असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, अन्य वैयक्तिक कर्जे तसेच क्रेडिट कार्ड देताना
Credit Score
Credit Scoresakal

गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, अन्य वैयक्तिक कर्जे तसेच क्रेडिट कार्ड देताना बँका सर्वप्रथम सबंधिताचा क्रेडिट स्कोअर किती आहे, हे पाहतात आणि तो समाधानकारक असेल तरच कर्ज देऊ करतात. क्रेडिट स्कोअर ७५०च्या पुढे असल्यास तो समाधानकारक समजला जातो. (हा स्कोअर ३०० ते ९००च्या दरम्यान असतो.) क्रेडिट स्कोअर कमी असल्यास आपला अर्ज विचारात घेतला जात नाही आणि विचारात घेतला तरी व्याजाचा दर, तारण, परतफेडीचा कालावधी तसेच जामीन याबाबतच्या अटी जाचक असतात. त्यादृष्टीने आपला क्रेडिट स्कोअर हा समाधानकारक ठेवणे आवश्यक असते. असे असले, तरी बऱ्याचदा हा स्कोअर काही कारणाने कमी होतो. आपला क्रेडिट स्कोअर समाधानकारक राहण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही केल्यास कर्ज मिळण्यात अडचण येणार नाही.

आपण घेतलेल्या कर्जांचे हप्ते वेळेत भरा तसेच आपल्या क्रेडिट कार्ड बिलाचे वेळेत पेमेंट करा. क्रेडिट कार्ड बिलाची रक्कम एकरकमी भरा. हप्त्याने किंवा किमान रक्कम भरण्याचा पर्याय वापरू नका.

एकाच वेळी अनेक ठिकाणी कर्जाची किंवा क्रेडिट कार्डांची चौकशी करू नका. असे केल्याने आपण कर्जासाठी अगतिक आहात, असे दिसून येईल. यामुळे आपला क्रेडिट स्कोअर बिघडू शकतो.

आपण एखाद्या कर्जासाठी सहकर्जदार असाल किंवा जामीनदार असाल, तर अशा कर्जाची नियमित परतफेड होते आहे याची खात्री करा. होत नसेल तर आपला क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो.

आपल्या क्रेडिट कार्डची मर्यादा पूर्ण वापरली जाणार नाही, याची काळजी घ्या. आपल्या कार्ड मर्यादेच्या १५ ते २० टक्क्यांपर्यंत सर्वसाधारणपणे वापर करावा व अपवादात्मक परिस्थितीत संपूर्ण मर्यादेचा वापर करावा. असे केल्याने व संपूर्ण कार्ड बिल देय तारखेच्या आत नियमित भरल्याने आपला क्रेडिट स्कोअर सुधारतो.

काही अपरिहार्य कारणाने क्रेडिट कार्ड बिल वेळेत भरता आले नाही किंवा कर्जाचा हप्ता वेळेत भरता आला नाही, तर शक्य तितक्या लवकर ही रक्कम भरावी, यासाठी गरज पडल्यास आपल्याकडील बँक, शेअर, म्युच्युअल फंड, सोने यात गुंतविलेली रक्कम काढणे श्रेयस्कर असते.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला नियमित परतफेड करता येईल इतक्याच रकमेचे कर्ज घ्या, केवळ मिळतेय म्हणून जास्त तसेच अनावश्यक कर्ज घेऊ नका.

३०० ते ५४९ दरम्यानचा स्कोअर पुअर (खराब), ५५० ते ७०० फेअर (बरा), ७०० ते ७५० गुड (चांगला), ७५० ते ८०० व्हेरी गुड (खूप चांगला) व ८०० च्यापुढे एक्सलन्ट (उत्तम) असे सर्वसाधारण वर्गीकरण असते. पहिल्या दोन प्रकारात कर्ज मिळण्याची शक्यता नसते, तर त्या पुढे जितका आपला स्कोअर चांगला असेल तितकी कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. त्याशिवाय त्यानुसार कर्जाच्या अटी सुलभ असू शकतात.

सध्या सिबिल व एक्सपीरियन हे दोन क्रेडिट स्कोअर प्रचलित असले, तरी प्रामुख्याने बँका सिबिल स्कोअर प्राधान्याने विचारात घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कर्जासाठी किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी ‘सिबिल’च्या वेबसाईटवर लॉग-इन करून आपण आपला क्रेडिट स्कोअर किती आहे हे, पाहू शकतो व त्यानुसार कर्जाचा विचार करता येतो.

(लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com