प्राप्तिकर विवरणपत्र कोणाला बंधनकारक? 

tax
tax

प्राप्तिकर कायदा 1961 अंतर्गत जर कनिष्ठ नागरिकाचे करपात्र उत्पन्न रु. अडीच लाख, ज्येष्ठ नागरिकाचे रु. तीन लाख, तर अती ज्येष्ठ नागरिकाचे पाच लाख रुपयांपेक्षा अधिक झाल्यास त्याला किंवा तिला प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स रिटर्न) भरणे बंधनकारक आहे. असे विवरणपत्र न भरल्यास करदात्यावर दंडात्मक दिवाणी व फौजदारी कारवाई होऊ शकते. पगारदारवर्ग देखील यात समाविष्ट आहे, हे महत्त्वाचे. कारण गेल्या वर्षी चेन्नई उच्च न्यायालयाने पगारदार व्यक्तीस करपात्र उत्पन्नावरील कर भरून विवरणपत्र दाखल केले नव्हते म्हणून कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे विवरणपत्र दाखल करणे हे गंभीरतेने घेणे आवश्‍यक आहे. याखेरीस आपले उत्पन्न करपात्र असले तरच विवरणपत्र भरावे लागते, असा सार्वत्रिक गैरसमज आहे. यंदाच्या व गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत हे निकष बदलले असून, उत्पन्न करपात्र नसणाऱ्या करदात्यांनीही काही बाबतीत विवरणपत्र भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची योग्य दाखल घेणे आवश्‍यक आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे असे विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 आहे. 

कोणास बंधनकारक आहे? 
1) यंदा 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत ढोबळ उत्पन्न (करपात्र उत्पन्न नव्हे) किमान मर्यादेपेक्षा अधिक झाल्यास विवरणपत्र भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे कलम 80 अंतर्गत केलेल्या गुंतवणुकीमुळे जर उत्पन्न करपात्र ठरत नसेल, त्यांनाही आता विवरणपत्र दाखल करणे आवश्‍यक ठरेल. उदाहरणार्थ, पगारदार व्यक्तीस तीन लाख रुपयांचे वेतन मिळाले आहे व त्याने साठ हजार रुपये भविष्यनिर्वाह निधी भरला आहे. त्याचे करपात्र उत्पन्न दोन लाख चाळीस हजार होते. ते किमान करपात्र मर्यादेपेक्षा कमी असले तरी त्यास विवरणपत्र दाखल करावे लागेल. तर ज्येष्ठ नागरिकास सव्वातीन लाख रुपये व्याज मिळाले असल्यास व त्यातील कलम 80 टीटीबी अंतर्गत 50 हजार रुपये वजावटीनंतर उत्पन्न करपात्र नसले तरी विवरणपत्र सादर करावे लागेल. 

2) वित्त कायदा 2019 नुसार करदात्याचे दीर्घकालीन भांडवली नफायुक्त एकूण उत्पन्न करपात्र असताना कलम 54 ते 54 जीबी अंतर्गत शेतजमीन, नवे घर, कॅपिटल गेन बॉंड्‌स आदींमध्ये गुंतवणूक करून जर ते किमान करपात्र मर्यादेपेक्षा कमी करण्यात आले असले तरी विवरणपत्र सादर करावे लागेल. उदाहरणार्थ, करदात्याचे ढोबळ उत्पन्न रु. तीन लाख व भांडवली नफा सोडून रु. दोन लाख आहे. भांडवली नफा त्याने कॅपिटल गेन बॉंड्‌समध्ये गुंतविला तरी विवरणपत्र दाखल करावे लागेल. थोडक्‍यात, भांडवली नफ्याचे उत्पन्न विवरणपत्र भरण्यासाठी करमुक्त समजण्यात येणार नाही. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

3) यंदाच्या वर्षी कलम 139 (1) मधील सातव्या तरतुदीनुसार व वर्षभरात करदात्याने एक किंवा अधिक वीजजोडांवर आलेल्या सर्व वीज देयकांवर मिळून एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली असल्यास विवरणपत्र भरणे आवश्‍यक आहे. 

4) वर्षभरात एका किंवा अनेक चालू खात्यांमध्ये एकत्रितरीत्या एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम कोणत्याही मार्गाने सहकारी बॅंकेसह कोणत्याही बॅंकेत भरली असल्यास. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

5) कोणत्याही साधारण निवासी करदात्याची परदेशात मालमत्ता असल्यास किंवा कोणत्याही परदेशी संस्थेत वित्तीय हितसंबंध असल्यास किंवा परदेशात असलेले बॅंक खाते चालविण्याचा वा सही करण्याचा अधिकार असल्यास करदात्यास भारतात कोणतेही उत्पन्न नसले तरी. (या संबंधीची माहिती प्राप्तिकर विभाग सोळा वर्षांत कधीही उकरून काढू शकतो.) 

6) वर्षभरात जर परदेशवारीवर दोन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला असल्यास. तथापि, यात शेजारील देश व धार्मिक कारणासाठी झालेला प्रवास समाविष्ट नाही. 
(लेखक चार्टर्ड अकाउंटंट - सीए आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com