प्रलंबित प्राप्तिकर विवरणपत्र न भरल्यास... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Dilip Satbhai writes about If pending income tax return is not filed

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये मिळालेल्या करपात्र उत्पन्नाचे प्राप्तिकर विवरणपत्र विलंब शुल्क; तसेच दंड, व्याजासह दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२२

प्रलंबित प्राप्तिकर विवरणपत्र न भरल्यास...

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये मिळालेल्या करपात्र उत्पन्नाचे प्राप्तिकर विवरणपत्र विलंब शुल्क; तसेच दंड, व्याजासह दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२२ आहे. आता ही मुदत संपण्यासाठी फक्त बारा दिवस बाकी आहेत. यात मुदतवाढ मिळण्याची शक्यता अजिबात नाही. तरीही प्रलंबित विवरणपत्रांची संख्या मोठी असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीवरून स्पष्ट होते. या संकेतस्थळावरील माहितीनुसार, अपेक्षित १०.७३ कोटी प्राप्तिकर विवरणपत्रांपैकी ७.०२ कोटींपेक्षा अधिक विवरणपत्रे दाखल झाली आहेत. मात्र अजूनही तीन कोटींपेक्षा अधिक विवरणपत्रे प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत अंतिम मुदतीची तारीख उलटून गेली, तर करदात्याला प्राप्तिकर विभागाकडून विवरणपत्र दाखल करण्यासंदर्भात नोटीस येऊ शकते व त्यानंतर करपात्र विवरणपत्र भरावे लागले, तर त्याचे गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अंतिम तारखेच्याआधी विवरणपत्र दाखल करणे हिताचे आहे.

प्राप्तिकर विवरणपत्र वेळेत दाखल करणे केवळ कायदेशीर जबाबदारी नाही, तर करदात्याच्या आर्थिक आयुष्याचा आलेख सरकारी कागदपत्राद्वारे सिद्ध करण्यासाठी; तसेच करदात्याच्या संपत्ती व मालमत्तेच्या वैध स्रोताबाबत तो कायदेशीर व उपयुक्त पुरावादेखील असतो. याखेरीज करदात्याने विवरणपत्र भरले नसल्यास सरकारलासुद्धा करदात्याने भरलेल्या कराचा विनियोग करता येत नाही व अशी रक्कम पडून राहते. देशकार्य होऊ शकत नाही. प्राप्तिकराचा परतावा (रिफंड) पाहिजे असेल, तर उत्पन्न करपात्र असो व नसो, विवरणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे. परदेशात, तर चल/अचल संपत्ती वा आर्थिक हितसंबंध असेल, तर उत्पन्न करपात्र नसतानादेखील विवरणपत्र दाखल करण्याचे कायदेशीर बंधन आहे, हे वास्तव लक्षात घ्यायला हवे.

प्राप्तिकर विवरणपत्र वेळेत दाखल न केल्याने खालील आर्थिक नुकसान संभवते. अद्ययावत (अपडेटेड) विवरणपत्र : अंतिम तारीख उलटल्यास येणाऱ्या ३१ मार्चनंतर दोन वर्षांसाठी उपलब्ध असणारे अद्ययावत प्राप्तिकर विवरणपत्र अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने सक्तीने भरावे लागणार आहे. ते दाखल करताना, विवरणपत्र दाखल करेपर्यंतचे सर्व व्याज, विलंब शुल्क भरावे लागणारच  आहे. सर्वसाधारण प्राप्तिकर विवरणपत्रात प्राप्तिकर उशिरा भरला तरी चालतो; परंतु अद्ययावत विवरणपत्रात देय प्राप्तिकर अगोदर भरल्याशिवाय विवरणपत्र ‘अपलोड’ होत नाही. देय प्राप्तिकर रक्कमदेखील वाढते. अद्ययावत किंवा सुधारीत विवरणपत्र दाखल करण्याचा कालावधी आकारणी वर्ष संपल्यानंतर दोन वर्षे आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे कर आकारणी वर्ष २०२२-२३ असल्याने ३१ मार्च २०२३ नंतर दोन वर्षे हे विवरणपत्र दाखल करता येइल.

विवरणपत्र ३१ मार्च २०२४ पर्यंत दाखल केले, तर प्राप्तिकराची रक्कम, व्याज व २५ टक्के अतिरिक्त कर व ३१ मार्च २०२५ पर्यंत दाखल केल्यास प्राप्तिकराची रक्कम व ५० टक्के अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. म्हणजे सव्वा ते दीडपट प्राप्तिकर अतिरिक्त प्राप्तिकरासह; तसेच सर्व वाढत जाणारे दंड व्याज, विलंब शुल्क भरावे लागेल. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान संभवते. त्यामुळे जे करदाते प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यास विसरले असतील किंवा राहून गेले असेल त्यांनी त्यांचे विवरणपत्र वेळेत भरणे आर्थिकदृष्टया फायद्याचे ठरेल.

विलंब शुल्क : आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी ३१ डिसेंबरनंतर विवरणपत्र भरल्यास व करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांच्या आत असल्यास एक हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागते. करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास पाच हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. देय प्राप्तिकरावर आर्थिक वर्ष संपल्यापासून प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करावयाच्या तारखेपर्यंत १२ टक्के दराने व्याजदेखील भरावे लागणार असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड बसतो.

व्हिसा मिळविण्यात अडचण : ज्या करदात्यांना परदेशी जाण्यासाठी व्हिसा मिळवायचा असतो, ते वेळेत विवरणपत्र भरत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासले जाते. एकदम दोन विवरणपत्र भरणाऱ्यांना कधी कधी व्हिसा मिळत नाही, असा अनुभव आहे.

गृह किंवा वाहन कर्ज मिळविताना येणाऱ्या अडचणी : करदात्यांना गृह व वाहन कर्ज घ्यायचे असेल, तर कोणतीही बँक सर्वसाधारणपणे कर्जदाराचे वार्षिक उत्पन्न प्राप्तिकर विवरणपत्राच्या व इतर निकषांच्या आधारे ठरविते. एखाद्या करदात्याने एकदम दोन विवरणपत्रे भरली असतील, तर व्यावसायिक वार्षिक उत्पन्न फक्त कर्ज काढण्यासाठीच भरले आहे व म्हणून खरे नसावे, असा ग्रह होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे देय तारखेअखेर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे.

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट-सीए आहेत.)