३१ मार्चपूर्वी हे कराच...

Income-Tax
Income-Tax

आर्थिक वर्ष संपत आले आहे, त्यामुळे पुढील कामे लवकर पूर्ण करा.
प्राप्तिकर विवरणपत्र भरा

मागील आर्थिक वर्ष २०१८-१९चे प्रलंबित प्राप्तिकर विवरणपत्र ३१ मार्चपर्यंत सादर करा. मागील आर्थिक वर्षाचे विवरणपत्र सादर न केल्यास चालू आर्थिक वर्षाचे प्राप्तिकर विवरणपत्र भरता येणार नाही. उशिरा भरल्यामुळे विलंब शुल्क आकारण्यात येईल.

तुम्ही किती कर देणे लागता?
वेतनावरील प्राप्तिकर कंपनीकडून कापला जातो. मात्र, स्वत:चाच व्यवसाय असेल किंवा इतर साधनांमधून (व्यवसाय, भांडवली परतावा, व्याज, घरभाडे आदी) उत्पन्न मिळत असेल तर या उत्पन्नावर तुम्हाला स्वत:च प्राप्तिकर भरावा लागतो. प्राप्तिकराची रक्कम १० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, तर करदात्याला आगाऊ कर भरावा लागतो.

तुमचे वार्षिक उत्पन्न जाणून घ्या
पाच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्यास प्राप्तिकर भरावा लागत नाही. यापेक्षा उत्पन्न वाढल्यास प्राप्तिकर भरावा लागेल. सर्व साधनांमधून मिळणारे तुमचे उत्पन्न लक्षात घ्या. ‘कलम ८० क’अंतर्गत येणाऱ्या करवजावटीच्या विविध तरतुदींव्यतिरिक्त संस्थांना देणग्या, आयुर्विमा, ‘एनपीएस’सारख्या साधनांद्वारे करबचत करता येते.

‘कोव्हिड-१९’साठी सज्ज व्हा
जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोव्हिड-१९’ला जागतिक साथीचा आजार म्हणून घोषित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वत:साठी आणि कुटुंबासाठी आरोग्य विमा घेऊ शकता. आरोग्य विमा फक्त ‘कोव्हिड-१९’साठीच नसून एकूणच वैद्यकीय खर्चाची तरतूद त्यातून होत असते. शिवाय, आरोग्य विम्याद्वारे करवजावटीचा लाभही मिळतो.

शेअर, इक्विटी फंडामधून नफा कमवा
सध्या शेअर बाजारात घसरण झाली आहे. मात्र, बऱ्याच गुंतवणूकदारांना ‘लाँग टर्म कॅपिटल गेन’ झाला असेल. आर्थिक वर्षात एक लाखापेक्षा अधिक नफा झाल्यास तो करपात्र आहे. त्यामुळे शेअर विक्री करून नंतर पुन्हा खरेदी करून खरेदीची मूळ किंमत कमी करता येईल. तुमचे शेअर आणि म्युच्युअल फंड यातील गुंतवणूक ३१ मार्चआधी काढून घ्या आणि नंतर पुन्हा त्यात गुंतवणूक करा. त्यामुळे बाजार पुन्हा वाढल्यास करमुक्त परताव्याचा लाभ घेता येईल.

प्रधानमंत्री वय वंदना योजना
ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या ‘सीनिअर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम’ (एससीएसएस) आणि प्रंतप्रधान वय वंदना योजना (पीएमव्हीव्हीवाय) या दोन योजना आहेत. पंतप्रधान वय वंदना योजनेची वाढीव मुदत ३१ मार्चला संपत आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत १० वर्षे आजच्याच व्याजदराने (८ ते ८.३० टक्के) पेन्शनसारखी रक्कम हमखास मिळू शकते. 

पॅन-आधार जोडणी
३१ मार्चपर्यंत तुमच्या पॅन कार्डशी आधारची जोडणी न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय केले जाणार आहे. जोडणी करणे अत्यंत सोपे असून, ऑनलाइन किंवा एसएमएसद्वारे करता येते.

आयुर्विमा घ्या
आयुर्विम्यासंदर्भात ‘टर्म प्लॅन’ योग्य पर्याय असतात. कमी प्रीमियममध्ये मोठे विमासंरक्षण मिळते. येत्या १ एप्रिलपासून ‘टर्म प्लॅन’च्या प्रीमियममध्ये सुमारे २० टक्के वाढ होण्याची शक्‍यता आहे. आपल्या पश्‍चात कुटुंबीयांच्या आर्थिक स्थैर्यासाठी आयुर्विमा असावा.

पीपीएफमधील किमान गुंतवणूक 
पीपीएफ अकाउंटमध्ये दरवर्षी करावयाची किमान गुंतवणूक ५०० रुपयांची असते. चालू आर्थिक वर्षात पीपीएफ खात्यात पैसे जमा करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च आहे.

गुंतवणुकीचे धोरण 
विशिष्ट योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास परताव्याबरोबरच करात सवलत आणि करवजावट यांचा लाभ मिळतो. कमाल करवजावट मिळवून त्याचा समावेश आधीच्या आर्थिक वर्षात करून घेण्यासाठी काही योजनांमध्ये ३१ मार्चआधी गुंतवणूक केली पाहिजे.

कोरोनाशी लढूया - 'ऑनलाईन'च्या माध्यमातून यातील बरीचशी कामे घरबसल्या सहज पूर्ण करता येतील, तेव्हा घराबाहेर पडू  नका. स्वतःबरोबर इतरांची काळजी घेऊन कोरोना विरुद्धचा लढा यशस्वी करूया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com