कोरोना काळातही US मधील श्रीमंतांच्या संपत्तीत 7,44,20,48,88,00,000 रुपयांची वाढ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

एलॉन मस्क हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सपेक्षा जास्त श्रीमंत झाले आहेत.

वॉशिंग्टन :  कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग प्रभावित झाले आहे. महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. लाखो लोक भुकबळीने त्रस्त आहेत. जगभरात अशी वाईट परिस्थिती असली तरीही अमेरिकेतील अब्जाधीशांच्या संपत्तीत मात्र वाढच झाली आहे. एका रिपोर्टनुसार, मार्चमध्ये संपूर्ण जगभरात कोरोना पसरल्यानंतर अमेरिकेतील अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये एक ट्रिलीयन डॉलरहून अधिक संपत्तीची वाढ झाली आहे. 
या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये आश्चर्यकारक वाढ झाली आहे. 650 अब्जाधीशांना 18 मार्च, 2020 आणि 24 नोव्हेंबर 2020 च्या दरम्यान 1.008 ट्रिलीयन डॉलर (7,44,20,48,88,00,000 रुपये) ची संपत्ती प्राप्त झाली आहे. या सगळ्यांची एकूण संपत्ती चार ट्रिलीयन डॉलर  (29,53,19,40,00,00,000 रुपये)च्या आसपास आहे. 

कोरोनाचाही काहीही फरक नाही

या समूहातील 29 अब्जाधीशांनी मार्चपासून आपल्या संपत्तीला दुप्पट केलं आहे. या दरम्यान 36 नवे अब्जाधीश बनले आहेत. हे सगळं त्या काळात घडलंय जेंव्हा कोरोना व्हायरसमुळे जग ठप्प असताना उद्योगधंदेही ठप्प झाले होते. आर्थिक स्तरावर संपूर्ण जग संघर्ष करत आहे. अनेक देशांत पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जातीय. 

एलॉन मस्क सर्वांत श्रीमंत
इन्स्टीट्यूट फॉर पॉलिसी स्टडीजच्या रिपोर्टने आता माहित पडलं आहे की, अमॅझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांच्या संपत्तीमध्ये मार्चपासून 70.7 अब्ज डॉलर (52,19,77,03,95,000 रुपये) ची वाढ झाली आहे. तर कोरोनामुळे कंपनीचे जवळपास 20,000 कर्मचारी संक्रमित झाले आहेत. मात्र सर्वांत अधिक संपत्ती एलॉन मस्क यांची वाढली आहे. मस्क यांच्या संपत्तीमध्ये महामारीनंतर 100 अब्ज डॉलरची वृद्धी झाली आहे. 18 मार्चला त्यांच्याजवळ 24.6 अब्ज डॉलर होते, जे 24 नोव्हेंबरपर्यंत वाढून 126 अब्ज डॉलर झाले. त्यांच्या संपत्तीत 413 टक्क्यांची वृद्धी टेस्ला स्टॉकमुळे झाली आहे. यामुळे ते मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सपेक्षा जास्त श्रीमंत झाले आहेत. 

मार्क झुकेरबर्ग यांची संपत्ती 47 टक्क्यांनी वाढली

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत 47.8 अब्ज डॉलर म्हणजेच 47 टक्क्यांची वाढ झाली आहे. 18 मार्च रोजी त्यांच्याकडे 54.7 डॉलरची संपत्ती  होती. तर 17 नोव्हेंबरपर्यंत ती 102.4 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: billionaires wealth grown since coronavirus pandemic began by more than 1 trillion dollar us