esakal | गुंतवणुकीची सुवर्ण संधी 
sakal

बोलून बातमी शोधा

investment

शेअरबाजाराने आपटी खाल्ल्यानंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून या सुवर्ण रोख्यांकडे पाहिले जात आहे.कोरोना संकटामुळे सार्वभौम सुवर्ण रोखे ही गुंतवणुकीची सुवर्णसंधी ठरण्याची शक्यता आहे

गुंतवणुकीची सुवर्ण संधी 

sakal_logo
By
दिलीप सातभाई, सीए

रिझर्व्ह बँकेने सार्वभौम सुवर्ण रोख्यांची विक्री 11 मे ते 15 मे दरम्यान करण्याचे निश्चित केले आहे. शेअर बाजाराने आपटी खाल्ल्यानंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून या सुवर्ण रोख्यांकडे पाहिले जात आहे. सध्याच्या कोरोना संकटामुळे सार्वभौम सुवर्ण रोखे ही गुंतवणुकीची सुवर्ण संधी ठरण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

1. भारत दरवर्षी साधारणतः एक हजार टन सोने आयात करतो. यामुळे आयातीसाठी मोठ्या प्रमाणावर डॉलर द्यावे लागतात. डॉलरच्या तुलनेत रुपयांचे  मूल्य जरी एक पैशाने कमी झाले तरी दहा ग्रॅम सोन्यामागे अंदाजे 75 रुपयांनी सोन्याची किंमत वाढते. वर्ष 2014 सालापासून हा विनिमयदर 60 रुपयांपासून 75 रुपयांपर्यंत वाढला आहे व सोन्याची किंमत वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे रुपयाचे अवमूल्यन व जागतिक बाजारात वाढणाऱ्या किंमती आहेत. येत्या पाच वर्षात हे प्रमाण असेच राहण्याची शक्यता आहे. परिणामी सोन्याचे भाव वाढत राहण्याची शक्यता आहे. यामुळे रोखे उत्तम पर्याय ठरू शकतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
 
2. रोख्यांची खरेदी करताना किमान एक ग्रॅम सोने रोखे स्वरूपात खरेदी करणे आवश्यक आहे. व्यक्ती/हिंदू अविभक्त कुटुंबासाठी प्रत्येकी चार किलो सोन्याचे रोखे तर विद्यापीठे, सार्वजनिक न्यासासाठी, धर्मादायी संस्थांसाठी वीस किलो सोन्याच्या रोख्यांची महत्तम मर्यादा ठरविण्यात आली आहे.

3.रोख्यांसाठी सोन्याचा प्रति ग्रॅम 4590 रुपये हा भाव निश्चित करण्यात आला आहे. सध्या सोन्याच्या बाजारभावापेक्षा 50 रुपयांनी तो कमी आहे. 

4. भौतिक सोने खरेदी केल्यास त्यावर कोणतेही व्याज मिळत नाही. मात्र  गुंतवणूकदारांना सुवर्णरोख्यांतील गुंतवणुकीवर दरसाल 2.5 टक्के व्याज दिले जाणार असून ते करपात्र आहे. मुदतपूर्तीनंतर व्यक्तींना मिळणारा दीर्घकालीन भांडवली नफा पूर्णतः करमुक्त करण्यात आला आहे. तर सर्व करदात्यांना या रोख्यांच्या हस्तांतरामुळे येणारा दीर्घकालीन भांडवली नफा  "इंडेक्सेशन'च्या फायद्यासह ठरविता येईल असे स्पष्ट केले आहे.

5.सुवर्ण रोखे कर्ज घेण्यासाठी तारण ठेवता येतात.  

6.सुवर्ण रोखे आठ वर्षे मुदतीचे असून पाच वर्षानंतर बाहेर पडण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. 

7.सुवर्णरोखे खरेदी करण्यास उत्सुक असलेल्या ग्राहकाने त्यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यास या मागणीसाठी ग्राहकाला द्याव्या लागणाऱ्या किंमतीवर सरकार 50 रुपये सवलत देत आहे

8.सुवर्ण रोखे सर्व शेड्युल्ड बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ठराविक निर्देशित पोस्ट ऑफिस आणि मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. 

9. यापुढे हे रोखे 6 ते 10 जुलै, 3 ते 7 ऑगस्ट, व 31  ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान विक्रीस येणार आहेत त्यामुळे या वेळेस शक्य नसणाऱ्या गुंतवणूकदारांना आर्थिक नियोजनाद्वारे सुवर्ण रोख्यात गुंतवणूक करणे भविष्यात शक्य होणार आहे. भावी पिढीसाठी गुंतवणूक नक्कीच फायदेशीर ठरेल. आयुष्यासाठी लागणाऱ्या सोन्याच्या खरेदीचे उत्तम नियोजन करण्यासाठी ही सरकारी योजना असल्याने कोठेही फसवले जाण्याची शक्यता नसल्याने उत्तम गुंतवणूक ठरेल