Share Market : ‘सं’... संकटाचा, का संधीचा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market
शेअर मार्केट : ‘सं’... संकटाचा, का संधीचा?

शेअर मार्केट : ‘सं’... संकटाचा, का संधीचा?

sakal_logo
By
भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५९,६३६ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १७,७६४ अंशांवर बंद झाला. वाढता महागाई दर, नकारात्मक आंतरराष्टीय संकेत, सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यामध्ये कमतरता निर्माण झाल्याने वाहननिर्मिती क्षेत्रावरील दबाव, ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’ या कंपनीच्या शेअरचे निराशाजनक ‘लिस्टिंग’ आदी अनेक कारणांमुळे गेल्या आठवड्यात दोन्ही निर्देशांकांनी सलग चार दिवस घसरण नोंदविली. आलेखानुसार या आठवड्यासाठी ‘सेन्सेक्स’ची ५९,०८९ ही महत्त्वाची आधार पातळी आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’ ने ५२६ अंशांची घसरण करून ३५,६०१ अंशांवर बंद भाव दिल्याने या आठवड्याच्या प्रारंभीदेखील आंतरराष्टीय बाजारातून नकारात्मक संकेत मिळू शकतात.

कोणत्या शेअरचा विचार करावा?

यशस्वी गुंतवणूक गुरु वॉरेन बफे म्हणतात, उत्तम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांसाठी जेव्हा परिस्थितीमुळे एखादे मोठे; मात्र तात्पुरते संकट निर्माण होते, जे संकट दीर्घावधीमध्ये दूर होणार असते, अशा वेळेस या कंपन्यांच्या शेअरमध्ये होणारी पडझड ही गुंतवणुकीसाठी उत्तम संधी असू शकते. गेल्या वर्षी २८ सप्टेंबर २०२० रोजी अशाच प्रकारे कोरोना महासाथीमुळे तात्पुरत्या संकटात सापडलेल्या ट्रॅव्हल-टुरिझम क्षेत्राशी निगडित इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम (आयआरसीटीसी) या कंपनीच्या शेअरबद्दल सुचविले होते. त्यानंतर वर्षभरात या कंपनीच्या शेअरने चौपट वाढ दर्शविली. सध्या सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यामध्ये कमतरता निर्माण झाल्याने वाहननिर्मिती क्षेत्राशी निगडित कंपन्यांच्या उत्पादन; तसेच विक्रीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यातील व्यत्ययामुळे निर्माण झालेले तात्पुरते संकट दीर्घावधीमध्ये दूर होणे अपेक्षित असल्याने या क्षेत्राशी निगडित फंडामेंटली सक्षम कंपन्यांच्या शेअरमध्ये दीर्घावधीसाठी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. आयशर मोटर्स (भाव रु. २६०३), सुप्रजित इंजिनिअरिंग (भाव रु. ४४८), एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज (भाव रु. १७५१) आदी वाहननिर्मिती क्षेत्राशी निगडित कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी जोखीम लक्षात घेऊन दीर्घावधीसाठी टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याचा जरूर विचार करावा.

‘सं’पासून संकट... की संधी?

शेअर बाजारात पडझड होत असेल तर व्यवसायातून उत्तम परतावा मिळवत भांडवलाच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण कमी ठेऊन प्रगती करणाऱ्या फंडामेंटली सक्षम कंपन्यांच्या शेअरमधील पडझड म्हणजे गुंतवणुकीसाठी उत्तम संधीच असते. दीर्घावधीमध्ये कंपनीच्या मिळकतीमधील होणाऱ्या वाढीच्या तुलनेत जर सध्या शेअरचा भाव स्वस्त झाला असेल, तर अशा सक्षम कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. फंडामेंटली सक्षम कंपन्यांसाठी, तात्पुरते संकट म्हणजे दीर्घावधीच्या गुंतवणुकीची उत्तम संधी असू शकते. यामुळे ‘सं’पासून संकट, की संधी याचा गुंतवणूक करताना अवश्य विचार करावा.

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे .प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

loading image
go to top