प्राप्तीकर विवरणपत्र कोणाला भरता येईल? 

tax-return
tax-return

विवरण पत्र आता केवळ पगार, निवृत्ती वेतन, एक घराची मालकी असणाऱ्या, इतर मिळकती मार्फत व्याज, लाभांशाच्या उत्पन्नासह सर्व स्रोतापासून मिळणाऱ्या पन्नास लाख रुपयांपर्यंतच्या करपात्र उत्पन्न असणाऱ्या ‘निवासी व सामान्य निवासी’ असणाऱ्या व्यक्तीसच भरता येईल. २०१९-२० आर्थिक वर्षाचे गृहकर्ज व्याजामुळे होणारे संपूर्ण नुकसान इतर उत्पन्नातून वजा होऊ शकत असल्यास ते नुकसान ‘उणे उत्पन्न रक्कम’ दाखवून या विवरण पत्रात दाखविता येईल. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोणाला हे विवरणपत्र भरता येणार नाही? 
- करदात्यांचे शेतीपासून मिळणारे करमुक्त उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असेल (इतर करमुक्त उत्पन्नास अट नाही). 
- लॉटरी वा घोड्यांच्या शर्यतीतील उत्पन्न. 
- भांडवली नफा किंवा व्यवसायातील उत्पन्न. 
- परदेशात काही मालमत्ता असल्यास. 
- विदेशी कर सवलत मिळणार असेल. 
- काही उत्पन्न परदेशातून आले असेल. 
- उर्वरित स्रोतातून मिळणारे उणे उत्पन्न असेल. 
- कंपनीची संचालक, शेअर बाजारात नोंद नसणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक असल्यास. 
- घरापासून मिळणाऱ्या उत्पन्नाऐवजी नुकसान होत असल्यास व ते पुढील वर्षाकरिता ओढायचे असल्यास. 
- करदाता निवासी व सामान्य निवासी नसेल. 
- ‘अनिवासी’ असल्यास. 
- करदात्यांनी उपरोक्त निर्दिष्ट केलेल्या अटींपैकी एकजरी अट पूर्ण केल्यास त्यांनी आयटीआर-२ भरावयाचा आहे. 

काय आहेत महत्त्वाचे बदल? 
पगारदार, निवृत्ती वेतनधारक व ज्येष्ठ नागरिक वर्गात प्राप्तीकर विभागामार्फत उत्पन्नाची शक्यतो छाननी न होणारे विवरणपत्र म्हणून सर्वात लोकप्रिय असणाऱ्या ‘जावा’ व ‘एक्सेल’ युटीलिटीमध्ये ऑनलाइन व ऑफलाइन मोडमध्ये उपलब्ध असणाऱ्या आयटीआर-१ (सहज) या प्राप्तीकर विवरणपत्रात बदल झाले आहेत. करदात्याने १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या वर्षभरात एक किंवा अधिक वीज जोडांवर आलेल्या सर्व वीज देयकांवर मिळून एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली असल्यास ती रक्कम. वर्षभरात एका किंवा अनेक चालू, बचत, मुदत, आवर्ती खात्यांमध्ये एकत्रितरीत्या एक कोटी रुपयांपेक्षा ‘रोख’ रक्कम भरली असल्यास ती रक्कम. वर्षभरात परदेशी वारीवर दोन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला असल्यास त्याची रक्कम उपलब्ध फिल्डमध्ये भरणे बंधनकारक केले आहे. कोरोनाच्या संकटामुळे करदात्यांना सवलतींचा लाभ मिळवून देण्यासाठी १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२० या चालू २०२०-२१ वर्षाच्या कालावधीत केलेल्या करबचत गुंतवणुकीच्या आधारे २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नातून वजावट मागण्याची मुभा दिल्याची माहिती एका तक्त्याद्वारे द्यावी लागणार आहे. याखेरीज करदात्याकडे पारपत्र असल्यास त्याचा क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. 

घरासंबंधी माहिती भरणे बंधनकारक : 
पगार, निवृत्ती वेतन, करमुक्त नसणाऱ्या सर्व वेतन भत्त्यांची माहिती, करपात्र सुविधा, वेतनेतर उत्पन्न व वजावटी भराव्या लागतील. घर भाड्याने दिले आहे की, स्वतःच राहत आहे याची माहिती द्यावी लागेस आहे. घर भाड्याने दिले असल्यास भाडेकऱ्याचे नाव, त्याचा आधार क्रमांक व पॅन देणे बंधनकारक केले आहे. घराचा ‘पूर्ण पत्ता’ करदाता तेथे राहत नसला तरी देणे आवश्यक झाले आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेला त्या वर्षाचा मालमत्ताकर, बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील व्याज दाखवावे लागणार आहे. 

देणगी व स्वास्थ्य विम्याची माहिती : पूर्वी कलम ८०जी अंतर्गत करदाते प्रत्यक्षात देणगी न देता प्राप्तीकर विवरणपत्रात उत्पन्नातून वजावट घेत होते. अनेक करदाते अनपेक्षितरित्या उत्पन्न करपात्र झाल्यास कर भरावा लागू नये म्हणून खोट्या देणगीची वजावट घेत उत्पन्न करमुक्त करून घेत होते किंवा प्राप्तीकराचा रिफंड घेत होते. यावर उपाय म्हणून दिल्यास ज्यास देणगी दिली आहे त्याचे नाव, पूर्ण पत्ता, शहराचे व राज्याचे नाव, पिनकोड, पॅन, देणगी रोख किंवा इतर मार्गाने दिलेली आहे याची माहिती द्यावी लागेल. कलम ८० अंतर्गत वजावटीस पात्र असलेल्या रकमेची माहिती भरावी लागेल. स्वास्थ्य विम्याच्या रकमेची वजावट घ्यायची असल्यास घरात किती ज्येष्ठ नागरिक आहेत व माता-पित्याचे संदर्भात विम्याची वजावट घेणार आहात काय, याची माहिती भरावी लागेल. 

माहिती दिली नाही तर काय होईल? 
सक्तीच्या बाबी न भरल्यास प्राप्तीकर विवरण पत्र प्राप्तीकर विभागाच्या संकेत स्थळावर दाखलच करता येणार नाही. अपूर्ण माहिती असल्यास रिटर्न अपलोड होत नाही. इतर बाबतीत माहिती न भरल्यास प्राप्तीकर विभाग कलम १३९(९) अंतर्गत विवरणपत्र दोषयुक्त प्राप्तीकर विवरण पत्र म्हणून घोषित होऊ शकते. विहित कालावधीत दोष दुरुस्ती न केल्यास, अवैध म्हणून घोषित केल्यास करदात्यावर विवरणपत्र भरलेच नाही, असे समजून कारवाई करण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com