स्मार्ट माहिती : ‘टीडीएस’ कापणाऱ्याने कर जमा न केल्यास? |TDS | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TDS
स्मार्ट माहिती : ‘टीडीएस’ कापणाऱ्याने कर जमा न केल्यास?

स्मार्ट माहिती : ‘टीडीएस’ कापणाऱ्याने कर जमा न केल्यास?

प्राप्तिकराच्या जलद आणि कार्यक्षम संकलनासाठी प्राप्तिकर कायद्याने करपात्र उत्पन्नाच्या निर्मितीच्या टप्प्यावर करकपात करण्याची प्रणाली समाविष्ट केली आहे. या प्रणालीला ‘टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स’ (टीडीएस) असे म्हणतात. या प्रणालीअंतर्गत उत्पन्नाच्या उत्पत्तीवरच करकपात केली जाते. देयकाकडून कर कापला जाणे आवश्यक आहे, तर देयकर्त्याच्या वतीने त्याने तो सरकारला पाठविणे बंधनकारक आहे. तथापि, जर करकपात करणाऱ्याने प्राप्तिकर विभागाकडे ‘टीडीएस’ जमा केला नसेल किंवा जमा करूनही ‘टीडीएस’ विवरणपत्र दाखल केले नसेल, तर २६एएस किंवा नव्या ‘एआयएस’मध्ये ‘टीडीएस’ची नोंद होऊ शकत नाही. त्यामुळे अशी रक्कम भरल्याचा पुरावा करदात्यास मिळणार नसल्याने त्याचे ‘क्रेडिट’ मिळू शकत नाही. अशा वेळी प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये (इन्कम टॅक्स रिटर्न) अशा ‘टीडीएस’ची माहिती कशी भरावी व त्याचे क्रेडिट कसे मिळवावे, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

कोणत्याही करदात्याने विवरणपत्र भरण्यापूर्वी फॉर्म २६एएस आणि आता नवे एआयएस तपासणे आवश्यक आहे. यामुळे करकपात करणाऱ्याने कापलेल्या ‘टीडीएस’ची नोंद प्राप्तिकर विभागात झाली आहे काय, याची माहिती मिळते. जर काही विसंगती आढळली, तर विवरणपत्र भरण्यापूर्वी ती दुरुस्त करण्याची संधी मिळते. सर्वसाधारणपणे पुढील कारणांमुळे ‘टीडीएस’ क्रेडिट जुळत नाही- १) ‘टीडीएस’ सरकारकडे जमा नाही, २) ‘टीडीएस’ जमा केला आहे, परंतु ‘टीडीएस’ विवरणपत्र अद्याप कर विभागाकडे दाखल केलेले नाही, ३) कपात करणाऱ्याने ‘टीडीएस’ विवरणपत्रामध्ये चुकीचा ‘पॅन’ उद्धृत केला आहे किंवा ४) ‘टीडीएस’ विवरणपत्रामध्ये चुकीची ‘टीडीएस’ रक्कम नमूद केली आहे.

जुळवणीसाठी काय करायला हवे?

वरील चुका केवळ वजावटकर्त्याद्वारेच दुरुस्त केल्या जाऊ शकतात. त्यामुळे करदात्याने त्याच्या वजावटकर्त्याशी संपर्क साधावा आणि सरकारकडे ‘टीडीएस’ जमा करण्याची आणि ‘टीडीएस’ विवरणपत्र दाखल करण्याची विनंती करून लवकरात लवकर चूक दुरुस्त करण्यास सांगावे व त्याचा पुरावा ठेवावा. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यापूर्वी ती दुरुस्त केली आहे ना, याची खात्री करावी. हे केवळ सामोपचारानेच शक्य आहे. कारण करदात्याला, करकपात करणाऱ्याला ‘टीडीएस’ जमा करण्यास भाग पाडण्याचा किंवा कपातकर्त्याने दाखल केलेल्या ‘टीडीएस’ विवरणामध्ये कोणतीही सुधारणा करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसतो.

कपात करणाऱ्याने विनंती नाकारल्यास?

करदाता ‘टीडीएस’ भरल्याच्या समर्थनार्थ ‘आयटीआर’सोबत कोणतीही आधारभूत कागदपत्रे जोडू शकत नाही. सबब, ‘टीडीएस’च्या क्रेडिटचा हक्क विषद करून विवरणपत्र दाखल करणे योग्य ठरावे. ‘आयटीआर’च्या करनिर्धारणाची प्रक्रिया झाल्यानंतर, करदात्याला ‘टीडीएस’ जुळत नसल्याची नोटीस मिळेल. अशी नोटीस मिळाल्यावर, करदात्याला त्याच्या उत्पन्नातून ‘टीडीएस’ योग्यरित्या कापला गेला आहे, हे दर्शविणारे उत्तर आणि सहाय्यक कागदपत्रे प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर दाखल करता येतील. करदाता त्याच्या मागणीचे समर्थन करण्यासाठी वेतनचिठ्ठी, निव्वळ पगार, इतर उत्पन्नाचे क्रेडिट दर्शविणारे बँक स्टेटमेंट दाखल करू शकतो. दाखल केलेले दस्तऐवज बरोबर आढळल्यास प्राप्तिकर अधिकारी करदात्याला ‘टीडीएस’ क्रेडिट देण्यास बांधील आहे. तथापि, त्याने क्रेडिटला परवानगी न दिल्यास, प्राप्तिकर आयुक्त (अपील) यांच्यासमोर अपील दाखल करणे हा एकमेव पर्याय करदात्याकडे उरतो, हे लक्षात घ्यायला हवे.

तरतुदींचे पालन न केल्यास?

‘सीबीडीटी’च्या तरतुदींचे पालन न करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असून, नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर दंड आकारण्यास सुरवात केली आहे. ‘टीडीएस’च्या उशीरा पेमेंटवरील व्याजाव्यतिरिक्त, वजावटदार रिटर्न फाइल करतील त्या दिवसापर्यंत प्रति दिन रु. २०० दंड लागू करण्यात आला आहे. तथापि, दंडाची रक्कम देय असलेल्या ‘टीडीएस’च्या रकमेपेक्षा जास्त असणार नाही, अशी स्पष्ट केले आहे. मूल्यांकन अधिकारी देय तारखेच्या आत रिटर्न भरण्यास विलंब करणाऱ्या व्यक्तीला किमान रु. १०,००० व कमाल रु. १ लाख दंड भरण्याचे निर्देश देऊ शकतात. या कलमाखालील दंड ‘टीडीएस’चे रिटर्न चुकीच्या भरल्याच्या प्रकरणांनाही लागू होतो.

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट- सीए आहेत.)

Web Title: Dr Dilip Satbhai Writes Tds Property Tax

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top