म्युच्युअल फंड : एका फंडाची गोष्ट

इक्विटी म्युच्युअल फंडाच्या युनिटचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) पाहून गुंतवणूक करू नये, असे तज्ज्ञ सांगतात.
NAV
NAVSakal

इक्विटी म्युच्युअल फंडाच्या युनिटचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) पाहून गुंतवणूक करू नये, असे तज्ज्ञ सांगतात. ‘एनएव्ही’ जास्त म्हणजे त्याचा परतावा चांगला आणि याउलट कमी ‘एनएव्ही’ म्हणजे कमी परतावा, असा समज करून घेणे चुकीचे आहे, असेही हे जाणकार सांगतात. असे असले तरी सुरवातीला दहा रुपये ‘एनएव्ही’ असलेल्या एखाद्या इक्विटी फंडाची ‘एनएव्ही’ जेव्हा दोन हजार रुपयांची पातळी गाठते, तेव्हा ती त्या फंडाच्या उल्लेखनीय कामगिरीची पावती आहे, असे म्हणायला हरकत नाही.

शेअर बाजारातील एखाद्या कंपनीच्या शेअरचा बाजारभाव दोन हजार रुपये असण्याची घटना अनेकदा घडते. मात्र, एखाद्या इक्विटी म्युच्युअल फंडाची ‘एनएव्ही’ त्या पातळीला पोचणे त्या मानाने दुर्मीळ आहे. भारतीय शेअर बाजाराला खूप जुना इतिहास असला तरी भारतीय म्युच्युअल फंड व्यवसायात साधारणतः वर्ष १९९३ मध्ये विविध कंपन्यांनी प्रवेश करायला सुरुवात केली. त्यातही सुरवातीच्या काळात बाजारात येणाऱ्या नव्या म्युच्युअल फंडांची संख्या खूप कमी होती. १९९३ आणि त्यानंतरच्या दोन-तीन वर्षांत बाजारात आलेले आणि सातत्याने उत्तम कामगिरी करणारे म्युच्युअल फंड देखील कमी आहेत. यामुळेच दोन हजार रुपयांच्या ‘एनएव्ही’च्या आसपास पोचलेले इक्विटी फंड कमी आहेत. त्यामुळे अशा फंडांची कामगिरी उल्लेखनीय वाटते. अशा फंडांपैकी एक फंड म्हणजे निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड!

फंडाची कामगिरी कशी?

ऑक्टोबर १९९५ मध्ये बाजारात आलेल्या निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडांच्या ‘एनएव्ही’ने (ग्रोथ ऑप्शन) अलीकडेच दोन हजार रुपयांच्या पातळीला स्पर्श केला. बाजारात येताना या फंडांची ‘एनएव्ही’ दहा रुपये प्रति युनिट होती. मात्र, गेल्या २६ वर्षांत सरासरी २२ टक्के वार्षिक परतावा देण्याची देदीप्यमान कामगिरी करीत त्याचा बाजारभाव दोन हजार रुपये प्रति युनिट या पातळीला पोचला. याचाच अर्थ म्हणजे या फंडात सुरवातीला गुंतविलेल्या एक लाख रुपयांचे आजचे बाजारमूल्य अंदाजे दोन कोटी रुपये आहे. या फंडात गुंतविलेल्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीची कामगिरी देखील अशीच देदीप्यमान आहे. ज्या गुंतवणूकदाराने या फंडात गेल्या वीस वर्षांत दरमहा १० हजार रुपये ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतविलेले आहेत, त्याच्या एकूण २४ लाख रुपये गुंतवणुकीचे बाजारमूल्य तब्बल तीन कोटी रुपयांच्या आसपास आहे. फंडाच्या उत्तम कामगिरीमुळे गुंतवणूकदारांनी या फंडात भरभरून गुंतवणूक केली आहे. त्यामुळेच या फंडाची मालमत्ता सुमारे ११ हजार कोटी रुपये एवढी प्रचंड आहे. मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये या फंडाची प्रामुख्याने गुंतवणूक आहे. यामुळे अल्पकाळात या फंडाच्या कामगिरीत हेलकावे दिसले तरी दीर्घकाळात त्याची कामगिरी उत्तम झाली आहे.

जेव्हा जेव्हा शेअर बाजार कोसळला, तेव्हा तेव्हा या फंडातील गुंतवणुकीवर तोटा दिसला होता. अशावेळी अगतिक होऊन काही गुंतवणूकदारांनी त्यातील गुंतवणूक काढून घेतली. मात्र, चाणाक्ष गुंतवणूकदारांनी त्या परिस्थितीकडे संधी म्हणून पाहिले आणि त्या फंडात एकरकमी गुंतवणूक केली. अगदी अलीकडील उदाहरण द्यायचे झाले, तर मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या साथीमुळे घाबरलेला भारतीय शेअर बाजार जेव्हा कोसळला, तेव्हा या फंडाची ‘एनएव्ही’देखील कोसळली होती. त्यावेळी ज्या गुंतवणूकदारांनी या कमी झालेल्या ‘एनएव्ही’नुसार गुंतवणूक केली, त्यांना त्याचा फायदा आता दिसत आहे. या फंडात मार्च २०२० मध्ये गुंतविलेल्या एक लाख रुपयांचे सध्याचे बाजारमूल्य जवळजवळ अडीच लाख रुपये झाले आहे. म्हणजेच दीड वर्षाच्या कालावधीत अशा गुंतवणूकदारांनी तब्बल ८५ टक्के वार्षिक दराने परतावा मिळविला. अर्थात प्रत्येकवेळी असा बाजाराचा तळ ओळखून गुंतवणूक करणे शक्य नसते. म्हणूनच अशा फंडात नियमितपणे ‘एसआयपी’च्या मार्गाने गुंतवणूक करीत राहणे आणि त्या जोडीला बाजार कोसळला, की शक्य असेल तेवढी एकरकमी रक्कम गुंतवत राहणे सूज्ञपणाचे ठरते.

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाची ही माहिती केवळ उदाहरणादाखल दिलेली आहे. अशाच प्रकारचे अनेक फंड बाजारात गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. आवश्यकता आहे, त्यात दीर्घकाळ नियमितपणे गुंतवणूक करण्याची!

(लेखक म्युच्युअल फंडाचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com