आपला ब्रेक इव्हन पॉईंट किती आहे ?

डॉ.वीरेंद्र ताटके
Monday, 8 June 2020

"ब्रेक इव्हन पॉईंट' मोजणे हे थोडे तांत्रिक आणि आकडेमोडीचे काम असले तरी त्याच्या सोप्या पद्धतीने सामान्य व्यक्तीदेखील उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो.

"ब्रेक इव्हन पॉईंट' अर्थात ना नफा-ना तोटा बिंदू हा उद्योग व्यवसायातील अत्यंत परवलीचा शब्द आहे. विशेषतः नवीन उद्योग व्यवसायाच्या सुरुवातीच्या कालावधीत "ब्रेक इव्हन पॉईंट'ला विशेष महत्त्व येते आणि जो उद्योग व्यवसाय अल्पावधीत हा "पॉईंट' गाठतो त्याचे भविष्य उज्वल आहे, असे संकेत त्यातून  मिळतात . याचबरोबर मंदीच्या काळात जेव्हा व्यवसायाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो तेव्हा देखील प्रत्येक उद्योग- व्यवसाय किमान या "ब्रेक इव्हन पॉईंट'च्या पातळीपर्यंततरी टिकून राहावा यासाठी प्रयत्नशील असतो.

"ब्रेक इव्हन पॉईंट' मोजणे हे थोडे तांत्रिक आणि आकडेमोडीचे काम असले तरी त्याच्या सोप्या पद्धतीने  सामान्य व्यक्तीदेखील उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालण्यासाठी त्याचा   उपयोग करू शकतो. कारण  प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या   "ब्रेक इव्हन पॉईंट'चा ढोबळ अंदाज आला तर तो त्याच्या पैशाचे योग्य नियोजन करू शकतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आता "ब्रेक इव्हन पॉईंट' कसा शोधायचा हे थोडक्यात पाहुयात.
सर्वप्रथम आपले सध्याचे एका महिन्याचे एकूण उत्पन्न किती आहे हे लिहून काढावे. या रकमेतून एका महिन्याचे दैनंदिन खर्च वजा करावेत, असे खर्च मोजताना फक्त दैनंदिन खर्च खर्चाचा म्हणजेच  जीवनावश्यक गोष्टींचा विचार करावा. गृहकर्जावरील किंवा इतर कर्जावरील हप्ता , इतर स्थिर खर्च यांचा विचार करू नये. उत्पन्नातून दैनंदिन खर्च वजा जाता उरलेल्या रकमेला तांत्रिक भाषेत "काँट्रिब्युशन' म्हणतात.

दुसऱ्या बाजूला स्थिर खर्चाची बेरीज करा. यामध्ये  सर्व कर्जावरील हप्ते , घरभाडे आणि इतर स्थिर खर्च यांचा समावेश करावा. "काँट्रिब्युशन'ची रक्कम आणि स्थिर खर्चाची रक्कम एकसारखी असेल तर "ब्रेक इव्हन' पातळीवर आहोत असे समजावे.

इतर लेख व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उदा. तीस हजार रुपये मासिक उत्त्पन्न असणाऱ्या व्यक्तींचे खर्च बारा हजार असतील तर त्याच्या "काँट्रिब्युशन'ची रक्कम अठरा हजार येईल. अशा व्यक्तींचे कर्जावरील हप्ते आणि इतर स्थिर खर्च यांची एकूण रक्कम देखील अठरा हजार रुपयांच्या आसपास असेल तर ती व्यक्ती "ब्रेक इव्हन पॉईंट'च्या आसपास आहे असे समजावे .

"ब्रेक इव्हन पॉईंट' तंतोतंतपणे शोधणे अवघड असले तरी असा नेमका पॉईंट शोधण्याची आवश्यकता नसते . ना नफा-ना तोटा पातळीवर येण्यासाठी अंदाजे किती उत्पन्न कमवावे लागेल याचा साधारणतः अंदाज येण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.

"ब्रेक इव्हन पॉईंट'चा हा अभ्यास अनेक आर्थिक निर्णयांसाठी मार्गदर्शक ठरतो . 
उदा. "काँट्रिब्युशन'ची रक्कम "निगेटिव्ह' म्हणजेच उणे असेल तर ती त्या व्यक्तीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते . कारण "निगेटिव्ह काँट्रिब्युशन' हे मोठ्या आर्थिक समस्येची चाहूल दर्शवत असते. दैनंदिन खर्चाची तोंडमिळवणी करणे सुद्धा अशा व्यक्तीला शक्य होत नाही असे त्यातून दिसते. अर्थात छोट्या कालावधीसाठी ही समस्या असेल तर तात्पुरत्या कर्जाची सोय करून त्यातून मार्ग काढता येतो. मात्र दीर्घकाळासाठी ही समस्या असेल तर उत्पन्न वाढविण्याचे पर्याय शोधणे हाच त्यावर मार्ग असतो कारण जीवनावश्यक गोष्टीवर होणारे खर्च महागाईबरोबर वाढतच जातात .

"काँट्रिब्युशन निगेटिव्ह' नसताना देखील एखादी व्यक्ती "ब्रेक इव्हन पॉईंट'ला पोहचू शकत नसेल तर तो  जीवनशैलीवर होणाऱ्या खर्चाचा परिणाम असू शकतो. त्या व्यक्तीने त्याच्या  आर्थिक क्षमतेपेक्षा अधिक रकमेचे  गृहकर्ज, वाहनकर्ज   घेतले आहे किंवा घरभाड्यावर त्याचा अधिक खर्च होत आहे असे संकेत त्यातून मिळतात. अशा व्यक्तीचे उत्पन्न नजीकच्या काळात जर वाढणार नसेल तर नाईलाजाने अशा  खर्चावर त्याला नियंत्रण मिळवून ते कमी करावेच लागतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे "ब्रेक इव्हन' पातळीच्या वर गेल्याशिवाय गुंतवणुकीला सुरुवात करणे धोकादायक ठरू शकते . कारण "ब्रेक इव्हन' पातळी गाठण्याआधीच गुंतवणूक सुरु केली तर दीर्घ काळात  त्यातील सातत्य राखणे अवघड होते.

थोडक्यात, "ब्रेक इव्हन पॉईंट'ची माहिती असेल तर अनेक आर्थिक निर्णय घेण्यासाठी त्याची आपल्याला मदत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr virendra tatake article about break even point

Tags
टॉपिकस
Topic Tags: