नवे "मार्जिन' प्रकरण काय आहे रे भाऊ? 

share market margin
share market margin

गेल्या वर्षी एका ब्रोकिंग कंपनीने गुंतवणूकदारांचे शेअर स्वत:च्या व्यवहारासाठी परस्पर "प्लेज' करून मोठा कथित गैरव्यवहार केला होता, तेव्हापासूनच "कॅश मार्केट'मध्ये सुरक्षिततेसाठी पावले उचलण्याचे "सेबी'च्या मनात होते. गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर रोजी "सेबी'ने याचे सूतोवाच केले, पण परिपत्रक लागू करण्याची तारीख सतत लांबवत नेली. "सेबी'ने "मार्जिन'बाबतचे परिपत्रक लागू करण्याची तारीख थोडी पुढे ढकलत शेवटी एक सप्टेंबर 2020 पासून अंमलात आणले. शेअर खरेदी-विक्री व्यवहारांसाठी लागू झालेले हे नवे प्रकरण काय आहे, ते समजून घेऊया. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"मार्जिन'चे नवे नियम काय आहेत? 
यापुढे कोणताही शेअर खरेदी करताना गुंतवणूकदाराला किमान 20 टक्के + 5 ते 60 टक्के "व्हीएआर' (व्हॅल्यू ऍट रिस्क) एवढे "मार्जिन' द्यावे लागेल. कोणत्याही शेअरमध्ये वेडीवाकडी तेजी-मंदी झाली तर "मार्जिन' वाढत जाते. त्यामुळे "व्हीएआर मार्जिन' सर्व शेअरना लागणार नाही. आपल्या शेअरसाठी किती "मार्जिन' आहे, याची माहिती स्टॉक एक्‍स्चेंजकडे मिळू शकेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"मार्जिन' कसे द्यायचे? 
हे "मार्जिन' रोख किवा शेअर "प्लेज' करून देता येईल. यापूर्वी गुंतवणूकदाराचे शेअर संबधित ब्रोकर परस्पर "प्लेज' करू शकत असे, त्यातूनच गैरव्यवहार झाले. आता ते गुंतवणूकदाराच्या संमतीशिवाय करता येणार नाहीत. ग्राहकाने "प्लेज' केलेले शेअर हे ब्रोकर एक्‍स्चेंजला "रिप्लेज' करू शकेल आणि त्यातून "मार्जिन'ची पूर्तता होईल. साधारणत: एक लाख रुपयांच्या व्यवहारासाठी सहसा रु. 20 हजार रोख किंवा रु. 30 हजारांचे शेअर देऊन काम भागेल. "डिलिव्हरी'च्या व्यवहारासाठी "मार्जिन' वगळता उरलेली रक्कम दोन दिवसांत द्यावी लागेल. सौदा असा पूर्ण झाल्यावर पुढील सौद्यासाठी पुन्हा "मार्जिन' आहेच. तेव्हा जे शेअर आपण किमान वर्षभर सांभाळणार आहोत, ते ब्रोकरला "मार्जिन' म्हणून देणे सोयीचे आहे. दिवसभराच्या ट्रेडिंगसाठी भरलेल्या "मार्जिन'प्रमाणे मार्जिनच्या 5 ते 8 पट (त्या त्या शेअरच्या वकुबाप्रमाणे) व्यवहार करता येतील व सर्व सौदे दिवसभरात पूर्ण झाल्यास, तेच "मार्जिन' दुसऱ्या दिवशी वापरता येईल. 

शेअरविक्रीसाठी काय नियम आहेत? 
यासाठी एकाच ब्रोकरकडे ट्रेडिंग व डीमॅट खाते असणे सोयीचे आहे. खात्यात शेअर असल्यास "डिलिव्हरी'साठी विक्री करताना कोणतेही "मार्जिन' द्यावे लागणार नाही. कारण ब्रोकर त्याचा "अर्ली पे इन' करू शकेल. म्हणजेच सोप्या शब्दात ते शेअर त्याच दिवशी एक्‍स्चेंजला वर्ग करता येतील. यासाठी वेळही रात्री नऊ वाजेपर्यंत वाढवून दिली आहे. "डिलिव्हरी' नसताना शेअरविक्री करायची असेल तर खरेदीच्या नियमाप्रमाणेच "मार्जिन' द्यावे लागेल. 

"आज घ्या, उद्या विका' सौद्यांचे काय? 
"मार्जिन' भरून ते पूर्वीसारखेच करता येतील, पण दुसऱ्या दिवशी शेअर खात्यात न आल्यामुळे विक्रीसाठी पुन्हा "मार्जिन' द्यावे लागेल. येथे हेही लक्षात घेतले पाहिजे, की नवे नियम लागू झाल्यापासून दोन दिवसांत 100 कोटींच्या शेअरचा लिलाव झाला आहे. ("डिलिव्हरी' न उतरल्यामुळे). 

काही खर्च वाढू शकेल का? 
हो. यापूर्वी ग्राहकाच्यावतीने ब्रोकरच शेअर "प्लेज' करीत असे. त्यातून विनासायास "ट्रेडिंग' करणे शक्‍य होत असे व कोणतीही तोशीस लागत नसे. आता "प्लेज शुल्क' द्यावे लागेल. स्टॉक एक्‍स्चेंजला दिवसातून चार वेळा "मार्जिन रिपोर्ट' देणे बंधनकारक आहे. "मार्जिन' कमी असल्यास 1 टक्का दंड ("मार्जिन'च्या) भरावा लागेल. हा दंड पुढे वाढत जाऊन 5 टक्के होण्याची तरतूद आहे. 

नव्या नियमांचे काय फायदे आहेत? 
- पारदर्शकता हा सर्वांत महत्त्वाचा फायदा. 
- स्वत:च्या संमतीने (ओटीपी स्वीकारून) "प्लेज' केल्यामुळे सर्व शेअर (प्लेज्ड आणि होल्डिंग) ग्राहकाच्या डोळ्यासमोर असतील. ब्रोकरच्या "पूल अकाउंट'मध्ये शेअर नसल्यामुळे सर्व कॉर्पोरेट बेनिफिट (लाभांश आदी) थेट मिळतील. 
- एखाद्या चुकार ब्रोकरच्या गैरव्यवहाराला आळा बसेल. एका ग्राहकाचे क्रेडिट किंवा शेअर दुसऱ्यासाठी किंवा स्वत:साठी वापरता येणार नाहीत. 
- पूर्ण "मार्जिन' भरून व्यवहार केल्यामुळे "ट्रेडिंग'ला शिस्त येईल. 

सारांश काय? 
- "मार्जिन' भरून व्यवहार करण्याची सवय काही दिवसांत लागेलच, पण बाजार सुरक्षित करताना, आपण त्याची द्रवता तर घालवत नाही ना, हा विचार झाला असता तर बरे झाले असते. 
- बाजारात कमी व्यवहार होणाऱ्या शेअरमध्ये मोठी खरेदी झाल्यास भाव अवाजवी वाढणे व मोठी विक्री झाल्यास ते प्रमाणाबाहेर कमी होण्याची शक्‍यता आहे. 
(लेखक भांडवली बाजाराचे विश्‍लेषक आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com