Billionaires List : टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून मुकेश अंबानी बाहेर; जाणून घ्या गौतम अदानींचे स्थान काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mukesh Ambani News

Billionaires List : टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून मुकेश अंबानी बाहेर; जाणून घ्या गौतम अदानींचे स्थान काय?

Billionaires List : भारतातील अब्जाधीश उद्योगपतींपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. त्यांची संपत्ती 85 अब्ज डॉलरवर आली आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी 85 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत 11 व्या स्थानावर पोहोचले आहेत.

त्याच वेळी, भारताचे आणखी एक अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.

शनिवारी जाहीर झालेल्या ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, गेल्या 24 तासांत मुकेश अंबानींच्या एकूण मालमत्तेत सुमारे 788 दशलक्ष डॉलरची घट झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन वर्ष 2023 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत त्यांच्या एकूण मालमत्तेत सुमारे 1.93 अब्ज डॉलरची घट झाली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये भारतातील आणखी एक अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांचे स्थान पूर्वीपेक्षा मजबूत झाले आहे. जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत ते अजूनही तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, गौतम अदानी 121अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. गेल्या 24 तासांत त्यांची एकूण संपत्ती 890 दशलक्ष डॉलरने वाढली आहे. 2023 च्या सुरुवातीपासून त्याची एकूण संपत्ती सुमारे 188 दशलक्ष डॉलरने वाढली आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये, फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट 186 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहेत. बर्नार्ड अर्नॉल्टच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत सुमारे 1.95 डॉलर बिलियनची वाढ झाली आहे.

2023 च्या सुरुवातीपासून त्याच्या संपत्तीत सुमारे 23.9 अब्ज डॉलरची वाढ नोंदवली गेली आहे. याशिवाय, टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क 139 अब्ज डॉलर्ससह टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत.

गेल्या 24 तासांत त्यांची एकूण संपत्ती 3.97 अब्ज डॉलरने वाढली आहे. 2023 च्या सुरुवातीपासून त्यांची संपत्ती सुमारे 1.64 अब्ज डॉलरने वाढली आहे.

टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत जेफ बेझोस चौथ्या स्थानावर :

ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्समधील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत जेफ बेझोस 120 अब्ज डॉलर्ससह चौथ्या स्थानावर आहेत. गेल्या 24 तासांत त्यांच्या संपत्तीत 3.62 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

हेही वाचा: Budget 2023 : जाणून घ्या, अर्थसंकल्पाशी संबंधित महत्वाच्या ऐतिहासिक घटना

या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स 111 अब्ज संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर आहेत. गेल्या 24 तासांत त्यांची संपत्ती सुमारे 1.49 अब्ज डॉलरने वाढली आहे.

याशिवाय, ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या यादीत वॉरन बफे 105 अब्ज डॉलर संपत्तीसह सहाव्या, लॅरी एलिसन 97.5 अब्ज डॉलर संपत्तीसह सातव्या, लॅरी पेज 90.9 अब्ज डॉलर संपत्तीसह आठव्या, सर्गेई ब्रिन 87.2 नवव्या स्थानावर आहेत.

86.1 बिलियन डॉलरच्या एकूण मालमत्तेसह स्टीव्ह बाल्मर 10व्या स्थानावर आहे. भारताचे मुकेश अंबानी हे अमेरिकन उद्योगपती स्टीव्ह बाल्मर यांच्यापेक्षा खाली घसरले आहेत.