नावात काय आहे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhushan Godbole writes lic enter in share market with downfall message for investors

‘नावात काय आहे? ज्याला आपण गुलाब म्हणतो, त्याला इतर कोणत्याही नावाने ओळखले, तरी त्याचा वास तितकाच गोड असेल,’ असे विल्यम शेक्सपियरने म्हटले आहे.

नावात काय आहे?

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५४,३२६ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १६,२६६ अंशांवर बंद झाले. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी गेल्या आठवड्यात चीनने व्याजदरात कपात केली. चीनने व्याजदरात कपात केल्याने आशियाई बाजारातील निर्देशांकांनी उसळी घेतली. आशियाई बाजारातील तेजीचे पडसाद भारतीय शेअर बाजारावर उमटताना दिसले. गेल्या शुक्रवारी ‘सेन्सेक्स’ने एकाच दिवसात १५३४ अंशांची, तर ‘निफ्टी’ने ४५६ अंशांची तेजी दर्शविली. आगामी कालावधीसाठी आलेखानुसार ‘सेन्सेक्स’ची ५२,२६० तसेच ‘निफ्टी’ची १५,६७१ अंश ही महत्त्वाची आधार पातळी आहे.

भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात बहुचर्चित भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शेअरचे गाजावाजा करत आगमन झाले. मात्र, आगमन झाल्यानंतर शेअरने घसरण दर्शविली. कोणत्याही कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करताना, फक्त अल्पावधीमध्ये होणाऱ्या बाजारातील हालचालींकडे लक्ष ठेऊन गुंतवणूक करण्याऐवजी कंपनीच्या प्रगतीचा वेध घेऊन दीर्घावधीसाठी गुंतवणूक करण्याचे धोरण स्वीकारणे हितावह ठरते. दीर्घावधीतील कंपनीची व्यवसायवृद्धीची क्षमता आणि शक्यता लक्षात घेऊन आणि ‘व्हॅल्युएशन’चा विचार करून योग्य ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’सह गुंतवणूक केल्यास उत्तम परतावा मिळू शकतो. अल्पावधीमध्ये बाजारात मंदीचे वातावरण असताना, ‘फंडामेंटल्स’नुसार सक्षम कंपन्यांच्या शेअरचे भावदेखील घसरताना दिसतात. मात्र, अशा वेळेस दीर्घावधीतील प्रगतीच्या दृष्टीने वाढीची शक्यता लक्षात घेऊन धीर धरणे योग्य ठरू शकते. ‘नो पेन्स, नो गेन्स’ हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

विनती ऑरगॅनिक्स (शुक्रवारचा बंद भाव रु. २१११)

केमिकल क्षेत्रातील विनती ऑरगॅनिक्स ही कंपनी ‘व्हॅल्युएशन’नुसार गुंतवणूकयोग्यता दर्शवत आहे. ही कंपनी विशेष ऑर्गेनिक इंटरमीडिएट्स आणि मोनोमर्सच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहे. आयसोब्युटाईल बेंझिन आणि २-ॲक्रिलामिडो २- मिथाइल प्रोपेन सल्फॉनिक ॲसिड या रसायनांची जगातील ही सर्वांत मोठी उत्पादक कंपनी आहे. त्यांचा वापर जलप्रक्रिया, शेल गॅस रिकव्हरी, ऑइल रिकव्हरी, पेंट्स, खोल तेल आणि वायू विहिरी आदींमध्ये वापरले जाणारे पॉलिमर बनविण्यासाठी केला जातो. आयसोब्युटाईल बेंझिनचा वापर औषध क्षेत्रात होतो. महाड आणि लोटे येथे कंपनीच्या दोन उत्पादन सुविधा आहेत. कंपनी कॉस्ट प्लस मॉडेलवर काम करते; तसेच कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ अंतिम ग्राहकांपर्यंत पोचवू शकते. आगामी काळात ब्युटाईल फिनॉईलच्या उत्पादनामुळे कंपनीच्या एकूण महसुलात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने आगामी दोन वर्षांत प्रत्येकी २५ ते ३० टक्के विक्रीवाढीचे सूतोवाच केले आहे. जाहीर झालेल्या निकालानुसार, ही कंपनी विक्री तसेच नफ्यामध्ये उत्तम वाढ दर्शवत आहे. ही कंपनी जवळजवळ कर्जमुक्त आहे. या कंपनीने सरासरी २३ टक्क्यांपेक्षा जास्त ‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टेड कॅपिटल’ मिळवून व्यवसायात चांगली प्रगती केली आहे.

‘नावात काय आहे? ज्याला आपण गुलाब म्हणतो, त्याला इतर कोणत्याही नावाने ओळखले, तरी त्याचा वास तितकाच गोड असेल,’ असे विल्यम शेक्सपियरने म्हटले आहे. मात्र, गुंतवणूकगुरु पीटर लिंच म्हणतात, सर्वसामान्य गुंतवणूकदार शक्यतो केमिकलनिर्मिती यासारख्या अत्यंत उदासीन वाटणाऱ्या क्षेत्राकडे; तसेच अपरिचित नाव असलेल्या कंपनीकडे लक्ष देणे टाळतात. पीटर लिंच यांच्या सूत्रानुसार, दाम दसपट करू शकणाऱ्या किंवा दीर्घावधीमध्ये मोठ्या प्रमाणात परतावा देऊ शकणाऱ्या कंपनीचा शोध घेताना, उदास नाव; तसेच उदासीन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा ‘फंडामेंटल्स’नुसार अभ्यास करून संधी शोधणे फायदेशीर ठरू शकते. दीर्घावधीच्यादृष्टीने मर्यादित भांडवलावर जोखीम लक्षात घेऊन विनती ऑरगॅनिक्स या कंपनीच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे लाभदायक ठरू शकते.

या लेखातील माहिती शैक्षणिक दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Web Title: Bhushan Godbole Writes Lic Enter In Share Market With Downfall Message For Investors

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top