अनिश्‍चित बाजारात इक्विटी योजनेत गुंतवणूक करावी का?

अरविंद शं. परांजपे
सोमवार, 19 मार्च 2018

प्रश्‍न - माझ्या विम्याच्या पॉलिसीची मुदत संपल्यानंतरची रक्कम आणि ठेवींचे पैसे, असे १० लाख रुपये माझ्याकडे आहेत. ही रक्कम मला पुढची पाच वर्षे तरी लागणार नसल्याने म्युच्युअल फंडातील इक्विटी किंवा बॅलन्स्ड योजनेत गुंतवावी, असे वाटत आहे. पण, शेअर बाजारातील चढ-उतार बघून भीती वाटते. यावर काही उपाय आहे का?

प्रश्‍न - माझ्या विम्याच्या पॉलिसीची मुदत संपल्यानंतरची रक्कम आणि ठेवींचे पैसे, असे १० लाख रुपये माझ्याकडे आहेत. ही रक्कम मला पुढची पाच वर्षे तरी लागणार नसल्याने म्युच्युअल फंडातील इक्विटी किंवा बॅलन्स्ड योजनेत गुंतवावी, असे वाटत आहे. पण, शेअर बाजारातील चढ-उतार बघून भीती वाटते. यावर काही उपाय आहे का?

उत्तर - आहे. इक्विटी किंवा बॅलन्स्ड म्युच्युअल फंड योजनेतील गुंतवणुकीचा तुमचा विचार योग्य आहे. एकरकमी गुंतवणुकीनंतर जर बाजार लगेच खाली आला, तर तुमचे नुकसान होण्याची शक्‍यतासुद्धा खरी आहे. अशी जोखीम कमी करण्यासाठी एक उपाय आहे आणि तो म्हणजे ‘एसटीपी’ म्हणजे ‘सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन’चा.

प्रश्‍न - ‘एसटीपी’ म्हणजे नक्की काय? आम्हाला ‘एसआयपी’ माहीत आहे...
उत्तर - ‘एसटीपी’ आणि ‘एसआयपी’ या दोन्हींमध्ये नियमित आणि थोडीथोडी गुंतवणूक करण्याचे तत्त्व समान आहे. ‘एसआयपी’मध्ये तुमचे पैसे दरमहा तुमच्या बॅंक खात्यातून भरले जातात, तर ‘एसटीपी’मध्ये सर्व रक्कम सुरवातीलाच म्युच्युअल फंडाच्या लिक्विड योजनेत भरली जाते आणि त्यातून थोडीथोडी रक्कम इक्विटी योजनेत गुंतविली जाते.

प्रश्‍न - ‘एसटीपी’ सुरू करण्यासाठी काय करावे लागते?
१) प्रथम तुम्ही १० लाख रुपये डेट फंड प्रकारातील लिक्विड योजनेत भरायचे.
२) त्यानंतर यातील काही रक्कम नियमितपणे (दर महिन्याला/१५दिवसांनी/आठवड्याला/रोज) इक्विटी योजनेत वर्ग करण्याची सूचना द्यायची.
३) या पद्धतीने लिक्विड योजनेतील रक्कम हळूहळू कमी होत जाऊन ठरविलेला कालावधी संपल्यावर सर्व रक्कम इक्विटी योजनेत जमा होते.

प्रश्‍न - यामुळे आमची जोखीम कमी कशी होते?
उत्तर - ‘एसटीपी’मध्ये इक्विटी योजनेतील खरेदी ही एकरकमी होत नाही, तर तुम्ही ठरविलेल्या (६ ते १२ महिन्यांमध्ये) थोडीथोडी रक्कम वेगवेगळ्या दिवशींच्या ‘एनएव्ही’ला खरेदी होत असल्याने जोखीम कमी होते. १० लाख रुपये ‘एसटीपी’ने गुंतविण्यासाठी जर सहा महिने मुदत तुम्ही ठरविली असेल, तर लिक्विड योजनेतून इक्विटी योजनेत दर आठवड्याला ४० हजार रुपये या प्रमाणे २५ आठवडे झाल्यावर लिक्विड योजनेतली रक्कम शून्य होईल.

प्रश्‍न - एकरकमी गुंतवणुकीच्या तुलनेत ‘एसटीपी’मुळे नक्की फायदाच होईल ना?
उत्तर - अशी खात्री कोणी देऊ शकत नाही. तुमचा ‘एसटीपी’ चालू असेपर्यंत जर शेअर बाजार वर जात राहिला आणि ‘एसटीपी’ संपल्यानंतर जर खाली आला, तर ‘एसटीपी’चा फायदा होणार नाही. पण ‘एसटीपी’ चालू असताना जर शेअर बाजार (आणि त्यामुळे एनएव्ही) उतरत राहिला, तर ‘एसटीपी’मुळे फायदा होईल. पण बाजारातील असे चढ-उतार गृहीत धरून आणि दीर्घकाळासाठी रक्कम ठेवली असेल, तर चिंतेचे कारण नाही.

प्रश्‍न - लिक्विड फंड किती सुरक्षित आहे? त्यावर परतावा किती मिळतो? 
उत्तर - यात जोखीम सर्वांत कमी असते आणि बचत खात्यापेक्षा थोडा अधिक परतावा मिळतो. पण, त्यातील लाभांशावर कर गेल्याने जास्त उत्पन्नाची अपेक्षा ठेवू नये. 

प्रश्‍न - ‘एसटीपी’ करण्यासाठी किती पर्याय आहेत?
१) निश्‍चित रक्कम - (फिक्‍स्ड अमाउंट) वर्ग करणे. उदा. आठवड्याला ५००० रुपये.  
२) डिव्हिडंड ट्रान्स्फर - फक्त लाभांश (जेव्हा जाहीर होतो तेव्हा) वर्ग करणे. 
३) वाढीव रक्कम - (ॲप्रिसिएशन ट्रान्स्फर) मूळ रकमेमध्ये जी वृद्धी होईल, ती रक्कम दुसऱ्या योजनेत वर्ग केली जाते. 
४) व्हॅल्यू ॲव्हरेजिंग - यात शेअर निर्देशांकाशी निगडित रक्कम दर हप्त्याला ठरविली जाते. ‘एसटीपी’ सुरू करताना होता त्यापेक्षा जर निर्देशांक नंतर खाली गेला असेल, तर जास्त रक्कम वर्ग होईल आणि त्या वेळच्या ‘एनएव्ही’ला जास्त गुंतवणूक होईल. शेअर बाजारातील सध्याच्या अनिश्‍चिततेच्या काळात ‘एसटीपी’च्या या पर्यायाचा फायदा होऊ शकेल.

Web Title: business news Investing in Equity Schemes