बॅंक ऑफ मॉरिशसवर सायबर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

दक्षतेमुळे सुमारे 128 कोटी गोठवण्यात यश

दक्षतेमुळे सुमारे 128 कोटी गोठवण्यात यश
मुंबई - कॉसमॉस बॅंकेपाठोपाठ आता मुंबईतील बॅंक ऑफ मॉरिशियसचा (एसबीएम) सर्व्हर हॅक करून सोसायटी फॉर वर्ल्ड वाइड इंटरबॅंक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन (स्वीफ्ट) यंत्रणेचा वापर करून 147 कोटी रुपये विविध खात्यांत वळते करण्यात आले आहेत. युरोपातील तीन व अमेरिकेतील विविध खात्यांवर रक्कम पाठवण्यात आली आहे. दरम्यान, परदेशी बॅंकेच्या दक्षतेमुळे बहुसंख्य रक्कम गोठवण्यात यश आले आहे, पण सायबर चोरट्यांनी त्यातील 19 कोटी रुपये काढल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

"एसबीएम'च्या नरिमन पॉइंट शाखेत कार्यरत ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख राकेश प्रकाश नारायण यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पाच ऑक्‍टोबरला तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, दोन ऑक्‍टोबरला बॅंकेच्या यंत्रणेवर सायबर हल्ला करण्यात आला असून, अनेक अनधिकृत व्यवहारांच्या माध्यमातून 147 कोटी रुपयांची रक्कम काढली आहे. एसबीएममधून आलेली मोठी रक्कम जेपी मॉर्गन बॅंकेत जमा व्हायला लागल्यामुळे त्यांना हा व्यवहार संशयास्पद वाटला. त्यानंतर त्यांनी ही रक्कम असलेल्या शाखेला संपर्क करून याबाबत विचारणा केली. त्या वेळी एसबीएमला त्यांच्यावर सायबर हल्ला करून विविध खात्यांवर रक्कम पाठवण्यात आल्याचे लक्षात आले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

एसबीएमने तत्काळ तपासणी केली असता अनेक परदेशी खात्यांवर रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याचे लक्षात आले. त्यानंतर या सर्व बॅंकांना संपर्क साधून संबंधित रक्कम गोठवण्याची विनंती करण्यात आली. पण कोणतीही रक्कम तीन ते चार दिवस गोठवण्याची मर्यादा या बॅंकांना असल्यामुळे त्यांना याबाबत अधिकृत तक्रारीची प्रत पाठवण्यास सांगण्यात आले. यानुसार एसबीएमच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्याच्या प्रति या बॅंकांना पाठवण्यात आल्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसबीएमचे सर्व्हर हॅक करून स्वीफ्टच्या माध्यमातून ही रक्कम हस्तातरित करण्यात आली आहे. याप्रकरणी आरबीआय व इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पोन्स टीम (सीईआरटी) याप्रकरणी तपास करत आहेत. भारतातील बॅंकांवरील या वर्षातील हा तिसरा हल्ला आहे.

नोस्ट्रो खात्यांवर हल्ला
आरोपींनी नोस्ट्रो (परदेशी रक्कम हस्तांतरित करण्यासाठी बॅंक वापरत असलेले खाते) माध्यमातून ही रक्कम काढली आहे. ही रक्कम लंडन, न्यूयॉर्क पॅरिस येथील चार खात्यांमध्ये वळती करण्यात आली.

तक्रारीनुसार, जेपी मॉर्गन लंडन (जीबीपी खाते), सीटी बॅंक न्यूयॉर्क, जेपी मार्गन चेस बॅंक, न्यूयॉर्क, सोसायटी जनरल, पॅरिस या खात्यांवर रक्कम वळती केली गेली. याशिवाय जपानमधील बॅंक ऑफ इंडिया, टोकियोच्या नोस्ट्रो खात्यावरही बॅंकेतही रक्कम वळती करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे.

ई-मेलही केला हॅक?
पैसे हस्तांतर केल्यानंतर जेव्हा एसबीएमकडून जेपी मॉर्गन बॅंकेला ई-मेल करून पैसे रोखण्यास सांगण्यात आले. त्या वेळी या बॅंकेला सायबर चोरट्यांकडून बॅंक अधिकाऱ्यांच्या नावाने एक ई-मेल आला. त्यात ही रक्कम पुढे पाठवण्यास सांगण्यात आले. पण जेपी मॉर्गनने पुन्हा एसबीएमशी संपर्क केला व चोरट्यांचा हा प्रयत्न असफल ठरला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyber Attack on bank of mauritius