जपा फायनान्शिअल ‘हार्टबिट’

जपा फायनान्शिअल ‘हार्टबिट’

‘हेल्थ इज वेल्थ’ हे खरेच आहे. मात्र ‘हेल्थ’ बिघडली आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले तर मात्र ती बिघडलेली ‘हेल्थ’ दुरुस्त करताना आपल्या ‘वेल्थ’ची दाणादाण उडू शकते, हेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. अचानक उद्‌भवणारी एखादी शस्त्रक्रिया, आजारपण किंवा अपघातामुळे हॉस्पिटलमध्ये होणारे खर्च आज सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील आणि आरोग्यसेवेतील प्रगतीमुळे, आधुनिक तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात क्रांतीच झाली आहे. माणसाच्या सरासरी आयुष्यमानात मोठी वाढ झाली आहे हे खरे आहे; पण या सेवेचे मूल्य गगनाला भिडू लागले आहे हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. अशावेळी आपल्याकडे आरोग्य विमा पॉलिसी असेल, तर हा हॉस्पिटल खर्च आपल्याला विमा कंपनीकडून परत मिळून आपली ‘वेल्थ’ सुरक्षित राहू शकते; अन्यथा आकस्मिकपणे उद्‌भवलेल्या या खर्चामुळे आपले आर्थिक नियोजन कोलमडू शकते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे आरोग्य विमा पॉलिसी असणे आवश्‍यक आहेच; पण ती घेताना त्या पॉलिसीचे फायदे, अटी नीट समजावून घेणेही आवश्‍यक आहे.

आरोग्य विमा पॉलिसीसंदर्भात...
आरोग्य विम्याचा फायदा मिळण्यासाठी किमान २४ तास हॉस्पिटलमध्ये दाखल असणे आवश्‍यक असते. केमोथेरपी, डायलिसिस  इत्यादी अपवाद.
डॉक्‍टरांची फी, रूम चार्ज, शस्त्रक्रिया, सेवा-शुश्रुषा, औषधे, विविध चाचण्या इत्यादींवर खर्च झालेली सर्व रक्कम (विमा पॉलिसीच्या विमा रकमेच्या मर्यादेत) परत मिळू शकते. रजिस्ट्रेशन फी, प्रशासनिक खर्च असे अवैद्यकीय खर्च मात्र यासाठी पात्र नसतात.
आरोग्य विम्याच्या दाव्याची तपासणी आणि मंजुरीचे काम ‘थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर’कडे (टीपीए) असते. ज्याची माहिती विमा कंपनी आपणाला देत असते. विमेदार हॉस्पिटलमध्ये दाखल होताच या ‘टीपीए’कडे सूचना देणे आवश्‍यक असते.

ज्या हॉस्पिटलमध्ये ‘कॅशलेस’ सेवा उपलब्ध असते तेथे आपल्या पॉलिसीची माहिती दिली की  खर्चाचे बिल थेट ‘टीपीए’कडे पाठविले जाते आणि विमेदाराला आपले पैसे खर्च करावे लागत नाहीत; अन्यथा विमेदाराने झालेल्या खर्चाविषयीचा ‘क्‍लेम’ दाखल केल्यानंतर तो खर्च परत मिळतो.
‘फॅमिली फ्लोटर’ या योजनेमध्ये एकाच पॉलिसीत विमाधारकाला तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनाही विमासंरक्षण मिळते.

करार एक वर्षाचा असतो. वर्षअखेर नूतनीकरण करणे आवश्‍यक असते. वर्षभरात ‘क्‍लेम’ केला नसेल तर त्याच प्रीमिअममध्ये पाच टक्के वाढीव विमा रकमेचे संरक्षण पुढील वर्षासाठी मिळते.

पॉलिसीसाठी प्रस्ताव दाखल करताना आरोग्याविषयी संपूर्ण खरी माहिती देणे अपेक्षित आहे. 

आरोग्य विम्यासाठी भरलेला प्रीमिअम प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ८० डी’नुसार करसवलतीस पात्र असतो.

पॉलिसी घेण्यापूर्वी असलेले आजार, पॉलिसी घेतल्याबरोबर ३० दिवसात उद्‌भवलेले आजार,  दंतचिकित्सा,  सौंदर्य उपचार इत्यादी परिस्थितीत क्‍लेम देय होत नाही.

एक प्रेमाचा सल्ला
आरोग्य विमा पॉलिसी घेतली तरी आपले आरोग्य सांभाळा. कारण ही पॉलिसी वैद्यकीय खर्च परत देते, आरोग्य नव्हे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com