esakal | शेअर व म्युच्युअल फंड विक्री 'रडार'वर
sakal

बोलून बातमी शोधा

share-mutual-fund

विकलेल्या प्रत्येक शेअरचा वा म्युच्युअल फंडाचा हिशेब ठेवण्याचे काम करदात्यांना करावे लागणार आहे.थोडक्‍यात,शेअर व म्युच्युअल फंडविक्री आता प्राप्तिकर विभागाच्या ‘रडार’वर आली आहे,हे लक्षात घेतले पाहिजे

शेअर व म्युच्युअल फंड विक्री 'रडार'वर

sakal_logo
By
डॉ. दिलीप सातभाई

गेल्या २०१९-२० या आर्थिक वर्षात शेअर वा म्युच्युअल फंडाची विक्री करणाऱ्या करदात्यांना प्राप्तिकर विवरणपत्र (आयटी रिटर्न) भरताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. शेअर वा म्युच्युअल फंड विक्रीपश्‍चात झालेल्या लघु वा दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभावर भराव्या लागणाऱ्या प्राप्तिकराची रक्कम निश्‍चित करण्यासाठी त्यांच्या प्राप्तिकर विवरणपत्रात प्रत्येक शेअरच्या व म्युच्युअल फंडाच्या विक्रीची तपशीलवार माहिती भरावी लागणार आहे. विकलेल्या प्रत्येक शेअरचा वा म्युच्युअल फंडाचा हिशेब ठेवण्याचे काम करदात्यांना करावे लागणार आहे. थोडक्‍यात, शेअर व म्युच्युअल फंडविक्री आता प्राप्तिकर विभागाच्या ‘रडार’वर आली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. 

प्रकटीकरणाची पातळी उंचावण्याचा हेतू
प्राप्तिकर विभागाला करण्यात येणाऱ्या प्रकटीकरणाची सकारात्मक व विश्वासार्ह पातळी उंचावण्यासाठी काही महत्त्वाची माहिती प्राप्तिकर विवरणपत्र-२ मध्ये १३ रकाने समाविष्ट करून मागविली गेली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्राप्तिकर विभाग विशेषतः अशी प्रकरणे शोधण्यास उत्सुक आहे, की ज्या व्यक्तींनी उच्च मूल्यांचे शेअर बाजारात व्यवहार केले आहेत, परंतु अद्यापही त्यांच्या प्राप्तिकर विवरणपत्रात करपात्र उत्पन्नाची नोंद झालेली नाही किंवा नाममात्र उत्पन्न नोंदविले आहे. 

काय आहेत महत्त्वाचे बदल?
गेल्या २०१९-२० या आर्थिक वर्षात शेअरची वा म्युच्युअल फंडाची विक्री करणाऱ्या करदात्यांनी विक्रीपश्‍चात झालेल्या लघु वा दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभावर भराव्या लागणाऱ्या प्राप्तिकराची रक्कम निश्‍चित करण्यासाठी प्रत्येक शेअरच्या व म्युच्युअल फंडाच्या विक्रीची तपशीलवार माहिती भरावी लागणार आहे. 

विकलेल्या प्रत्येक शेअरचा तसेच म्युच्युअल फंडाचा हिशेब ठेवण्याचे ओझे सांभाळावे लागणार आहे. त्या संदर्भातील सर्व पुरावे जतन करून ठेवावे लागणार आहेत. 
व्यापारी व व्यावसायिकांव्यतिरिक्त शेअर विक्री करणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीला आयटीआर-२ हे प्राप्तिकर विवरणपत्र  भरावे लागते. 

या विवरणपत्रात आता शेअरचे वा म्युच्युअल फंड योजनेचे नाव, संख्या, इंटरनॅशनल सिक्‍युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर (आयएसआयएन) किंवा योजनेचा कोड नंबर वा फोलिओ नंबर, खरेदी आणि विक्री किंमत, तसेच ३१ जानेवारी २०१८ च्या वाजवी बाजारमूल्याची माहिती तपशीलवारपणे भरावी लागणार आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यापूर्वी ई-फाइल फॉर्ममध्ये खरेदी-विक्रीचा सारांश किंवा एकूण दीर्घकालीन भांडवली लाभाची आकडेवारी देण्याचा पर्याय उपलब्ध होता, तसा आता राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक शेअरसाठी वा म्युच्युअल फंडासाठी १३ रकान्यांत तपशील भरण्याची गरज निर्माण झाली आहे.

‘स्टॉक ट्रेडरना मात्र लागू नाही’
अल्पकाळासाठी शेअरची खरेदी-विक्री करणाऱ्या ‘स्टॉक ट्रेडर’ किंवा ‘डे ट्रेडर’ यांना मात्र आपले विवरणपत्र भरताना प्रत्येक शेअरगणिक तपशीलवार माहिती देण्याची गरज नसल्याचे अर्थ मंत्रालयाने नुकतेच (२६ सप्टेंबरला) स्पष्ट केले आहे. एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी बाळगलेल्या शेअरच्या व्यवहारातून झालेला भांडवली लाभ हा व्यावसायिक उत्पन्न म्हणून गृहित धरले जात असल्याने शेअरगणिक माहिती देण्याची आवश्‍यकता नसल्याचे अर्थ मंत्रालयाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. थोडक्‍यात, अशी तपशीलवार माहिती फक्त दीर्घकालीन भांडवली लाभ कराच्या (एलटीसीजी) बाबतीत द्यावी लागणार आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माहिती मागणे कितपत आवश्‍यक? 
अशी प्राप्तिकर विवरणपत्रात मागितली गेलेली माहिती, पूर्वी छाननीच्या वेळी मागितलेल्या गेलेल्या माहितीतील तपशिलाप्रमाणेच असल्याने कर विभागास छाननी न करता सर्व माहिती मिळेलच; पण करदात्यावर विश्वास ठेवण्याचे आश्वासन सरकारने ‘टॅक्‍स-चार्टर’द्वारे दिले आहे. 

प्राप्तिकर विवरणपत्र सुलभीकरण करता-करता वरील माहिती भरून ते क्‍लिष्ट होत नाही का, याचा विचार करावा लागणार आहे. 

सर्वसामान्य करदात्यास हे सर्व करणे शक्‍य 
आहे का, असा प्रश्न मात्र नक्की पडेल, यात शंका नाही. 

करांची जटिल गणना स्वयंचलित पद्धतीने
प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये शेअरनिहाय तपशिलांची नोंद करण्यासाठी विविध रकाने समाविष्ट केले गेले आहेत. करदात्यांकडे असलेल्या अचूक ‘डेटा इनपुट’ची यांत्रिक माहिती त्याला स्वतः विवरणपत्रामध्ये भरावी लागणार आहे, तर भांडवली नफा आणि त्यावरील करांची जटिल गणना विवरणपत्रातील स्वयंचलित पद्धतीने होणार आहे. 

ही योग्य व अपेक्षित माहिती रकान्यात भरण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत ही करदात्यांनी आधीच भरलेल्या कराच्या खर्चावर एक अतिरिक्त ओझे आहे, हे नक्की.
काही करदाते करचोरी करतात म्हणून सर्वच करदात्यांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे? 

स्वयं आर्थिक शिस्त लागल्यास राष्ट्र 
उभारणीत मदत होऊ शकेल, ही धारणा महत्त्वाची ठरावी. 
‘रिटर्न’ भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे. 

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट - सीए आहेत.)