शेअरबाजार पुन्हा नवा उच्चांक गाठेल,फक्त हवा विश्वास, संयम आणि शिस्त!

भूषण महाजन
Monday, 11 May 2020

आज खाली आलेला शेअरबाजार वर जाणारच आहे.कधी ते मात्र सांगता येणार नाही.जीवनशैली बदलेल,नव्या संधी चालून येतील,शेअरबाजार पुन्हा नवा उच्चांक गाठेल,फक्त हवा विश्वास, संयम आणि शिस्त!

आपण इतिहासातून काय शिकतो ? काहीही नाही ! कारण परमेश्वराने आपल्याला विस्मृतीची मोठी देणगी दिली आहे.  आता हेच बघा, ताज्या बातम्या आपली झोप उडवतात.  पण, वर्षभरापूर्वी घडलेले फारसे आठवत नाही, मग दहा वर्षापूर्वीचे? नाही आठवणार ना...!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

1- नव्वदीच्या दशकात हर्षद मेहता नावाचा उदय झाला.  "एसीसी'सारखी कंपनी जर पुन्हा उभी करायची असेल तर लागणारे भांडवल ( जमीन, यंत्रसामुग्री, परवानगी, मनुष्यबळ विचारात घेता) आजच्या बाजारभांडवलाच्या कितीतरी पट असेल ही त्याची थेअरी! ती त्याने बाजाराच्या गळी उतरवली आणि पाहता पाहता "एसीसी'900 रुपयांवरून 90000 वर पोचला. पुढे तर त्याने हातात घेतलेला प्रत्येक शेअर अस्मान गाठत असे. पण सर्वच हौशे नवशे. नफा वसूल करायचे विसरले. व्हायचे तेच झाले, बाजार कोसळला आणि ते नैराश्य वर्षभर पुरले.

2- या भीतीने त्या क्षेत्रातले सर्व समभाग वाढले. सॉफ्टवेअर या नावाची इतकी क्रेझ होती की, बऱ्याच प्रवर्तकांनी आपापल्या उद्योगाचे नव्याने बारसे केले. नावात सॉफ्टवेअर असले की शेअर आकाशात जायचा. बोलता बोलता इन्फोसिसचा एक शेअर 17,500 रुपयांवर, विप्रोचा 7000 वर पोचला.  इन्फोसिसचा नफा ताब्यात घेऊन 60 रुपयांना मिळणारा 'लार्सन अँड टुब्रो'चा शेअर घ्यावा हे कोणी सुचवलेच नाही. पुढे तो वीसपट वाढला. सामान्य गुंतवणूकदाराने याही गंगेत फारसे हात धुतले नाहीत. बाजार कोसळल्यावर मात्र पुन्हा निराशा पदरी पडली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

3- वर्ष 2008  उजाडले. त्याआधीची 3-4 वर्षे भारतीय व जागतिक अर्थव्यवस्था वेगाने वाढत होती.  पुढे अमेरिकेत लोक कर्जे घेऊ लागले. फक्त व्याज द्या, मुद्दलाचे नंतर बघू असे म्हणत कर्जे वाटली गेली. शेवटी व्याज, मुद्दल, कर्ज, कर्जदार व बँका क्रमाक्रमाने बुडाले. अमेरिकी बाजार तर कोसळलाच. पण भारतीय बाजार 60 टक्क्यांनी खाली आला. कोसळण्याआधी  रिलायन्स इन्फ्राचा शेअर 2700 रुपये , डीएलएफ 1300 रुपये आणि सुझलॉनचा शेअर 2000 रुपये असताना या भावातही गुंतवणूकदार शेअर विकायला तयार नव्हते. किंबहुना त्यावेळी 300 रुपये असलेला हिंदुस्थान लिवर किंवा 200 रुपये भाव असणाऱ्या सन फार्माकडे कोणी बघायलाही तयार नव्हते. बजाज फायनान्सचा शेअर फक्त 60 रुपयांना मिळत होता.  आणखी एक ऋतुचक्र संपले आणि  वर्ष  2020  उजाडले. यावेळी बाजाराचे ध्रुवीकरण पराकोटीला पोचले होते. QUALITY AT ANY PRICE  हा नवा मंत्र घेऊन बाजार कोटीच्या कोटी उड्डाणे करीत होता.  बजाज फायनान्सचा शेअर 4700 रुपयांना देखील वाजवी कसा आहे हे पटवणाऱ्या नव्या कहाण्या रचल्या जात होत्या. पुढे करोनाचे संकट आले आणि कुठलीच "क्वालिटी' पडझडीत टिकली नाही.

इन्फोसिस, बजाज फायनान्स यांसारखे शेअर वाईट आहेत किंवा होते असे अजिबात नाही. वाईट होती ती त्यांची किंमत.  इन्फोसिस 17500 रुपयांना किंवा बजाज फायनान्स 4700 रुपयांना गुंतवणूक करण्यास योग्य नव्हता. पण पुढे दोनच वर्षात इन्फोसिस 1700 ते 2300 रुपयांवर किंवा आज बजाज फायनान्सचा शेअर 1700 ते 2000 रुपयांना नक्कीच "पोर्टफोलिओ'मध्ये ठेवण्यासारखे आहेत. 

बाजारात वेळोवेळी नफा वसूल करण्याच्या अनेक संधी चालून येतात, त्यांचा वापर केला पाहिजे. बाजारात ‘बेचके पछताओ, लेके मत पछताओ’ असा एक वाक्प्रचार आहे. अर्थ असा की नफा चुकून थोडा आधी वसूल झाला तरी हरकत नाही पण घेतल्यानंतर खाली आलेला शेअर वर जाण्यासाठी कधी कधी खूप वाट बघावी लागते आणि पश्चाताप होतो. 

दुसरी महत्वाची बाब म्हणजे, बाजारातली मोठी पडझड संधी देते. "पोर्टफोलिओ'मधील शेअर तपासून त्यात बाजारानुसार बदल करता येतात. आजही मुकेश अंबानींच्या कार्यक्षमता व नाविन्यपूर्ण व्यवस्थापनावर विश्वास ठेऊन प्रत्येक खालच्या भावात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर घेतला पाहिजे. औषध उद्योग व रसायन उद्योग भविष्यातील समृद्धीच्या संधी आहेत. निदान हाती असलेले शेअर आज ना उद्या वर जातीलच असे दिवास्वप्न पाहण्यापेक्षा दृष्टीकोन बदलला तर याच बाजारात मोठी संपत्ती निर्माण करता येईल. आज खाली आलेला शेअरबाजार वर जाणारच आहे. कधी ते मात्र सांगता येणार नाही.  इतिहास साक्ष आहे.  जीवनशैली बदलेल, नव्या संधी चालून येतील, शेअरबाजार पुन्हा नवा उच्चांक गाठेल, फक्त हवा विश्वास, संयम आणि शिस्त!

लेखक गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

(डिस्क्‍लेमर ः लेखकाने त्यांच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. मात्र, शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर व तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने घेणे अपेक्षित आहे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhushan Mahajan article stock market will reach new highs again