शेअर मार्केट : हॅप्पी ट्रेडिंग... हॅप्पी इन्व्हेस्टिंग...

गेल्या आठवड्यात वर्षअखेरीस ‘सेन्सेक्स’ ५८,२५३ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १७,३५४ अंशांवर बंद झाला. सरत्या वर्षाचा शेवट गोड करीत ‘सेन्सेक्स’ने ४५९ अंशांची, तर ‘निफ्टी’ने १५० अंशांची तेजी दर्शविली.
Share Market
Share MarketSakal
Summary

गेल्या आठवड्यात वर्षअखेरीस ‘सेन्सेक्स’ ५८,२५३ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १७,३५४ अंशांवर बंद झाला. सरत्या वर्षाचा शेवट गोड करीत ‘सेन्सेक्स’ने ४५९ अंशांची, तर ‘निफ्टी’ने १५० अंशांची तेजी दर्शविली.

गेल्या आठवड्यात वर्षअखेरीस ‘सेन्सेक्स’ ५८,२५३ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १७,३५४ अंशांवर बंद झाला. सरत्या वर्षाचा शेवट गोड करीत ‘सेन्सेक्स’ने ४५९ अंशांची, तर ‘निफ्टी’ने १५० अंशांची तेजी दर्शविली. आगामी कालावधीसाठी ‘सेन्सेक्स’ची ५५,१३२ ही महत्त्वाची आधार पातळी आहे. गेल्या वर्षात अदानी समूहातील अदानी टोटल गॅस, अदानी एंटरप्रायझेस, अदानी ट्रान्समिशन; तसेच टाटा समूहातील टाटा इलेक्सी, टाटा पॉवर, टाटा स्टील, टाटा मोटर्स; त्याचप्रमाणे एल अँड टी इन्फोटेक, आयआरसीटीसी, कोफोर्ज, टेक महिंद्र आदी अनेक कंपन्यांच्या शेअरनी मोठ्या प्रमाणात वाढ नोंदविली. अल्पावधीमध्ये बाजारातील हालचाली या भावनाप्रधान असतात; मात्र दीर्घावधीमध्ये बाजार हा कंपनीच्या प्रगतीचा वेध घेत असतो, हे गुंतवणूकदारांनी लक्षात घेणे आवश्यक असते.

दीर्घावधीमधील व्यवसायवृद्धीची क्षमता लक्षात घेता, २०२२ या नववर्षाच्या प्रारंभी कोणत्या कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने खरेदीचा विचार करावा; तसेच मध्यम अवधीसाठी ‘ट्रेडिंग’च्या दृष्टीने आलेखानुसार कोणत्या कंपन्यांचा विचार करणे योग्य ठरू शकेल, हे पाहू.

ज्युबिलंट फूडवर्क्सकडे लक्ष हवे!

ज्युबिलंट फूडवर्क्स लि. ही ज्युबिलंट भारतिया समूहाचा भाग आहे; तसेच ही भारतातील एक मोठी खाद्यसेवा कंपनी आहे. ही कंपनी भारतात डॉमिनोज पिझ्झा, डंकिन डोनट्स या नामवंत फास्ट फूड चेन्स चालवते. ही कंपनी डॉमिनोज, डंकिन डोनट्सच्या बरोबरीने हॉन्ग्स किचन, एकदम बिर्याणी अशा मल्टी-ब्रँड जलद सेवा रेस्टॉरंट व्यवसायात चांगली प्रगती करीत आहे. कंपनीला लागणारा कच्चा माल महाग झाला असला तरी उत्पादकता आणि किंमतवाढ करून कंपनी भांडवलावर उत्तम नफा मिळवत आहे. कंपनीकडे भारत आणि इतर जवळपासच्या देशांमध्ये जलद सेवा रेस्टॉरंटचे मोठे नेटवर्क आहे. आगामी काळात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढल्यास, निर्बंधांमुळे या कंपनीच्या व्यवसायावर अल्पावधीसाठी नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे या कंपनीच्या शेअरभावात घसरण झाल्यास दीर्घावधीसाठी गुंतवणुकीची संधी मिळू शकेल. प्राईस अर्निंग (पीई) रेशो असो, की प्राईस टू बूक व्हॅल्यू (पीबीव्ही) रेशो, या कंपनीचा शेअर सध्या खूप महाग असल्याचे प्रतीत होत आहे. मात्र, या कंपनीच्या व्यवसायवृद्धीची क्षमता लक्षात घेता, या शेअरमध्ये दीर्घावधीच्यादृष्टीने टप्प्याटप्प्याने खरेदी करणे फायदेशीर ठरू शकेल.

इक्लर एक्स सर्व्हिसेसमध्ये तेजी हा कल

इक्लर एक्स सर्व्हिसेस लि. ही जागतिक फॉर्च्यून ५०० कंपन्यांना महत्त्वपूर्ण सेवा प्रदान करते. या ५०० कंपन्यांमध्ये वित्तीय सेवा, केबल आणि दूरसंचार, रिटेल, फॅशन, मीडिया आणि मनोरंजन, उत्पादन, प्रवास या क्षेत्रातील अनेक आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांसाठी इक्लर एक्स सर्व्हिसेस ही कंपनी नावीन्यपूर्ण व्यवसायप्रक्रिया व्यवस्थापन, बदल व्यवस्थापन, डेटाड्रिव्हन सूचना, प्रगत विश्लेषणे आणि स्मार्ट ऑटोमेशन आदी सेवा प्रदान करते.

या कंपनीच्या शेअरने गेल्या शुक्रवारी एकूण उलाढालीत लक्षणीय वाढ दर्शवत एकाच दिवसात सात टक्के वाढीसह रु. २६१२ ला बंद भाव दिला. मध्यम अवधीच्या आलेखानुसार, जोपर्यंत या शेअरचा भाव रु. १७५४ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत तेजीचा कल दर्शवत आहे. आगामी काळात रु. २६३९ या पातळीच्या वर गेल्यास आणखी मोठ्या प्रमाणात भाववाढ होऊ शकते. यामुळे आगामी काळात बाजाराने; तसेच या शेअरने तेजीची वाटचाल दर्शविल्यास मध्यम अवधीसाठी ‘ट्रेडिंग’च्यादृष्टीने आधार पातळीचा ‘ट्रेलिंग स्टॉपलॉस’ लक्षात घेऊन या शेअरमध्ये खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, ‘ट्रेडिंग’ करताना अंदाज चुकल्यास, आधी नमूद केल्यानुसार ‘स्टॉपलॉस’चा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे २०२२ मध्ये प्रवेश करताना, ‘हॅपी न्यू इयर’सोबतच सर्व गुंतवणूकदारांना ‘हॅप्पी ट्रेडिंग, हॅप्पी इन्व्हेस्टिंग’!

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com