esakal | अर्थबोध : ‘टोकनायझेशन’मुळे कार्ड पेमेंट अधिक सुरक्षित
sakal

बोलून बातमी शोधा

card payment

अर्थबोध : ‘टोकनायझेशन’मुळे कार्ड पेमेंट अधिक सुरक्षित

sakal_logo
By
अतुल सुळे (बॅंकिंग क्षेत्राचे अभ्यासक)

डिजिटल व्यवहारात भारताने जागतिक स्तरावर आघाडी मिळविली आहे. गेल्या पाच वर्षांत डिजिटल व्यवहार ५५ टक्के चक्रवाढ दराने वाढले आहेत. निश्चलनीकरण आणि कोविड-१९ मुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे; तसेच तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे व सुलभतेमुळे डिजिटल व्यवहार लोकांच्या अंगवळणी पडू लागले आहेत‌. मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांचा सर्रास वापर होताना दिसतो, पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की सोयीबरोबरच ‘सायबर क्राईम’सुद्धा वाढताना दिसत आहेत. डेबिट आणि क्रेडिट कार्ड यांच्या वापरातील धोके कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक जानेवारी २०२२ पासून कार्डांचे ‘टोकनायझेशन’ करण्याचा आदेश वित्तीय संस्थांना दिला आहे. काही बँकांनी ही सेवा सुरू केली आहे, त्यामुळे ही संकल्पना समजून घेणे आवश्यक झाले आहे. ही संकल्पना व त्यासंबंधीची अधिक माहिती प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आपण समजून घेऊ.

‘टोकनायझेशन’ म्हणजे काय?

कार्डावरील नाव, नंबर, मुदतपूर्तीची तारीख या संवेदनशील माहितीचे रुपांतर टोकन किंवा कोड यांमध्ये करण्याला ‘टोकनायझेशन’ असे म्हणतात. ही संवेदनशील माहिती हॅकर्सच्या ताब्यात गेल्यास तुमच्या कार्डाचा ते गैरवापर करू शकतात, पण ‘टोकनायझेशन’मुळे ते अशक्य होईल.

‘डिटोकनायझेशन’ म्हणजे काय?

टोकन किंवा कोड यांचे रूपांतर परत एकदा संवेदनशील माहितीत करण्याला ‘डिटोकनायझेशन’ असे म्हणतात.

‘टोकनायझेशन’चा फायदा काय?

‘टोकनायझेशन’मुळे कार्डावरील महत्त्वाची माहिती गुन्हेगारांच्या हाती जाणार नाही आणि त्यामुळे कार्डावरील व्यवहार अधिक सुरक्षित होतील.

‘टोकनायझेशन’ची प्रक्रिया काय आहे?

कार्डधारकाला सर्वप्रथम ज्यांच्याकडून वस्तू किंवा सेवा खरेदी करायची आहे (ज्यांना मर्चंट म्हणतात), त्यांच्या ॲपवरून कार्ड टोकनायझेशनची विनंती करावी लागते. मग तो मर्चंट (उदाहरणार्थ, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट) तुमची विनंती कार्ड नेटवर्क किंवा टोकन सर्व्हिस प्रोव्हायडर (उदाहरणार्थ, व्हिसा, मास्टरकार्ड) यांना पाठवितो. या संस्था तुमची विनंती कार्ड जारी करणाऱ्या बँकेकडे मंजुरीसाठी पाठवितात, मंजुरी मिळाल्यानंतर कार्ड नेटवर्क टोकन जारी करतात.

‘टोकनायझेशन’, ‘डिटोकनायझेशन’ यांसाठी काही खर्च येतो का?

नाही, ही सेवा निःशुल्क आहे.

मी ‘टोकनायझेशन’ची विनंती संगणकाद्वारे पाठवू शकतो का?

नाही, सध्या तरी ही सेवा फक्त मोबाईल फोन आणि टॅब्लेटवरून पाठविलेल्या विनंतीला लागू आहे.

‘टोकनायझेशन’, ‘डिटोकनायझेशन’ कोण करू शकते?

रिझर्व्ह बँकेने सध्या कार्ड पेमेंट नेटवर्कसाठी अमेरिकन एक्स्प्रेस, डायनर्स क्लब, मास्टर कार्ड, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) या संस्थांना परवानगी दिली आहे.

‘टोकनायझेशन’ सक्तीचे आहे का?

नाही, ते ऐच्छिक असले तरी करून घेणे सर्वांच्याच सुरक्षिततेचे, फायद्याचे आहे, हॅकर्स सोडून!

मी किती कार्डांचे ‘टोकनायझेशन’ करू शकतो?

कितीही...

‘टोकनायझेशन’ करताना काय विचारात घेतले जाते?

‘टोकनायझेशन’ करताना तुमचा कार्ड नंबर, डिव्हाईस म्हणजे मोबाईल किंवा टॅब; तसेच मर्चंट (म्हणजे कार्डाचा तुम्ही कोठे वापर करीत आहात) यावर आधारित टोकन किंवा कोड जनरेट होतो, त्यामुळे ते टोकन दुसऱ्या डिव्हायसवरून किंवा दुसऱ्या साइटवर वापरता येत नाही.

माझ्याकडे दोन मोबाईल आणि एक टॅब आहे, तर मी सर्व डिव्हायसेससाठी टोकन घेऊ शकतो का?

होय, त्यावर काहीही बंधन नाही.

माझा मोबाईल, कार्ड हरवल्यास किंवा ‘टोकनायझेशन’संबंधी काही तक्रार असल्यास ती कोठे करावी?

कार्ड जारी करणाऱ्या बँकेकडे...

(लेखक बँकिंग क्षेत्रातील जाणकार आहेत)

loading image
go to top