स्मार्ट माहिती : ‘एआयएस’च्या पोतडीत दडलंय काय?

प्राप्तिकर विभाग आता बराच ‘हायटेक’ झाला आहे आणि करदात्यांच्या विविध उत्पन्न स्त्रोतांच्या उगमस्थानावर बारीक लक्ष ठेवून आहे.
AIS
AISSakal
Summary

प्राप्तिकर विभाग आता बराच ‘हायटेक’ झाला आहे आणि करदात्यांच्या विविध उत्पन्न स्त्रोतांच्या उगमस्थानावर बारीक लक्ष ठेवून आहे.

प्राप्तिकर विभाग आता बराच ‘हायटेक’ झाला आहे आणि करदात्यांच्या विविध उत्पन्न स्त्रोतांच्या उगमस्थानावर बारीक लक्ष ठेवून आहे. एकवेळ करदात्यास आपले आर्थिक व्यवहार आठवणार नाहीत, पण त्याची नोंद प्राप्तिकर विभागाकडे असल्याने करदात्याने सावधगिरी बाळगली पाहिजे. करदात्यांसाठी ‘वार्षिक उत्पन्न माहितीपत्रा’ची (एआयएस) योजना तयार करण्यात आली असून, करदात्याने प्राप्तिकर विवरणपत्र भरताना ही माहिती लक्षात घेऊन योग्य उत्पन्न दर्शविणे अपेक्षित आहे. तथापि, याचा विचार न करता ते भरले गेले तर प्राप्तिकर विभागाचा तिसरा डोळा या माहितीच्या आधारे उघडू शकतो, याची नोंद घ्यायला हवी इतकी परिपूर्ण ही माहिती आहे. करदात्यास संपूर्ण विवरणपत्र भरूनच देण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमात या माहितीपत्राचे मोठे योगदान राहणार आहे.

या माहितीपत्रात ‘निवासी’ करदात्यांसंदर्भात पुढील ठळक माहितीचा समावेश आहे-

1) पगाराची रक्कम सवलती भत्त्यासह, करकपात, नियोक्त्याचा ‘टॅन’ आणि कर्मचाऱ्याचा ‘पॅन’, पत्ता.

2) विविध स्त्रोतांकडून मिळालेले म्हणजे जमीन, इमारत, यंत्रसामग्री, घराचे भाडे, त्यावरील करकपात. घरमालकाने ‘पॅन’ दिल्यास भाडेकरुला घरभाडे भत्ता सवलत मिळेल, तर भाडेकरुने घरमालकाचा ‘पॅन’ दिल्यास मालकाचे घरभाडे निश्चित होईल, अशी देखील व्यवस्था आहे.

3) आर्थिक वर्षाच्या शेवटी बचत, मुदत, आवर्ती ठेव खात्यात रु. ५० हजारांपेक्षा जास्त शिल्लक असलेली सर्व बँक खाती. याचा अर्थ प्राप्तिकर विभागाकडे इतर खात्यांची माहिती नाही असे नाही, तर ती येथे दिसणार नाहीत एवढेच.

4) आर्थिक वर्षात, घर, जमीन इमारत यासारखी ३० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीची स्थावर मालमत्ता खरेदी केल्यास अशा खरेदीची माहिती. घर वा इतर स्थावर मालमत्तेच्या विक्रीतून ५० लाखांपेक्षा जास्त मिळालेली रक्कम करकपातीसह. स्थावर मालमत्तेच्या संपादनावर मिळालेली सर्व नुकसानभरपाई. मुदत ठेवींमध्ये कोणतीही रु. १० लाखांची नवी गुंतवणूक वा नूतनीकरण केले असल्यास, अशा रकमा.

5) दहा लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या वाहनाची खरेदी किंमत. वाहन विकले असेल तर विक्रीतून मिळालेली रक्कम.

6) एक लाख किंवा अधिक रुपयांचे शेअर, दोन लाख किंवा अधिक किमतीचे म्युच्युअल फंड युनिट, पाच लाख रुपये किंवा अधिक किमतीचे आरबीआय व इतर बाँड व डिबेंचरची खरेदी. दोन लाख रुपयांच्या किंवा अधिक किमतीच्या रोखीने खरेदी केलेल्या वस्तू आणि सेवांच्या देयकांची माहिती, रोख रक्कम देऊन खरेदी/घेतलेले बँक ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर किंवा बँकर्स चेक किंवा इतर रोख रकमेतील प्रीपेड दस्तऐवज, तसेच सोने वा चांदीच्या विटेची वा दागिन्यांच्या खरेदीची माहिती.

