अर्थवेध : ऊर्जा क्षेत्रातील ‘पुणेरी पॉवर’

जयंत देव हे भारतीय ऊर्जा क्षेत्रातील आदराने घेतले जाणारे नाव आहे. विविध क्षेत्रांचे ज्ञान असलेले हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व पुणेकर आहे.
अर्थवेध : ऊर्जा क्षेत्रातील ‘पुणेरी पॉवर’

जयंत देव हे भारतीय ऊर्जा क्षेत्रातील आदराने घेतले जाणारे नाव आहे. विविध क्षेत्रांचे ज्ञान असलेले हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व पुणेकर आहे. शेअर बाजारात उत्तम कामगिरी करणाऱ्या इंडियन एनर्जी एक्स्चेंज लि. (आयईएक्स) या कंपनीचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारीपद आणि व्यवस्थापकीय संचालकपद त्यांनी भूषविले आहे. सध्या या कंपनीचा शेअर बाजारात गाजत आहे. या निमित्ताने या कंपनीची स्थापना आणि कामगिरी याविषयी माहिती करून घेण्यासाठी त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

प्रश्न - इंडियन एनर्जी एक्स्चेंज या कंपनीच्या स्थापनेमागील भूमिका काय होती?

उत्तर : वर्ष २००३ मध्ये इलेक्ट्रिसिटी ॲक्ट मंजूर झाला. भारताला बारमाही लोडशेडिंगमधून बाहेर काढणे आणि सर्वांना स्पर्धात्मक किमतीत विनाखंडीत वीज उपलब्ध करून देणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश होता. खासगी क्षेत्राच्या सहभागातून वीजनिर्मिती करणे आणि स्पर्धात्मक बाजाराद्वारे त्याची विक्री करणे याला या कायद्याने परवानगी मिळाली. विजेचे स्वरूप नाशवंत आहे, हे लक्षात घेऊन ग्राहकांसाठी ऑनलाइन बाजारपेठ तयार करण्याचा विचार केला. आपल्या देशात ‘पॉवर एक्स्चेंज’ असावं, ही संकल्पना मी मांडली आणि वर्ष २००५ ते २००८ या काळात त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. यातूनच इंडियन एनर्जी एक्स्चेंज लि.ची स्थापना करण्यात आली. मला या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक होण्याचा मान मिळाला. आजकाल बाजारात आपण कोणतीही वस्तू ऑर्डर करून लगेच खरेदी करू शकतो, त्याचप्रमाणे विजेची मागणी करून ती अगदी तासा-दीड तासात मिळणे हे या कंपनीच्या स्थापनेमुळे शक्य झाले. दुसऱ्या बाजूला लहरी निसर्ग आणि हवामानात सातत्याने होणारे बदल यामुळे होणाऱ्या वीज उत्पादनातील चढ-उतारांवर यशस्वी मात करणे देखील या कंपनीच्या स्थापनेमुळे शक्य झाले आहे.

प्रश्न - कंपनीच्या कामगिरीविषयी आपण काय सांगाल?

उत्तर : भारतातील पहिले ‘पॉवर एक्स्चेंज’ सुरु करण्याचा मान या कंपनीला मिळाला. स्थापनेपासूनच अतिशय अत्युच्य कार्यक्षमतेसह आणि कोणत्याही त्रुटीशिवाय कंपनीचे कामकाज यशस्वीरित्या सुरु आहे. या कंपनीच्या माध्यमातून अतिरिक्त निर्माण झालेली वीज विकून त्या विजेचा योग्य वापर करणे शक्य झाले आहे. मुळातच वीज हा अत्यंत नाशवंत घटक असल्यामुळे तयार झालेली वीज लवकरात लवकर वापरणे आवश्यक असते. या एक्स्चेंजमुळे ते शक्य झाले आहे. दुसऱ्या बाजूला अतिरिक्त विजेची विक्री करणे शक्य झाल्याने वीजनिर्मितीमधील निश्चित खर्चाचा (फिक्स्ड कॉस्ट)उपयोग अधिक कार्यक्षमतेने करणे शक्य झाले आहे. आपल्या देशातील व्यवहारांसोबतच भूतान, नेपाळ, बांगलादेश या शेजारील देशांशी कंपनीचे व्यवहार सुरु झाले आहेत, तर श्रीलंकेत ‘ट्रेडिंग’ सुरु करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

कंपनीच्या शेअरने गेल्या दोन वर्षांत शेअर बाजारात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल काय सांगाल?

उत्तर : वर्ष २०१७ मध्ये कंपनीचा ‘आयपीओ’ बाजारात आला. कर्जमुक्त ताळेबंद आणि कंपनीची उत्तम कामगिरी यामुळे कंपनीचा शेअर पहिल्यापासूनच गुंतवणूकदारांना आकर्षित करत आला आहे. कोविड महासाथीचे संकट निवळण्याची चिन्हे दिसत असल्यामुळे वाढलेली विजेची मागणी आणि सकारात्मक सरकारी धोरण यामुळे येणाऱ्या काळात कंपनीची आर्थिक कामगिरी अधिक भक्कम होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यातच वायदा बाजारातील व्यवहारात कंपनीच्या शेअरमधील व्यवहारांना परवानगी मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांचा कंपनीच्या शेअरकडे ओढा वाढला आहे. कंपनीच्या व्यवहाराचे स्वरूप ‘बी टू बी’ (बिझनेस टू बिझनेस) असल्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सुरवातीला कंपनीविषयी फारशी माहिती नव्हती. मात्र, शेअरच्या चमकदार कामगिरीमुळे आता सर्वसामान्य गुंतवणूकदारांना देखील या कंपनीची माहिती झाली आहे.

कंपनीच्या स्थापनेत आपला सिंहाचा वाटा होता. पुणेकर म्हणून याविषयी आपल्या भावना काय आहेत?

उत्तर : वीज तुटवड्यामुळे होणारे लोडशेडिंग आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल यातून सुटका होण्यास या कंपनीच्या स्थापनेमुळे मोठी मदत झाली आहे. त्यामुळे या कंपनीची स्थापना करणे ही एक प्रकारची समाजसेवा होती, असे मी मानतो. कंपनी स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये आणि सुरवातीच्या खडतर काळात कंपनीचे प्रतिनिधीत्व करण्याचे भाग्य मला मिळाले. माझ्या करियरमध्ये पुणे शहराचे मोठे योगदान आहे. त्यामुळे येथील शैक्षणिक संस्था आणि नागरिक यांच्याविषयी माझ्या मनात कायमच आदराचे स्थान आहे.

‘आयईएक्स’च्या शेअरच्या कामगिरीची वैशिष्ट्ये

(शेवटचा बंद भाव - रु. ७३७, वर्षभरातील नीचांक व उच्चांक - रु. १८१ व रु. ९५६)

1) शेअरच्या बाजारभावात गेल्या एका वर्षात चौपटीहून अधिक वाढ

2) संपलेल्या तिमाहीचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्ब्ल ६९ टक्के वाढ

3) कंपनीच्या शेअरने नुकतीच ‘अप्पर सर्किट’ला पोचण्याची मजल मारली

4) कंपनीने २ः१ या प्रमाणात बोनस शेअर देण्याचे ऑक्टोबर महिन्यात जाहीर केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com