सोन्याची मागणी रोडावली ; वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचा अहवाल 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 November 2019

सोन्याच्या उच्चांकी दराने ग्राहकांचे डोळे पांढरे केल्याने सणासुदीचा हंगाम असूनदेखील या मौल्यवान धातूच्या मागणीत आणि गुंतवणुकीत मोठी घसरण झाल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात म्हटले आहे.

मुंबई: सोन्याच्या उच्चांकी दराने ग्राहकांचे डोळे पांढरे केल्याने सणासुदीचा हंगाम असूनदेखील या मौल्यवान धातूच्या मागणीत आणि गुंतवणुकीत मोठी घसरण झाल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात म्हटले आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने मंगळवारी (ता.5) मुंबईत जुलै ते सप्टेंबर या तिसऱ्या तिमाहीतील सोने आयात आणि खप यांची आकडेवारी जाहीर केली. ज्यात सोने दागिन्यांची मागणी 16 टक्‍क्‍यांनी घटली आहे. चालू वर्षात भारतातील सोन्याची मागणी 8 टक्‍क्‍यांनी कमी राहील, असा अंदाज वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने व्यक्त केला आहे. 

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या "गोल्ड डिमांड ट्रेण्ड्‌स'नुसार तिसऱ्या तिमाहीत सोने मागणीत केवळ तीन टक्के वाढ झाली असून ती 1 हजार 107.9 टनांवर गेली. गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असलेल्या गोल्ड एक्‍स्चेंज ट्रेडेड फंडात (ईटीएफ) 258.2 टनांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बाजारातील व्याजदर कमी होत असल्याने गोल्ड "ईटीएफ'मधील गुंतवणुकीचा ओघ वाढला असल्याचे "वर्ल्ड गोल्ड कौन्सिल'ने म्हटले आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या सोनेखरेदीत तिसऱ्या तिमाहीत 38 टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत रिझर्व्ह बॅंकेचा सोनेसाठा 156.2 टनांनी वाढला आहे. 

दरम्यान, याच तिमाहीत सोन्याचा दर 40 हजारांवर गेला. जागतिक बाजारातील अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली. ऐन सणासुदीत सराफा बाजारावर मंदीचा प्रभाव दिसून आला. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी 16 टक्‍क्‍यांनी घटली आहे. तिसऱ्या तिमाहीत ज्वेलरीची मागणी 460.9 टन असल्याचे अहवालात म्हटले आहे. 
---- 
उच्चांकी दरामुळे चालू वर्षात भारतातील सोने मागणी 8 टक्‍क्‍यांनी घसरून 700 टन राहील. 2016 नंतर ही सर्वात कमी मागणी असेल. 
- सोमासुंदरम पी. आर. व्यवस्थापकीय संचालक, वर्ल्ड गोल्ड कौन्सिल 

----------- 
"गोल्ड डिमांड ट्रेण्ड्‌स'मधील तिसऱ्या तिमाहीतील निष्कर्ष 
- सोने मागणीत केवळ 3 टक्के वाढ, मागणी 1 हजार 107.9 टन 
- "गोल्ड ईटीएफ'मधील सोनेसाठा 258.2 टनांनी वाढला 
- रिझर्व्ह बॅंकेच्या सोनेखरेदीत 38 टक्के घट 
- सोने दागिन्यांची मागणी 16 टक्‍क्‍यांनी घसरली 
- सोने विटा आणि नाण्यांमधील गुंतवणुकीचा ओघ आटला 
- सोनेपुरवठा 4 टक्‍क्‍यांनी वाढला 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for Gold decreases World Gold Council report