esakal | 'निवडणुकांमुळे आर्थिक सुधारणा थांबणार नाहीत': मुख्य आर्थिक सल्लागार 
sakal

बोलून बातमी शोधा

'निवडणुकांमुळे आर्थिक सुधारणा थांबणार नाहीत': मुख्य आर्थिक सल्लागार 

'निवडणुकांमुळे आर्थिक सुधारणा थांबणार नाहीत': मुख्य आर्थिक सल्लागार 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली: देशात निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून नवीन येणाऱ्या सरकार बद्दल उत्सुकता असली तरी सरकार कोणतेही असो देशातील आर्थिक सुधारणा सुरूच राहतील असा विश्वास देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकांमुळे परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास साशंक असतात. मात्र निवडणुकानंतर देखील देशाच्या आर्थिक नीतीत बदल होणार नसल्याने सर्वात वेगाने विकसित होणारी भारतीय अर्थव्यवस्थाच जागतिक गुंतवणूकदारांसाठी पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'ब्लूमबर्ग'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

जागतिक पातळीवर मंदावलेली अर्थव्यवस्था आणि चीन - अमेरिका व्यापार युद्धाचा परिणाम भारतावर देखील होत आहे. परिणामी मार्चअखेर आर्थिक वृद्धीदर 7 टक्के राहण्याची शक्यता आहे. मात्र, मागील काही वर्षात देशांतर्गत झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग 50 बेसिस पॉइंट्सने वाढून 7.5 ते 8 टक्के राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.  

जीएसटीची यशस्वी अंमलबजावणी, दिवाळखोरी कायद्यात झालेला अमूलाग्र बदल आणि महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकार आणि आरबीआयने घेतलेली खबरदारी यांमुळे देशात आर्थिक पातळीवर सकारात्मक वातावरण असल्याचे देखील कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे. 

कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची डिसेंबर महिन्यात पुढील तीन वर्षांसाठी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्रात डॉक्टरेट संपादन केली आहे. 
 

loading image