''आरईआयटी''चे गुंतवणूकदारांकडून स्वागत; 308 रुपयांवर नोंदणी 

वृत्तसंस्था
सोमवार, 1 एप्रिल 2019

मुंबई: ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ने (आरईआयटी) भारतात पहिल्यांदाच सादर केलेल्या पब्लिक इश्‍यूची शानदार नोंदणी झाली आहे. "एम्बसी आरईआयटी'ची मुंबई शेअर बाजारात 308 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या इश्यू प्राइसपेक्षा 2.7 टक्के अधिक वाढीसह नोंदणी झाली. सध्या मुंबई शेअर बाजारात आरईआयटी 7.27 टक्के म्हणजे 21.80 रुपयांच्या वाढीसह 321.80 रुपयांवर व्यवहार करत आहे. आरईआयटी आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

मुंबई: ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ने (आरईआयटी) भारतात पहिल्यांदाच सादर केलेल्या पब्लिक इश्‍यूची शानदार नोंदणी झाली आहे. "एम्बसी आरईआयटी'ची मुंबई शेअर बाजारात 308 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या इश्यू प्राइसपेक्षा 2.7 टक्के अधिक वाढीसह नोंदणी झाली. सध्या मुंबई शेअर बाजारात आरईआयटी 7.27 टक्के म्हणजे 21.80 रुपयांच्या वाढीसह 321.80 रुपयांवर व्यवहार करत आहे. आरईआयटी आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. इश्यूसाठी संस्थात्मक तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी अनुक्रमे दोन ते अडीचपट तर एचएनआयने (उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती) तीन टक्क्यांपेक्षा जास्त प्रतिसाद नोंदविला होता. 

एम्बसी आरईआयटी ही मुख्यत: ब्लॅकस्टोन ग्रुप आणि एम्बसी प्रॉपर्टी डेव्हेलपर्स प्रा. लि. यांच्याकडून नियंत्रित केला जातो. या आयपीओद्वारे 4,750 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, किमान लॉट साईझ 800 युनिट आणि त्यानंतर 400 युनिटच्या पटीत गुंतवणूक यामुळे कमीतकमी 2 लाख 40 हजार रुपयांची गुंतवणूक करणे अपेक्षित होते.

काय आहे आरईआयटी?
‘आरईआयटी’ हा एक असा गुंतवणुकीचा नवा प्रकार आहे, की ज्यायोगे गुंतवणूकदारांना स्वत-ला प्रत्यक्ष रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक न करावी लागता रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे फायदे मिळू शकतात. सध्यातरी भारतात, भाड्याने किंवा ‘लीज’वर दिलेल्या व्यावसायिक जागेचा समावेश ‘आरईआयटी’मध्ये करण्यात आलेला आहे. अशा जागांमधून, खर्च वजा जाता मिळणाऱ्या उत्पन्नापैकी कमीत कमी 90 टक्के वाटा युनिटहोल्डरना लाभांशाच्या स्वरूपात वाटणे हे ‘सेबी’च्या नियमांनुसार बंधनकारक आहे. तसेच ‘आरईआयटी’ने केलेली 80 टक्के गुंतवणूक ही पूर्ण झालेल्या ‘प्रोजेक्‍ट’मध्ये करणे बंधनकारक आहे. मोठ्या शहरांत ‘ऑफिस स्पेस’साठी चांगली मागणी असल्याने व भाडे सतत वाढत असल्याने गुंतवणूकदारांना सुमारे 7-8 टक्के वार्षिक परतावा मिळणे अपेक्षित आहे.

भविष्य काय? 
भारताचे ‘आयटी’ क्षेत्रातील वाढते महत्त्व लक्षात घेऊन गुगल, मायक्रोसॉफ्ट, जेपी मॉर्गन, वेल्स फार्गो यासारख्या अनेक जागतिक दर्जाच्या ‘फॉर्च्युन 500’ कंपन्यांनी भारतातील मोठ्या शहरात कार्यालये घेतली आहेत. या कंपन्या स्वत: कार्यालये खरेदी न करता ती दीर्घ मुदतीच्या कराराने ‘लीज’वर जागा घेणे पसंत करतात. त्यामुळे अशा ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्या ‘आरईआयटी’ला नियमित व खात्रीशीर उत्पन्न मिळू शकते. परंतु, देशातील रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी आल्यास अथवा ‘ऑफिस स्पेस’ बराच काळ रिकामी पडून राहिल्यास ‘आरईआयटी’च्या उत्पन्नावर व गुंतवणूकदारांच्या परताव्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Embassy Office Parks REIT debuts at Rs 308, a 2.7 pct. premium to issue price