7) बचत व चालू खात्यात वर्षभरात रु. १० लाख/५० लाख किंवा अधिक भरलेली रक्कम. बँक, सहकारी बँक, पोस्ट ऑफिस आदींसारख्या वित्तीय संस्थांद्वारे नोंदविलेल्या इतर खात्यांमधून रोख काढलेल्या मोठ्या रकमा.

8) आर्थिक वर्षात जारी केलेल्या कोणत्याही क्रेडिट/डेबिट कार्डाची माहिती. वर्षभरात दोन लाख किंवा अधिक दिलेली रक्कम.

9) इक्विटी शेअर, डेट इन्स्ट्रमेंट, परदेशात रिअल इस्टेट खरेदीसाठी किंवा परदेशात बँक खाते उघडण्यासाठी, तीर्थयात्रा, वैद्यकीय उपचार, शिक्षण आदींसाठी खरेदी केलेले परकी चलनाचे मूल्य. परदेश दौऱ्याचे पॅकेज किंवा परदेशी प्रवासासंदर्भात दिलेल्या पैशाची रक्कम.

10) शेअर, म्युच्युअल फंडातून मिळालेली लाभांशाची रक्कम, केलेली करकपात.

11) सर्व मुदत, आवर्ती ठेवी. बचत खात्यावर जमा झालेले किंवा प्रत्यक्षात जमा न झालेले; पण बँकांना देय असणाऱ्या व्याजाची रक्कम आणि करकपातीची रक्कम. इतर स्त्रोतांकडून म्हणजे कंपन्या, खासगी संस्था

12) सर्व प्रकारचे न्यास, भागीदारी संस्थांकडून मिळालेले व्याज. करदात्यांस मिळणाऱ्या इतर उत्पन्नाची नोंद येथे असेल. उदा. पुस्तके लिहिण्याची रॉयल्टी, पर्यवेक्षक शुल्क, उत्तरपत्रिका तपासण्याचे शुल्क, व्याख्यान देण्याचे शुल्क, मानधन आदी व त्यावरील करकपात. प्राप्तिकराच्या ‘रिफंड’वर मिळणारे व्याज.

13) करदात्याचे ‘पॅन’, नाव आणि इतर तपशीलावर आधारित सर्व व्यवहारांची शेअर/युनिटची विक्री, एका फंडातून दुसऱ्या फंडात वर्ग केलेली गुंतवणूक. त्यामुळे प्रत्येक शेअरमागे होणारा अल्प वा दीर्घकालीन भांडवली नफा, आंतरराष्ट्रीय सांकेतिक क्रमांक, एक जानेवारी २०१८ रोजी असलेल्या बाजारभावासह विगतवारीने मूल्य. म्युच्युअल फंडाच्या युनिटच्या विक्रीतून होणाऱ्या भांडवली लाभाची रक्कम.

14) भविष्यनिर्वाह निधी खात्यातून पैसे काढल्यास, नियोक्त्याकडून निधीची रक्कम सेवकास दिल्यास, करकपातीसह होणारी रक्कम, करमुक्ततेच्या अटी पूर्ण करणाऱ्या वा न करणाऱ्या आयुर्विमा पॉलिसीच्या जमा रकमा व करकपातीची माहिती. राष्ट्रीय बचत योजनांमधून मुदतीपूर्वी किंवा मुदतपूर्तीच्या वेळी मिळालेले पैसे, लॉटरी/क्रॉसवर्डमधून मिळालेले बक्षीस आणि त्यावर कापलेला कोणताही कर. विमा पॉलिसींच्या विक्रीतून मिळालेले कमिशन व करकपात. लॉटरीच्या तिकिटांच्या विक्रीतून मिळालेले कमिशन. व्यवसायाच्या उत्पन्नाशी संबंधित जमा रकमा, कराराच्या देयकांच्या जमा रकमा, व्यावसायिक किंवा तांत्रिक सेवांसाठी शुल्क, प्राप्त झालेले कोणतेही कमिशन किंवा ब्रोकरेज यांचा समावेश आहे.

15) सर्व ‘टीसीएस’ची रक्कम, करार/कामासाठी केलेले पेमेंट, बँक ड्राफ्ट किंवा पे ऑर्डरची खरेदी, हॉटेलला केलेले पेमेंट, आयुर्विमा हप्ता, क्रेडिट कार्ड आदी. जीएसटी विवरणपत्रातील उलाढाल व वस्तू व सेवाकराची रक्कम.

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट- सीए आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com