इक्विटी योजनेवर कर कसा लागू होणार?

अरविंद शं. परांजपे
सोमवार, 26 मार्च 2018

प्रश्‍न - नव्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात म्युच्युअल फंड योजनेच्या विक्रीवर कर लावला गेला आहे, त्याच्या तरतुदी नक्की काय आहेत?

प्रश्‍न - नव्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात म्युच्युअल फंड योजनेच्या विक्रीवर कर लावला गेला आहे, त्याच्या तरतुदी नक्की काय आहेत?
उत्तर - नव्या तरतुदी बघण्यापूर्वी ३१ मार्च २०१८ पर्यंतच्या विक्रीसाठी लागू असलेल्या तरतुदी बघूया. त्या पुढीलप्रमाणे आहेत - इक्विटी योजना आणि ६५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त इक्विटी प्रकाराचा समावेश असलेल्या बॅलन्स्ड योजना यांवर मिळणारा लाभांश पूर्णपणे करमुक्त आहे. तसेच, त्यांच्या खरेदीच्या तारखेपासून १२ महिन्यांच्या आत जर विक्री केली, तर त्यावरील नफ्यावर (म्हणजे विक्री मूल्य वजा खरेदी मूल्य) १५ टक्के एवढा अल्पकालीन भांडवली नफा (शॉर्ट टर्म कॅपिटल गेन) कर लागू होतो. खरेदीनंतर १२ महिन्यांनी विक्री केली, तर तो दीर्घ मुदतीचा नफा असल्याने तो पूर्णपणे करमुक्त आहे. 

प्रश्‍न - ३१ मार्च २०१८ पर्यंत सध्याची करमुक्ती जाऊन १ एप्रिल २०१८ पासून यात काय बदल होईल?
उत्तर - पहिला बदल म्हणजे इक्विटी योजना आणि ६५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त इक्विटी प्रकाराचा समावेश असलेल्या बॅलन्स्ड योजना, यांवर मिळणाऱ्या लाभांशावर ११.६२ टक्के एवढा लाभांश वितरण कर म्हणजे डिव्हिडंड डिस्ट्रिब्यूशन टॅक्‍स लावला जाईल. म्हणजे युनिटधारकाच्या हातात मिळणारा लाभांश करमुक्त असेल; पण तो देतानाच फंड कंपनी त्यातून कर कापून घेतल्याने लाभांशाची रक्कम कमी होईल. म्हणजे सध्या जर १० टक्के लाभांश मिळाला, तर १ एप्रिलपासून तो ८.३८ टक्के होईल.

दुसरा बदल लाँग टर्म कॅपिटल गेन करात आहे. १ एप्रिल २०१८ नंतर लाँग टर्म कॅपिटल गेनवरील (म्हणजे खरेदी केल्याच्या तारखेपासून १२ महिन्यांनंतर जर विक्री केली तर) नफ्यावर (विक्री मूल्य वजा खरेदी मूल्य) १०.४ टक्के एवढा दीर्घकालीन भांडवली नफा कर (लाँग टर्म कॅपिटल गेन) लागू होईल. मात्र, यासाठी दोन सवलती दिल्या गेल्या आहेत. पहिली सवलत म्हणजे प्रत्येक आर्थिक वर्षात (१ एप्रिल ते ३१ मार्च) एकूण १ लाख रुपये एवढा लाँग टर्म कॅपिटल गेन होईपर्यंत कर आकारला जाणार नाही. १ लाखाची मर्यादा ओलांडल्यानंतरच्या रकमेवर १०.४ टक्के कर भरावा लागेल. दुसरी सवलत म्हणजे यातील गेन म्हणजे लाभ किती झाला आहे, ते काढण्यासाठी योजनेची खरेदीची ‘एनएव्ही’ किंवा ३१ जानेवारी २०१८ या दिवशीची ‘एनएव्ही’ यातील जे जास्त असेल, ती घेऊन भांडवली नफा किती झाला, हे काढावे लागेल. उदाहरणार्थ, खरेदीची तारीख - १ जानेवारी २०१५, एनएव्ही - रु. ४०, विक्रीची तारीख - १ नोव्हेंबर २०१८, एनएव्ही - रु. १००, ३१ जानेवारीची एनएव्ही - रु. ९०. यावर लाँग टर्म कॅपिटल गेन = रु. १०० - रु. ९० = रु. १० (रु. ६० नाही) आणि जर एकूण लाभ १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तरच यावर १०.४ टक्के दराने कर भरावा लागेल.

प्रश्‍न - जर लाँग टर्म लॉस झाला, तर तो लाँग टर्म कॅपिटल गेनबरोबर ‘सेट ऑफ’ करता येऊ शकतो का?
उत्तर - हो, कारण लाँग टर्म गेन करपात्र असल्याने त्याबरोबर लाँग टर्म लॉस हा ‘सेट ऑफ’ करता येईल. 

प्रश्‍न - बदललेल्या कराच्या तरतुदी लक्षात घेऊन तुमचा काय सल्ला आहे?
उत्तर - १) जे सध्या लाभांश घेत आहेत, त्यांनी आता ‘स्वीच’ करून ‘ग्रोथ’ हा पर्याय निवडावा आणि ‘एसडब्लूपी’द्वारे दरमहा किंवा तीन महिन्यांनी योग्य तेवढी रक्कम काढावी. २) ३१ मार्चपूर्वी सध्याच्या योजनांची विक्री करून करमुक्त लाभाचा फायदा करून घ्यावा, असे काही जण सुचवित आहेत; पण त्याने फारसा काही लाभ नसल्याने ते करू नये. ३) काही जण आता ‘युलिप’ करमुक्त असल्याने ते घ्यावेत, असे म्हणत आहेत; पण तेसुद्धा करू नये.

Web Title: business news arvind paranjpye Equity scheme