esakal | लार्जकॅपच्या तुलनेत स्मॉल व मिडकॅपना पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

लार्जकॅपच्या तुलनेत स्मॉल व मिडकॅपना पसंती

आयसीआयसीआय म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी एस. नरेन. ‘सकाळ मनी’शी साधलेल्या संवादाचा हा सारांश.

लार्जकॅपच्या तुलनेत स्मॉल व मिडकॅपना पसंती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोजके अपवाद वगळता, तुलनेने व्यापक शेअर बाजार आकर्षक झाला आहे. आकर्षक मूल्यनिर्धारणामुळे आम्ही लार्जकॅपच्या तुलनेत स्मॉलकॅप व मिडकॅपना पसंती देऊ लागलो आहोत. गुंतवणुकीचा कालावधी किमान पाच वर्षे असेल, अशा पद्धतीने स्मॉलकॅप व मिडकॅपमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला आम्ही देत आहोत. एकरकमी संधींसाठीसुद्धा गुंतवणूकदार मिड व स्मॉल कॅपचा विचार करू शकतात. ज्यांच्या बाजारांतील चढ-उतारांचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी ॲसेटचे विभाजन करणाऱ्या योजनांचा विचार करायला हवा... सांगत आहेत आयसीआयसीआय म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी एस. नरेन. ‘सकाळ मनी’शी साधलेल्या संवादाचा हा सारांश.

प्रश्‍न - उद्योग क्षेत्रात सध्या मंदीसदृश वातावरण दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अलीकडेच काही घोषणा केलेल्या आहेत. त्याबद्दल तुमचे मत काय आहे?
- अर्थमंत्र्यांनी अलीकडील काळात केलेल्या घोषणा सकारात्मक आहेत. त्याचबरोबर या शाश्वत स्वरूपाच्याही आहेत. शिवाय, सरकारद्वारे यंत्रणेत अतिरिक्त रोखता (लिक्विडिटी) राखली जाण्याचा हा प्रकार असावा. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी काही बहुआयामी धोरणात्मक उपाय केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, रिअल इस्टेटच्या किंमती खाली आणून संरचना क्षेत्रातील गुंतवणुकींना वेग देणे, स्पर्धात्मकतेच्या माध्यमातून निर्यात बाजारपेठेतील वाटा वाढविणे, चीनपासून दूर जाऊ लागलेल्या जागतिक मूल्यसाखळ्या आपल्याकडे आकर्षित करून घेणे आणि आयातीऐवजी देशांतर्गत उत्पादनाला प्राधान्य देणे. वाढीला चालना देण्यासाठी या काही उपायांवर अंमलबजावणीचा हा प्रयत्न असू शकतो. जीएसटी दरांत कपातीसाठी चाललेला गोंधळ आणि आणखी दरकपात यांसारखे उपाय तात्पुरत्या काळासाठी उपयुक्त ठरू शकतात, पण भविष्यकाळात त्यामुळे बोजा अधिक वाढेल.  

प्रश्‍न - जागतिक बाजारपेठा तणावाखाली आहेत. या परिस्थितीकडे तुम्ही कसे पाहता?
- जागतिक स्तरावरील हालचाली मंदावल्यामुळे अमेरिकी फेडरलने पुन्हा थोडी दरकपात केली आहे. अमेरिकेने आयातीवर सूडबुद्धीने लादलेल्या शुल्कामुळे अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार पुन्हा तणावाखाली आला आहे. अमेरिका, ब्रिटन, जपान व युरोझोनच्या जीडीपींमध्ये अपेक्षित वाढ न झाल्याने जागतिक मंदीचे सावट सर्वत्र निर्माण झाले आहे. या सर्व मुद्द्यांमुळे जगभरातील गुंतवणूकदार चिंताग्रस्त आहेत. ‘ब्रेक्‍झिट’मधील संभाव्य अनागोंदी, हाँगकाँगमधील विद्रोह व इटलीतील राजकीय अस्थैर्य यांमुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. 

प्रश्‍न - आयएलअँडएफएस संकटानंतर पतजोखीम; तसेच मूल्यनिर्धारणाचे प्रश्न उपस्थित झाल्यामुळे डेट म्युच्युअल फंडांना गेल्या वर्षभरात फटका बसला. मात्र, तुमच्यावर याचा फारसा परिणाम झाला नाही. तुम्ही वेगळे असे काय केले?
- ‘एनबीएफसी’ संकटामुळे व्यवस्थेला कोणत्याही प्रकारचा धोका पोचलेला नाही, असे आमचे मत आहे. वादात सापडलेल्या प्रत्येक डेट पेपरबद्दलची चिंता ही निवडक फंड हाऊसमधील विशिष्ट योजनांपुरती मर्यादित आहे आणि ती संपूर्ण क्षेत्राला लागू होणारी नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आम्ही कदाचित अन्य फंड हाउसच्या तुलनेत थोडी लवकर हालचाल करून आमची स्वत:ची स्वतंत्र जोखीम व्यवस्थापन टीम स्थापन केली आणि या टीमवर पतमूल्यनिर्धारण व मंजुरी प्रक्रियांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी टाकली. रिस्क मॅनेजमेंट टीम ही इन्व्हेस्टमेंट टीमपेक्षा स्वतंत्र आहे आणि या टीमला परताव्यासाठी कोणतीही उद्दिष्टे देण्यात आलेली नाहीत. डेट इन्व्हेस्टमेंट पॉलिसीसंदर्भात सखोल अभ्यास केल्यानंतर क्रेडिटच्या एकात्मिकरणाचा निर्णय करण्यात आला. आम्ही पत गुंतवणूक मंजुरीसाठी; तसेच कोणत्याही डेट योजनेत गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी ‘फोर आइज’  या संकल्पनेचे पालन करतो. पत या मुद्द्याचा सखोल आढावा घेऊन हा निर्णय केला जातो. यासाठी केवळ फंड व्यवस्थापकाच्या निष्कर्षावर अवलंबून राहिले जात नाही. 

