सावधान, धंदा बदलतोय... व्यावसायिकांनी काय करावे? 

सावधान, धंदा बदलतोय... व्यावसायिकांनी काय करावे? 

छोटे वा मध्यम व्यापारी, व्यावसायिक आणि कारखानदार या सर्वांच्याच मनात लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न आहेत. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या काळजीबरोबरच प्रत्येकाला आपल्या व्यवसायाच्या भवितव्याबद्दल चिंता असणे साहजिक आहे. "कोरोना'च्या संकटानंतर आपल्या व्यवसायाचे भवितव्य काय असेल किंवा या संकटाचा आर्थिक पातळीवर सामना कसा करावा, याबद्दल अनेक प्रश्न व्यावसायिकांना सतावत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रश्नोत्तराच्या स्वरूपात त्यांच्यासमोरील प्रश्‍न आणि त्यावरील उपायांवर नजर टाकूया. 

1) "लॉकडाउन'च्या काळात काय करता येईल? 

- स्वतःसाठी, कुटुंबासाठी वेळ द्या. एरवी व्यवसायात व्यग्र असल्याने कुटुंबाला वेळ देणे शक्‍य होत नाही. त्यामुळे ही संधी समजून कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवावा. व्यवसायात नवे काय करता येईल, याचा विचार करा. ध्यान, चिंतन, मनःशांतीसाठी काय करता येईल, ते पाहा. 

2) "कोरोना'च्या पार्श्वभूमीवर माझा व्यवसाय पूर्ववत कधी सुरु होऊ शकेल? 

- देशातील सर्वांनाच हा प्रश्न सतावत आहे. परंतु, "कोरोना'ला आटोक्‍यात आणणे आणि त्याचा समूळ नाश करणे हे आपल्या सर्वांसमोरचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तीन मे नंतर लॉकडाउन उठल्यानंतर व्यवहार, व्यवसाय, कारखाने सुरु व्हायला लागतील, असा अंदाज आहे. दरम्यान, ज्या जिल्ह्यांमध्ये "कोरोना'चा रुग्ण आढळलेला नाही किंवा "कोरोना'चा प्रसार कमी आहे अशा ठिकाणी काही व्यवसाय, उद्योग सुरु होतील. मात्र, तुमचा व्यवसाय खऱ्या अर्थाने पूर्ववत होण्यास कमीत कमी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल. 

3) नव्या परिस्थितीत व्यवसायाची आर्थिक घडी कशी बसवावी? 

- कोणत्याही व्यवसायासाठी खेळते भांडवल अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे साधारणतः पुढील तीन महिन्यांसाठी पैशाचा स्त्रोत (वसुली म्हणजे उधारी गोळा करणे, बॅंक किंवा इतर उत्पन्न) आणि देणी (कर्जे, व्यवसायाला लागणारे भांडवल) याचा आताच विचार करणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने नियोजन होणे आवश्‍यक आहे. 

4) कर्मचाऱ्यांच्या पगाराचा ताण कसा सहन करावा? 

- बहुतेक सर्व व्यावसायिक किंवा छोट्या कंपन्यांनी मार्च महिन्याचे कर्मचाऱ्यांचे पगार केले आहेत. एप्रिल महिन्यात उत्पन्न पूर्णपणे बंद असल्याने प्रश्न गंभीर आहे. यावर किमान वेतनाचा पर्याय उत्तम ठरू शकेल. ज्या कर्मचाऱ्यांचे पगार 30 ते 40 हजारांपेक्षा जास्त आहेत, त्यांच्याशी चर्चा करून किमान वेतन द्यावे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे पगार या पातळीपेक्षा कमी आहेत, त्यांना पूर्ण पगार द्यावा; जेणेकरून त्यांचेही आर्थिक प्रश्न सुटतील आणि आपल्या व्यवसायावर फार मोठा आर्थिक ताण येणार नाही. असे केल्यास ते कर्मचारी नंतरच्या काळात तुमच्यासाठी अधिक जोमाने काम करतील. 

5) व्यावसायिक जागेचे भाडे कसे देणार? 

