मार्केट : मर्यादित भांडवलात खेळा!

share market
share market

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५०,८८९ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १४,९८१ अंशांवर बंद झाला. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यापासून १५ फेब्रुवारीपर्यंत तेजीचे निशाण फडकविल्यानंतर, निर्देशांकाने गेल्या आठवड्यात सलग चार दिवस घसरण दर्शवीत ‘करेक्शन’ किंवा विश्राम घेतला आहे. आगामी कालावधीसाठी १३,५९६ ही ‘निफ्टी’साठी महत्त्वाची आधार पातळी आहे. शेअर बाजारापाठोपाठ गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावातदेखील घसरण झाली. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्याने परत ‘लॉकडाउन’ जाहीर होणार का, अशा चर्चांना जोर आला आहे.

‘सीडीएसएल’वर लक्ष
आलेखानुसार, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि. (सीडीएसएल) तसेच ‘ज्युबिलंट फूड वर्क्स’ या कंपन्यांचे शेअर तेजीचा कल दाखवीत आहेत. ‘सीडीएसएल’ भारतात सिक्युरिटीज डिपॉझिटरी म्हणून कार्यरत आहे. ही कंपनी डिपॉझिटरी सहभागी आणि इतर भांडवली बाजार मध्यस्थ, कॉर्पोरेट्स, विमा कंपन्या आणि इतर अनेक ग्राहकांसाठी सेवा देते. डिसेंबर २०२० पासून या कंपनीच्या शेअरने रु. ५६६ ते रु. ४७५ या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविल्यानंतर गेल्या आठवड्यात रु. ५६६ या पातळीच्या वर रु. ५७१ ला बंद भाव देत आलेखानुसार मध्यम अवधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. या कंपनीच्या शेअरचा भाव रु. ४७५ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये आणखी वर जाऊ शकतो.

‘ज्युबिलंट फूड’मध्ये तेजी
‘जुबिलंट फूड वर्क्स’ ही कंपनी भारतामध्ये डॉमिनोज पिझ्झा, डंकिन डोनट्स या नामवंत फास्ट फूड चेन्स चालवते. गेल्या आठवड्यात या कंपनीच्या शेअरने रु. २९५१ ला बंद भाव दिला आहे. या कंपनीच्या शेअरचा भाव रु. २५४३ च्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीच्या आलेखानुसार तेजीचा कल दर्शवीत आहे. आगामी काळात रु. २९८८ या पातळीच्या वर या कंपनीच्या शेअरने बंद भाव दिल्यास मध्यम अवधीमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात भाववाढ होऊ शकते.

‘ब्रिटानिया’मध्ये दीर्घावधीसाठी संधी
आलेखानुसार तेजीचे संकेत देणाऱ्या शेअरमध्ये मर्यादित धोका स्वीकारून तेजीचा व्यवहार करणे फायदेशीर ठरू शकते. दीर्घावधीसाठी पोर्टफोलिओमध्ये बॅंक बीज, गोल्ड बीज; तसेच ब्रिटानिया इंडस्ट्रीज यांमध्ये मर्यादित भांडवल गुंतविणे फायदेशीर ठरू शकेल. ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’च्या शेअरचा भाव गेल्या आठवड्यात घसरून रु. ३३३१ झाला आहे. उत्तम ‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टेड कॅपिटल’ मिळवत दीर्घावधीमध्ये व्यवसायवृद्धी केलेल्या, तसेच शेअरधारकांना देखील उत्तम परतावा दिलेल्या या शेअरमध्ये खरेदीची संधी घेणे लाभदायक ठरू शकेल.

वरील लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. त्यामळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच 
आवश्यक आहे.
(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com