
‘सेंट्रल बँक’ करणार ६०० शाखा बंद
मुंबई - सेंट्रल बँक ऑफ इंडिया आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तोट्यात असलेल्या शाखा बंद करून किंवा विलीन करण्याचे कठोर पाऊल उचलले आहे. मार्च २०२३च्या अखेरीस तोट्यात असलेल्या शाखा बंद करून किंवा विलीन करून शाखांची संख्या ६००ने कमी करण्याचा विचार करत आहे. बँकेच्या एकूण शाखांच्या १३ टक्के इतके हे प्रमाण आहे.
१०० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या बँकेच्या देशभरात सध्या ४हजार ५९४ शाखा आहेत. मात्र आतापर्यंत एकही शाखा बंद करण्यात आलेली नव्हती. आर्थिक तोट्यातून सावरण्यासाठी बँकेला हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. शाखा बंद करण्याच्या उपायानंतर रिअल इस्टेटसारख्या मालमत्तेची विक्री करण्याचीही योजना आहे.
नियामक भांडवल, बुडीत कर्जे आदी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यानंतर रिझर्व्ह बँकेने २०१७मध्ये अन्य काही बँकासह सेंट्रल बँकेवर निर्बंध घातले होते. तेव्हापासून सेंट्रल बँक वगळता सर्व बँकानी त्यांची आर्थिक स्थिती सुधारल्याने निर्बंध दूर झाले आहेत. २०१७ पासून बँक रिझर्व्ह बँकेच्या निर्बंध यादीतून बाहेर पडण्यासाठी आणि मनुष्यबळाचा अधिक कार्यक्षमतेने व प्रभावी वापर करण्यासाठी संघर्ष करत आहे, अशा आशयाचे एक पत्र बँकेच्या मुख्यालयाने इतर शाखा आणि विभागांना पाठवले आहे.
Web Title: Central Bank Of India To Close 600 Branches
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..