व्याज दर रेपो दरांशी संलग्न करा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 August 2019

गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे बॅंकांना आवाहन 

मुंबई: पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना मिळावा, यासाठी व्याज दर रेपो दरांशी संलग्न करावेत, असे आवाहन रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सर्व बॅंकांना केले. सोमवारी (ता. 19) "फिक्की'ने आयोजित केलेल्या बॅंकिंग परिषदेत ते बोलत होते. 

सार्वजनिक क्षेत्रातील "एसबीआय'सह बॅंक ऑफ बडोदा, युनियन बॅंक, कॅनरा बॅंक, सिंडिकेट, अलाहाबाद, बॅंक ऑफ इंडिया या बॅंकांनी स्वत:हून व्याजदरांना रेपो दराशी संलग्न केले आहे; मात्र खासगी क्षेत्रातील बॅंकांकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. रेपो दर कपातीच्या तुलनेत बॅंकांनी व्याजदरात मर्यादित कपात केली. त्यामुळे गव्हर्नर दास यांच्याकडून वारंवार या मुद्द्यावर बॅंकांना आवाहन करण्यात येत आहे. 

मागील पतधोरणात "आरबीआय'ने रेपो दरात 0.35 टक्के कपात केली. त्यानंतर सहा सार्वजनिक बॅंकांनी रेपो दराशी व्याजदर सुसंगत केले. बॅंका बुडीत कर्जाच्या संकटातून हळूहळू बाहेर पडत आहेत. आता व्याजदर बाह्य निर्देशांकाशी संलग्न करण्याची वेळ आली आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून या सर्व घडामोडींवर देखरेख ठेवली जात असल्याचे दास यांनी सांगितले. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न झाले पाहिजेत. रेपो कपातीचा लाभ सामान्यांना मिळण्यासाठी बॅंकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा दास यांनी व्यक्त केली. 

व्याजदर रेपो दराशी संलग्न करण्याची प्रक्रिया जलदगतीने होणे आवश्‍यक आहे. बॅंका या पद्धतीचा झपाट्याने अवलंब करतील अशी अपेक्षा आहे. 
- शक्तिकांत दास, गव्हर्नर, आरबीआय 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: do equal interest rate repo rates shashikant das