स्मार्ट सुविधा : म्युच्युअल फंड उद्योगाचे पाऊल पडते पुढे...

भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात काळानुसार स्थित्यंतरे आली आहेत. अगदी सुरवातीला गुंतवणुकीचे फॉर्म लेखी स्वरूपात पूर्ण करून संबंधित म्युच्युअल फंड कार्यालयात द्यावे लागत.
Mutual Funds
Mutual FundsSakal

भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात काळानुसार स्थित्यंतरे आली आहेत. अगदी सुरवातीला गुंतवणुकीचे फॉर्म लेखी स्वरूपात पूर्ण करून संबंधित म्युच्युअल फंड कार्यालयात द्यावे लागत. त्यानंतर या क्षेत्रात अनेक बँका उतरल्या; तसेच अनेक सल्लागार त्यांची सेवा पुरवू लागले. त्यामुळे गुंतवणूकदारांचे काम थोडे सोपे झाले. नवी गुंतवणूक करताना प्रत्येक वेळी फॉर्म भरणे आणि तो बारकाईने तपासणे हे काम किचकट असायचे. त्यात काही चुका झाल्या तर गुंतवणुकीत अडथळे यायचे. त्यानंतरच्या काळात डिमॅट खात्यावर म्युच्युअल फंडांच्या व्यवहारांची सुविधा सुरु झाल्याने कागदपत्रे सांभाळत बसायची कटकट बंद झाली आणि व्यवहार सुलभ झाले.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडातील व्यवहार अजून सोपे करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले गेले आहे आणि त्याचा प्रारंभ नुकताच झाला. म्युच्युअल फंड सेंट्रल (MFC) असे या नव्या व्यासपीठाचे नाव आहे. या वर्षाच्या जुलै महिन्यात ‘सेबी’ने याविषयी देशातील सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांना आवाहन केले होते, ज्याची अंमलबजावणी यानिमित्ताने होत आहे.

आपल्या देशातील म्युच्युअल फंड व्यवसायाच्या एकूण मालमत्तेने नुकताच ३६ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला. दर महिन्यात अनेक नवे गुंतवणूकदार या उद्योगात जोडले जात आहेत, ज्यामध्ये मोठ्या शहरांबरोबरच छोट्या गावातील गुंतवणूकदारांचादेखील सहभाग आहे. अर्थात यापैकी अनेक गुंतवणूकदार हे ऑनलाईन व्यवहारांचे जाणकार नसतात, हे लक्षात घेऊन MFC हे सोयीचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. याच्या पहिल्या टप्प्यात गुंतवणूकदारांना बिगर आर्थिक कामे यावरून करता येतील. उदाहरणार्थ, आपल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे स्टेटमेंट डाउनलोड करणे, आपला ई-मेल; तसेच मोबाईल क्रमांक अपडेट करणे, आपल्या बँक खात्यातील बदल नोंदविणे, आपला बदललेला पत्ता अद्ययावत करणे आदी.

या सुविधेचा दुसरा टप्पा या वर्षाच्या डिसेंबरमध्ये कार्यान्वीत होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार त्यांचे म्युच्युअल फंडांचे खरेदी-विक्री यासारखे सर्व आर्थिक व्यवहार या व्यासपीठावरून करू शकतील. या सुविधेचा वापर करून गुंतवणूकदार कोणत्याही म्युच्युअल फंडातील व्यवहार एकाच ठिकाणी करू शकतील. गुंतवणूकदाराला त्याचा मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याचा तपशील देऊन हे व्यवहार करणे शक्य होणार आहे. याशिवाय एखाद्या गुंतवणूकदाराचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वारसदारांच्या नावे जमा होणे MFC मुळे सोपे होणार आहे. या नव्या सुविधेतून केले जाणारे व्यवहार पूर्णपणे सुरक्षित असतील, याची खात्री गुंतवणूकदारांचे हीत जपण्याला सर्वोच्च प्राधान्य देणारी ‘सेबी’ ही संस्था घेईल, यात शंका नाही.

आगामी काळात भारतीय म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचे MFC हे व्यासपीठ ठरेल, अशी चिन्हे दिसत आहेत. भारतीय म्युच्युअल फंड उद्योगातील हे महत्त्वाचे पाऊल आहे.

(लेखक म्युच्युअल फंडाचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com