स्मार्ट माहिती : म्युच्युअल फंड व शेअरविक्रीवर करआकारणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मार्ट माहिती : म्युच्युअल फंड व शेअरविक्रीवर करआकारणी
स्मार्ट माहिती : म्युच्युअल फंड व शेअरविक्रीवर करआकारणी

स्मार्ट माहिती : म्युच्युअल फंड व शेअरविक्रीवर करआकारणी

म्युच्युअल फंड व शेअरवर विक्रीपश्चात होणारा दीर्घकालीन भांडवली लाभ हा कलम ११२ए अंतर्गत रु. एक लाखावरील नफा विशेष प्राप्तिकर दराअंतर्गत १० टक्के दराने आकाराला जातो. तथापि, दीर्घकालीन भांडवली लाभासह करदात्याचे करपात्र उत्पन्न रु. पाच लाखांपेक्षा कमी असल्यास करदात्यास ‘करसवलत’ मिळून जरी करपात्र उत्पन्न कनिष्ठ नागरिकास अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास किंवा ज्येष्ठ नागरिकास तीन लाख रुपयांपेक्षा अधिक असले तरी कोणताही प्राप्तिकर भरावा लागत नाही. तथापि, असे एकत्रित उत्पन्न रु. पाच लाखांपेक्षा अधिक झाल्यास ‘करसवलत’ मिळत नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

यंदाच्या वर्षी कलम ११२ए अंतर्गत करपात्र होणारा दीर्घकालीन भांडवली लाभ हा करपात्र उत्पन्नात धरताना एकूण दीर्घकालीन लाभातून एक लाख रुपयांचा नफा कलम १० अंतर्गत ‘करमुक्त’ आहे, असे समजून करपात्र उत्पन्नातून चुकीने वजा केले जात आहे. त्यामुळे करदात्याने आकडेमोड केलेल्या देय प्राप्तिकराची रक्कम व प्राप्तिकर विभागाच्या कॅल्क्युलेटरने; तसेच विवरणपत्रात देय दिसणारी प्राप्तिकराची रक्कम भिन्न दिसत असल्याचे निरीक्षण अनेक करदात्यांनी नोंदविले आहे. याचे प्रमुख कारण करदात्यांचा ‘करमुक्त’ व ‘विशेष दराने’ प्राप्तिकर भरण्याच्या पद्धतीमुळे निर्माण झालेला गैरसमज होय.

कलम ११२ए अंतर्गत करपात्र होणारा दीर्घकालीन भांडवली लाभ संपूर्णतः करपात्र आहे, हे लक्षात घ्यायला हवे. तथापि, या लाभावर विशेष प्राप्तिकर दराअंतर्गत कर देय आहे. यात प्रथम हा लाभ एकूण उत्पन्नात समाविष्ट करायचा असून, करपात्र उत्पन्न दोन गटात विभागून प्राप्तिकर काढायचा आहे. दीर्घकालीन लाभ सोडून येणारे उत्पन्न सर्वसाधारण टक्केवारीने, तर दीर्घकालीन लाभ विशेष दराने म्हणजे सर्वसामान्य करदात्याना समजण्यासाठी पहिले रु. एक लाख शून्य दराने व नंतरची राहिलेली नफ्याची रक्कम १० टक्के दराने करपात्र होणार आहे.

उदाहरण - श्री. भूषण यांचे सर्व स्रोतान दीर्घकालीन लाभ सोडून येणारे करपात्र उत्पन्न रु. सव्वाचार लाख आहे व यंदाच्या वर्षी त्यांना रु. दीड लाखाचा दीर्घकालीन लाभ मिळाल्याने करसवलत मिळून एक लाख रुपयांचा ‘माफ भांडवली लाभ’ वजा जाता एकूण उत्पन्न पाच लाखांच्या आत (रु. ४.२५+ रु.१.५०- रु.१.०० लाख) असल्याने करपात्र ठरणार नाही, असा अनेक करदात्यांचा समज होता. यंदा प्रथम करपात्र उत्पन्न काढले जाणार असून, एकूण करपात्र उत्पन्न रु. ५.७५ लाख समजले जाईल व कर सवलत जी रु. पाच लाखांच्या आत असणाऱ्या उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना उपलब्ध आहे, ती मिळणार नसल्याने कनिष्ठ नागरिकास अडीच लाख व ज्येष्ठ नागरिकास तीन लाख रुपयांच्या वरील सर्वसाधारण उत्पन्नावर टक्केवारीनुसार प्राप्तिकर देय होत होतो. रु. अडीच लाखांच्या दीर्घकालीन लाभावर रु. एक लाख सोडून उर्वरित नफ्यावर १० टक्के दराने प्राप्तिकर आकारला जाईल.

या उदाहरणात रु. सव्वाचार लाखावर कनिष्ठ नागरिकास पावणेदोन लाख रुपयांवर व ज्येष्ठ नागरिकास सव्वालाख रुपयांवर ५ टक्के दराने म्हणजे अनुक्रमे रु. ८७५० व रु.७५०० भरावा लागेल. याखेरीस दीड लाख रुपयांपैकी रु. एक लाख वजा जाता उर्वरित ५० हजार रुपयांच्या दीर्घकालीन लाभावर १० टक्के दराने रु. ५००० भरावे लागतील.

निष्कर्ष...

  • जर सर्व स्रोतातून येणारे व दीर्घकालीन भांडवली लाभ धरून येणारे उत्पन्न रु. पाच लाखांपेक्षा कमी असेल, तर सर्व उत्पन्न ‘कर सवलत’ मिळून करपात्र असणार नाही.

  • जर सर्व स्रोतातून मात्र दीर्घकालीन भांडवली लाभ सोडून येणारे उत्पन्न रु. पाच लाखांपेक्षा कमी असेल; परंतु दीर्घकालीन भांडवली लाभ धरून सर्व स्रोतातून येणारे उत्पन्न रु. पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास ‘कर सवलत’ मिळणार नसल्याने सर्वसाधारण उत्पन्नावर कनिष्ठ व ज्येष्ठ नागरिकांना किमान अनुक्रमे अडीच व तीन लाख रुपयांच्या किमान मर्यादेवरील उत्पन्न करपात्र होईल, तर दीर्घकालीन लाभ विशेष दराने म्हणजे पहिला रु. एक लाख शून्य दराने व उर्वरित दहा टक्के दराने करपात्र होईल.

  • थोडक्यात, कलम ११२ए अंतर्गत होणारा दीर्घकालीन भांडवली लाभ हे उत्पन्न मानले जाऊन एकूण करपात्र उत्पन्नात समाविष्ट केले जाईल व नंतर त्यावर एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या नफ्यावर १० टक्के दराने प्राप्तिकर आकारणी होईल.

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट - सीए आहेत.)

loading image
go to top