
आर्थिक नियोजन करून घेण्यासाठी तुम्ही जेव्हा 'फायनान्शियल प्लॅनर'कडे जाता तेव्हा तो तुम्हाला अनेक प्रश्न विचारतो. तुमची आर्थिक उद्दिष्टे काय?, त्यासाठी काय तजवीज केली आहे?, आयुर्विमा, आरोग्यविमा आहे का? आणि तुमचा 'इमर्जन्सी फंड' तयार आहे का? तो नसल्यास किंवा अपुरा असल्यास तातडीने पुरेसा फंड तयार करण्याचा सल्ला देण्यात येतो कारण पुरेशा 'इमर्जन्सी फंडाच्या अभावी तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे 'इमर्जन्सी फंड' म्हणजे नक्की काय, त्याची आवश्यकता काय, तो किती असावा, तो कसा निर्माण करावा, कोठे गुंतवावा आणि गुंतवताना कोणकोणते घटक विचारात घ्यावेत हे बघणे हितकारक ठरेल.
'इमर्जन्सी फंड' म्हणजे काय? - आपल्या आयुष्यात येऊ शकणाऱ्या आर्थिक अडचणींना अथवा संकटांना सामोरे जाता यावे म्हणून बाजूला ठेवलेल्या पैशाला 'इमर्जन्सी' अथवा 'कॉन्टिजन्सी' फंड असे म्हणतात.
आवश्यकता का?
हा फंड निर्माण करण्यामागचे उद्दिष्ट असे असते की आपली आर्थिक उद्दिष्टे सुरळीतपणे साध्य व्हावीत. एखाद्या व्यक्तीने आपल्या आर्थिक नियोजनाचा आराखडा बनवून घेतला, सर्व काही सुरळीतपणे चालले असतानाच अचानक नोकरी गेली, प्रदीर्घ आजारपणाला सामोरे जावे लागले, कुटुंबियांच्या आजारपणात मोठा खर्च झाला किंवा कोरोनासारखे जागतिक संकट उद्भवले तर त्या व्यक्तीला/ कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उदा. गृहकर्जाचा, वाहन कर्जाचा, शैक्षणिक कर्जाचे हफ्ते थकल्यास बॅंका तगादा मागे लावतात आणि तुमचा 'क्रेडिट स्कोअर' खराब होऊ शकतो. त्यामुळे भविष्यकाळात नवीन कर्ज मिळणे दुरापास्त होते. विम्याचे हफ्ते न भरल्यास पॉलिसी बंद होऊ शकते. घरभाडे, मुलांच्या शाळा, कॉलेजचे शुल्क, वीजबील तर भरावेच लागते. अशा बिकट प्रसंगी आप्तेष्टांकडे मदत मागण्यापेक्षा स्वत:चा 'इमर्जन्सी फंड' वेळीच तयार करणे केव्हाही श्रेष्ठ असते.
किती असावा?
- तज्ज्ञांच्या मते, तुमच्या अनिवार्य मासिक खर्चाच्या कमीत कमी सहा पट आणि जास्तीत जास्त 24 पट एवढा हा फंड असावा. उदा. एखाद्या कुटुंबाचा अनिवार्य मासिक खर्च 50 हजार रुपये असल्यास त्यांनी रु. तीन लाख ते 12 लाख रुपये 'इमर्जन्सी फंड' तयार करावा.
कसा तयार करावा?
हा फंड तयार करण्यासाठी सातत्य आणि आर्थिक शिस्तीची गरज असते. महिन्याच्या शेवटी उरलेले पैसे या फंडात टाकण्याऐवजी पगार होताच या फंडात प्रथम पैसे टाकावेत आणि शिल्लक पैसे खर्च करावेत. म्युच्युअल फंडांच्या योजनेत 'एसआयपी' केल्याने नियमित बचत होते. शिवाय अचानक झालेला धनलाभ या फंडात जमा करावा. उदा. बोनस, इन्सेन्टिव्ह, वाचविलेल्या रजेचे पैसे किंवा अनावश्यक सेवा बंद करून, काटकसर करून तुम्ही या फंडाला 'टॉप अप' करू शकता.
कोठे गुंतवावा?
हा पैसा आपल्याला संकटकाळी तातडीने उपलब्ध व्हावा यासाठी ज्या गुंतवणुकीत 'लॉक-ईन' किंवा 'एक्झिट लोड' नाही, अशा योजनेत गुंतवावा. उदा. शॉर्ट डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट (ज्यावर कर्ज मिळते किंवा मुदतीआधी मोडता येते.) लिक्विड फंड अथवा सोने.
'इमर्जन्सी फंडा'त गुंतवणूक करताना सुरक्षितता आणि तरलता याला प्राधान्य द्यावे, परतावा थोडा कमी मिळाला तरी चालेल.
'कोरोना'सारखी गंभीर 'इमर्जन्सी' जगापुढे उभी ठाकली असतानाच 'इमर्जन्सी' फंडाचा श्रीगणेशा करुयात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.