- अर्थातच यासाठी तुम्हाला तुमच्या जागामालकांशी चर्चा करावी लागणार आहे. त्यांना तुमची अडचण समजून सांगावी लागेल. लॉकडाउनच्या पूर्ण काळात म्हणजे किमान एप्रिल महिन्यासाठी भाड्यात सूट मिळते का ते पाहावे. अन्यथा, दोघांनी थोडा भार सोसून अर्धे भाडे भरण्याचा मार्ग काढावा. 

6) व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर सद्यःस्थितीत "ईएमआय' भरावा का? 

- शक्‍य असल्यास कर्जाचे हप्ते भरणे चांगले ठरेल. कारण हे कर्ज माफ केलेले नाही, तर तीन महिन्यांसाठी न भरण्याची सूट दिली आहे. मात्र, त्यानंतर तीन महिन्यांचे अतिरिक्त व्याज भरावे लागणार आहे, हे लक्षात घ्यावे. 

7) व्यवसायाच्या पातळीवर हे आर्थिक वर्ष कसे असेल? 

- अगोदरच नमूद केल्याप्रमाणे, व्यवसायाची पुन्हा घडी बसण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाईल. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत किंवा नेहमीच्या तुलनेत आपल्या व्यवसायात 30 ते 50 टक्‍क्‍यांची घट अपेक्षित आहे, असे गृहित धरावे. 

8) "लॉकडाउन' संपल्यानंतर कोणत्या प्रकारच्या आव्हानांचा सामना प्रामुख्याने करावा लागेल? 

- खेळत्या भांडवलाचा प्रश्‍न सर्वांत मोठा असणार आहे. त्यासाठी उधारी गोळा करणे; तसेच बचतीमधील रक्कम वापरून भांडवल उभा करता येऊ शकेल. कर्मचाऱ्यांच्या पातळीवर देखील काही समस्या निर्माण होतील. जुने कर्मचारी सोडून जातील. मात्र, नव्याने येणारे कर्मचारी देखील तेवढेच असतील. ग्राहक मिळविणे हे पहिल्यासारखे सोपे असणार नाही. शक्‍यतो जीवनावश्‍यक गरजा सोडून नवी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल कमी असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्याचे आव्हान मोठे असणार आहे. नफ्याचा फारसा विचार न करता ग्राहक टिकविण्याकडे लक्ष दिले पाहिजे. उधारीच्या व्यवसायावर नियंत्रण ठेवावे लागेल. कारण ग्राहक टिकविण्याच्या प्रयत्नात उधारी वाढणे योग्य ठरणार नाही. 

9) "लॉकडाउन' किंवा मंदीच्या काळात नवीन संधी काय असतील? 

- "लॉकडाउन'च्या काळात सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. ग्राहकांप्रमाणेच व्यवसायिकांसमोर जशा नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, तशाच आणि तितक्‍याच संधी देखील असतील. त्यामुळे "लॉकडाउन' संपल्यानंतर नवे काय करता येईल, त्याचा विचार करा. तुम्हाला आणखी कोणता व्यवसाय चांगल्या पद्धतीने आणि कमी भांडवलात करता येऊ शकेल का, याचा विचार करा. सध्याच्या व्यवसायात खर्च कसा कमी करता येईल, याचाही विचार करता येऊ शकतो. आपल्या व्यवसायात नवे काही तंत्रज्ञान वापरता येईल का किंवा ते कसे, याचा अभ्यास करा. ऑनलाईन कोर्सेस किंवा विविध व्हिडिओंच्या माध्यमातून याविषयी माहिती घेता येऊ शकेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाकडे वेळ असल्याने जाणकार व्यक्तींशी चर्चा करा. फोनद्वारे किंवा फेसबुक लाईव्ह, स्काईप, किंवा इतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची साधने वापरून तुम्हाला दूरवरच्या व्यक्तींशी चर्चा करता येईल. उद्योग-व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने काही कॉन्फरन्समध्ये सहभागी होता येईल. त्याचा भविष्यात नक्की फायदा होऊ शकेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com