आर्थिक वर्ष संपताना...

Share-Market
Share-Market

येत्या ३१ मार्च रोजी चालू आर्थिक वर्ष २०१८-१९ ची सांगता होईल. त्यासाठी आता अवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे. या आठवड्यात काय-काय करता येईल, त्यावर एक नजर टाकूया.

आर्थिक वर्ष २०१८-१९ संपण्यापूर्वी काही गोष्टी करणे आवश्‍यक असते. तसे केल्याने काय होऊ शकते, याची कल्पना अनेकांना नसते. म्हणून या आठवड्यात करता येण्यासारख्या गोष्टींची दखल घेणे आज महत्त्वाचे ठरणारे आहे. 

शेअर बाजारात नोंदणी झालेले समभाग आणि समभागाधिष्टित म्युच्युअल फंड योजनेच्या युनिटविक्रीमुळे झालेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्याच्या करमुक्त युगाचा आता अस्त होईल. एक एप्रिल २०१८ पासून अशा प्रकारच्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यापैकी पहिल्या एक लाख रुपयांवर कर पडणार नाही. परंतु, त्यापेक्षा अधिक झालेल्या उर्वरित नफ्यावर १० टक्के दराने करआकारणी होईल. हा नियम झाल्यानंतरचे पहिले आर्थिक वर्ष ३१ मार्च २०१९ रोजी संपत आहे. त्यामुळे आपणास अशा प्रकारचा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला नसेल किंवा झालेल्या नफ्याची रक्कम एक लाखांपेक्षा कमी असेल, तर आपण एक लाखांपर्यंतचा नफा ३१ मार्चपूर्वी कमवावा. असे केल्यास त्यावरील १० टक्के कराच्या रकमेची बचत होईल. 

आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये कलम ८० सी, ८० जी आदी वजावटींचा विचार न करता मिळविलेल्या ढोबळ उत्पन्नाची रक्कम रु. २,५०,००० पेक्षा अधिक असलेल्या व्यक्तीस आपल्या उत्पन्नाचे विवरणपत्र भरणे अनिवार्य आहे.

विवरणपत्र दाखल करण्याची मुदत संपली आहे. परंतु, ते अद्याप भरले नसले, तर आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या उत्पन्नाचे विवरणपत्र ३१ मार्च २०१९ पर्यंत दाखल करावे. तसे न केल्यास संबंधित व्यक्तीस नंतर विवरणपत्र भरता येणार नाही. 

कलम ८० सी नुसार करता येणाऱ्या गुंतवणुकीची खात्री करा. ती मर्यादा पूर्ण केली नसल्यास बाकी रक्कम पात्र योजनांमध्ये तातडीने गुंतवावी लागेल. 
२०१८-१९ मध्ये कमविलेल्या उत्पन्नावरील प्राप्तिकराच्या रकमेमधून करकपातीची रक्कम वजा जाता उर्वरित रक्कम रु. १०,००० पेक्षा अधिक असल्यास ‘आगाऊ कर’ भरणे आवश्‍यक असते. आगाऊ कराची रक्कम अद्याप भरली नसल्यास अगर कमी भरलेली असल्यास असा प्राप्तिकर ३१ मार्च २०१९ पर्यंत भरावा; अन्यथा त्या रकमेवर एक टक्का दराने व्याजाची आकारणी होत असते. 

बॅंकेच्या ठेवीवरील व्याज, घरभाडे, सल्ला शुल्क, दलाली आदी उत्पन्नामधून करकपात होत असते. आपल्या उत्पन्नातून करकपात झालेली असल्यास संबंधित व्यक्तीस आपला ‘पॅन’ कळविणे सक्तीचे आहे. तसे न केल्यास रु. १०,००० दंडआकारणी होऊ शकते. तसेच, करकपातीच्या रकमेची वजावट प्राप्त होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. 

व्यावसायिकांनी आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी असलेल्या शिल्लक मालाची व रोख रकमेची; तसेच मालमत्तेची प्रत्यक्ष मोजणी करावी. देणेकरी, गिऱ्हाईक, बॅंका आदींच्या खात्यामधील बाकी रकमेची रुजवात घालून ठेवावी. त्यामुळे आपले हिशेब पूर्ण करण्यामध्ये अडचणी निर्माण होणार नाहीत. 

अशा प्रकारे आर्थिक वर्षअखेरीपर्यंत करण्याच्या कामांची यादी आजच करून ती ३१ मार्चपूर्वीच पूर्ण करावीत आणि आपल्या उत्पन्नास लागणारी गळती थांबवावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com