काॅलेज ड्राॅपआउट तरुणाची स्टार्टअप करत आहे भारतीय लष्कराचे 'संरक्षण'

Combat robotics
Combat roboticsSakal

आजकाल स्टार्टअप, आणि त्यातही गुंतवणूक मिळविणारे यशस्वी नवउद्योजक म्हटलं की आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांमधून उत्तीर्ण झालेल्या तरुण मुलांची नावं आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळतात. पण इंजिनिअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडून आणि कोणत्याही संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भांडवल उभारणी न करता चार तरुणांनी सुरू केलेली स्टार्टअप आपल्या देशाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे काम करत आहे हे सांगितले तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल!

पण हे खरं आहे. गणेश पंडीत सूर्यवंशी या तरुणाच्या नेतृत्वाखाली अन्य काही अभियंत्यांनी एकत्र येत सुरू केलेली काॅम्बॅट रोबोटिक्स इंडिया असे या स्टार्टअपचे नाव. सिमेवर गस्त घालणाऱ्या आपल्या लष्कराच्या जवानांचे जीव वाचविण्यासाठी रोबोटिक्स व अन्य तंत्रज्ञानाच्या मदतीने या तरुणांनी काही उत्पादनांची निर्मिती केली असून त्याचा भारतीय लष्कराला अनन्यसाधारण असा फायदा होत आहे.

गणेश आणि त्याच्या सहकाऱ्यांची स्टोरी तर त्याहून इंटरेस्टिंग आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडिअममध्ये होणाऱ्या वार्षिक आंतरमहाविद्यालयीन रोबोकाॅन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी हे तरुण धडपड करीत असताना त्यांची भेट झाली.

गणेश हा ग्यानबा सोपानराव मोझे काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगचा विद्यार्थी. अभियांत्रिकीच्या पहिल्याच वर्षी तो अनेक विषयात नापास झाला. पण त्याला रोबोटिक्स विषयाची आवड होती. त्यामुळे त्याने काॅलेज सोडून रोबोटिक्ससंबंधी सर्व आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरवात केली. गणेशने त्याच्या सहकार्यांच्या मदतीने एक छोटा रोबो तयार केला होता आणि सहा स्पर्धांमध्ये ते विजेते ठरले होते.

विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी बनवली रोबोटिक्स लॅब

छोट्या स्पर्धांमध्ये मिळालेल्या यशानंतर गणेशला वाटले की मोझे काॅलेजची टीम रोबोकाॅन स्पर्धेमध्ये सहभागी व्हावी. त्यासाठी पैसे व अन्य संसाधनांची आवश्यकता होती. त्यामुळे त्याने थेट काॅलेजचे संस्थापक रामभाऊ मोझे यांची भेट घेतली. सुरवातीला मोझे यांनी गणेशच्या मागणीकडे दुर्लक्ष केले पण एक दिवस गणेश त्यांना घेऊन थेट बालेवाडी स्टेडियममध्ये घेऊन गेला. बाकी काही नको पण काॅलेजमध्ये रोबोटिक्स लॅब सुरू करण्यासाठी छोटीशी जागा द्यावी अशी गणेशची मागणी होती. मोझे यांनी ती मान्य केली.

लॅबमध्ये गणेश व त्याच्या मित्रांनी, तसेच काॅलेजमधल्या हौशी मुलांनी अनेक प्रयोग केले. पाच महिन्यांनंतर मोझे यांनी लॅबला भेट दिली आणि विद्यार्थी करीत असलेल्या प्रयोगांनी भारावून गेले. काॅलेजमध्येच पाच हजार चौरस फुटाची स्वतंत्र जागा आणि रोबोकाॅन आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारी ४० हजार रुपयांचे शुल्क भरण्याचेही त्यांनी मान्य केले. २०१० ते २०१५ या पाच वर्षांच्या कालावधीत या लॅबमध्ये ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रयोग केले, रोबो बनविले आणि तोडलेही!

रोबोकाॅन स्पर्धा सुरू होण्याआधी त्यात सहभागी होण्यासाठी गणेशने काॅलेजमधील विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेतले. २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केला. या इंटरव्ह्यू प्रोसेसमधून युवराज कारोशी नावाच्या तरुणाची गणेशबरोबर ओळख झाली आणि नंतर हाच युवराज काॅम्बॅट रोबोटिक्स स्टार्टअपचा संस्थापक सदस्य झाला.

रोबोकाॅन स्पर्धेमध्ये सहभागी झालेली मोझे काॅलेजची टीम ऑल-इंडिया लेव्हलवर आठव्या क्रमांकावर पोचली. मोझे काॅलेजमधली रोबोटिक्स लॅब नंतरच्या काळात खूपच लोकप्रिय ठरली. तिथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ वाढला. विद्यार्थ्यांनी सुमारे २०० लहान-मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.

