Good News! अडचणीतही हप्ते फेडणाऱ्या कर्जदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत मिळणार कॅशबॅक

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 25 October 2020

दिवाळीसाठी केंद्र सरकार आपल्या कर्जदात्यांना 6500 कोटी रुपयांची भर-भक्कम भेट देणार आहे.

नवी दिल्ली- दिवाळीसाठी केंद्र सरकार कर्जदात्यांना 6500 कोटी रुपयांची भर-भक्कम भेट देणार आहे. जर तुम्ही कोणत्या बँकेकडून 2 करोड रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले असेल तर तुम्हाला हे गिफ्ट मिळेल. अडचणीतही कर्जाचे हफ्ते फेडणाऱ्याला याचा लाभ होणार आहे. तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतले असेल, ती 5 नोव्हेंबरपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करेल.

मोदी सरकारने देशातील कोट्यवधी जनतेला दिवाळीची भेट दिली आहे. केंद्र सरकारने मोरॅटोरियम काळातील व्याजावर व्याज (चक्रवाढ व्याज) देण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा सरकारने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या व्याजावरील व्याजावर सूट देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचा सामान्य जनतेपर्यंत लाभ पोहोचावा म्हणून अर्थ मंत्रालयाने यासाठी गाइडलाइन्स जारी केले आहेत. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 2 नोव्हेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सरकार त्यापूर्वीच याची माहिती न्यायालयाला देईल. 

व्हॉट्सऍप वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे; कंपनीने दिली माहिती

या योजनेचा लाभ एमएसएमई कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, ग्राहकोपयोगी कर्ज, क्रेडिट कार्ड, वाहन कर्ज, व्यावसायिकांचे वैयक्तिक कर्जदारांना मिळणार आहे. 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत ज्यांच्यावर 2 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा कमी कर्ज थकीत होते, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांना या कालावधीतील व्याजावरील व्याज द्यावे लागणार नाही. शिवाय ज्यांनी नियमितपणे आपले हफ्ते फेडले आहेत, त्या कर्जदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.

जर एखाद्या वैयक्तिक व्यक्तीवर दोन कोटींहून अधिक कर्ज आहे, त्यांना याचा फायदा मिळणार नाही. ज्यांनी मोरॅटोरियमचा लाभ घेतला नाही. त्यांनाही याचा फायदा मिळेल. कॉर्पोरेटला याचा लाभ मिळणार नाही. व्याजावरील व्याज-देय योजना केवळ वैयक्तिक आणि एमएसएमई कर्जांना दिली जाईल. याचा भार केंद्र सरकार स्वतः उचलेल. यामुळे सरकारवर 6500 कोटींचा बोजा पडेल. 

दरम्यान, यापूर्वी न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले होते की, सरकारने काहीतरी ठोस केले पाहिजे. दोन कोटींपर्यंतच्या कर्जदाराला सवलतीचा लाभ लवकरात लवकर लागू करण्यात यावा. सामान्य जनतेची दिवाळी तुमच्या हातात आहे, असेही सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cashback to the borrowers who pay the installments even in difficult situations