प्रश्‍न - तथाकथित एनबीएफसी संकटाचा डेट फंडांवर नक्की कोणत्या प्रकारचा परिणाम झाला?
- बाजारातील चढ-उतार हा जसा इक्विटी गुंतवणुकीतील अविभाज्य भाग आहे, तसाच रेटिंगमधील चढ-उतार हा क्रेडिट गुंतवणुकीतील अविभाज्य भाग आहे, यावर या घडामोडींतून प्रकाश टाकला गेला. विविध रेटिंग डाउनग्रेड्‌समधील फरक ओळखणे गरजेचे आहे. ‘एएए’पासून ‘एए’ हे डाउनग्रेडिंग ‘बीबीबी’ ते ‘बीबी’ या डाउनग्रेडिंगच्या तुलनेत निश्‍चित वेगळे आहे. डाउनग्रेडिंग झाले असले तरीही ‘एए’ हे मानांकन असलेले क्रेडिट तुलनेने उच्च सुरक्षितता क्षेत्रातच आहे, हे समजून घेणे आवश्‍यक आहे. 

प्रश्‍न - बहुतेक इक्विटी म्युच्युअल फंड योजनांचा ‘एसआयपी’ परतावा सध्या उणे किंवा शून्य स्तरावर आहे. यामुळे ‘एसआयपी’ बंद केले जाण्याचे प्रमाण वाढले आहे का?
- म्युच्युअल फंडांच्या ‘एसआयपी’मध्ये गेल्या काही वर्षांत अनेक पटींनी वाढ झाली आहे. म्युच्युअल फंड हा प्रामुख्याने चक्रीय व्यवसायाला अनुकूल आहे. गुंतवणूकदार त्याला पूर्वी मिळालेल्या परताव्याच्या आधारावर पुन्हा गुंतवणूक करतो. या प्रवृत्तीचे उदाहरण नुकतेच मिडकॅप फंड क्षेत्रात दिसून आले. २०१६ मध्ये प्रचंड परतावा मिळाल्यामुळे २०१७ मध्ये मिड कॅप क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली. दुर्दैवाने हे क्षेत्र आज तेवढी चांगली कामगिरी करीत नाही. मोठ्या प्रमाणात नफा मिळवायचा असेल, तर तुलनेने स्वस्त बाजारात गुंतवणूक केली पाहिजे, हे लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

प्रश्‍न - भारतातील शेअर बाजारांबद्दल तुम्हाला काय वाटते? रिटेल गुंतवणूकदारांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी सध्या काठावर थांबून प्रतीक्षा करावी, की पुढे होऊन गुंतवणूक करावी?
- सध्याच्या बाजारात गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम मार्ग ‘एसआयपी’ हा आहे, असे आम्हाला वाटते. मोजके अपवाद वगळता, तुलनेने व्यापक बाजार आकर्षक झाले आहेत. निफ्टी मिडकॅप १०० पी/ई (प्राइस टू अर्निंग) गुणोत्तरात सुधारणा होऊन ते १४.९ पटीवरून (ऑगस्ट २०१८) २५.६ पट (ऑगस्ट २०१९) झाले आहे आणि निफ्टीचा मिडकॅप प्रीमियम १३ टक्‍क्‍यांवरून (ऑगस्ट २०१८) १८ टक्‍क्‍यांच्या डिस्काउंटवर (ऑगस्ट २०१९) गेला आहे. स्मॉलकॅपमध्येही हाच प्रवाह आहे. आकर्षक मूल्यनिर्धारणामुळे आम्ही लार्जकॅपच्या तुलनेत स्मॉलकॅप व मिडकॅपना पसंती देऊ लागलो आहोत. गुंतवणुकीचा कालावधी किमान पाच वर्षे असेल, अशा पद्धतीने स्मॉलकॅप व मिडकॅपमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला आम्ही देतो. एकरकमी संधींसाठीसुद्धा मिड व स्मॉल कॅपचा विचार करता येऊ शकतो. ज्यांच्या बाजारांतील चढ-उतारांचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी ॲसेटचे विभाजन करणाऱ्या योजनांचा विचार करावा. कारण, या योजना इक्विटी व डेट या दोन्ही क्षेत्रांतील बाजारातील संधींचा फायदा उचलण्याच्या दृष्टीनेच तयार केलेल्या असतात.