कंपनीची स्थापना

दरम्यान, गणेशचा एक मित्र श्रेयस ढोणे याने रोबोटिक्समध्ये इंटरेस्ट असलेल्या मुला-मुलींसाठी इंडियन काॅम्बॅट रोबोटिक्स हा स्टुडन्ट कम्युनिटी प्लॅटफाॅर्म तयार केला होता. या प्लॅटफाॅर्मने प्रेरित होऊन गणेशने स्वतःची कंपनी स्थापन करायचे ठरविले आणि त्यातून ६ फेब्रुवारी २०१५ रोजी जन्म झाला काॅम्बॅट रोबोटिक्स इंडिया या स्टार्टअपचा.

कंपनी स्थापन केल्यानंतर युवराजसोबतच हादी, संदीप भोळे आणि अमोल गायकवाड या तरुण सहकाऱ्यांची साथ गणेशला मिळाली. हादी इलेक्ट्राॅनिक्समध्ये, संदीप पाॅवर इलेक्ट्राॅनिक्समध्ये आणि अमोल मेक-सिम्युलेशन्समध्ये एक्सपर्ट होता. त्यांना मार्गदर्शन मिळाले कर्नल विक्रम महाजन (निवृत्त) यांचे. डिफेन्स सेल्स क्षेत्रामध्ये ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या कर्नल विक्रम हे या स्टार्टअपमध्ये सीओओ म्हणून जोडले गेले.

कंपनी सुरू केल्यानंतर पहिले वर्ष काहीच घडले नाही. बँकेतून कर्ज मिळवायलाही अडचणी आल्या. अखेर गणेशने त्याच्या दुसऱ्या प्राेप्रायटरशीप फर्मच्या नावाने कर्ज मिळविले आणि त्यांचा पहिला वहिला डिफेन्स ग्रेड आणि चासी नसलेला असा आरिस्ता नावाचा रोबो बनविला. या चासीविना चालणाऱ्या मानवरहित वाहनासाठीच्या पेटंटसाठीही अर्ज करण्यात आला आहे.

गणेश म्हणतो, "डिफेन्स क्षेत्राकडे आम्ही उत्पन्नाचे साधन म्हणून बघत नाही. सिमेवर जेव्हा आपले जवान आपले उत्पादन वापरेल तेव्हा त्यांना त्याचा अधिकाधिक फायदा झाला पाहिजे असा विचार करून आम्ही रोबो विकसित केले आहेत. प्रत्यक्ष सिमेवरील परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आले की पाॅवर आणि ग्राउंड क्लिअरन्स या दोन बाबी सर्वात महत्त्वाच्या आहेत. त्या सुधरविण्यासाठी आम्ही ट्रॅक्स आणि चासी नसलेला रोबो बनविण्याचे ठरविले. काही अधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही त्याची चाचणी काश्मीरमध्ये घेतली आणि काही बदल केल्यानंतर अखेर २०१९ मध्ये हा रोबो भारतीय लष्कराच्या सेवेत दाखल झाला.”

“भारतीय लष्कराची आणखी एक गरज लक्षात घेऊन आम्ही एक अनोख्या प्रकारचा एकदम छोटा व हातात बसेल एवढ्या आकाराचा रोबो बनविला आहे. त्याचा वापर दहशतवाद-विरोधी कार्यात तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि मदतकार्यातही होऊ शकतो. या उत्पादनासाठी आम्हाला डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्वाॅलाॅजीकडून आठ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. तसेच वर्ल्ड डिझास्टर काँग्रेस २०१९ मध्ये बेस्ट प्राॅमिसिंग स्टार्टअपचा पुरस्कारही मिळाला आहे,” असेही गणेशने सांगितले.

काॅम्बॅट रोबोटिक्स इंडियाची यशस्वी वाटचाल

- आयआयटी बाॅम्बेच्या सोसायटी फाॅर इनोव्हेशन अँड आन्त्रप्रेन्यूअरशिप (साईन) आणि केंद्राच्या डिपार्टमेंट आॅफ सायन्स अँड टेक्नाॅलाॅजीच्या सहकार्याने इंटेल इंडियाने आयोजित केलेल्या प्लगीन एडिशन २ मध्ये सहभाग

- इंटेल मेकर लॅबकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन निर्मितीसाठी संधी मिळालेल्या ११ स्टार्टअप्समध्ये काॅम्बॅट रोबोटिक्स स्टार्टअपचा समावेश होता.

- पाच पेटंट-पेंडिंग प्रोडक्ट्सची निर्मिती

- फिक्कीने निवडलेल्या टाॅप १० भारतीय डिफेन्स स्टार्टअप्समध्ये समावेश

आरिस्ता रोबोचा भारतीय लष्करासाठी कसा फायदा होतोः

- अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सभोवतालच्या वातावरणाविषयी, शत्रूच्या हालचालींविषयी आणि संभाव्य धोक्यांविषयी रिअल-टाईम माहिती संकलित करणे

- प्रतिकूल परिस्थितीत काॅम्बॅट व्हेईकल्सचा वापर करीत अखंडितपणे लाईव्ह व्हीडिओ स्ट्रिम मिळवणे

- आपत्ती व्यवस्थापन आणि मदतकार्यासाठी

- दहशतवाद-विरोधी कार्यामध्ये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com