वाहन, आरोग्य विम्याच्या नूतनीकरणास मुदतवाढ 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

ज्या ग्राहकांचे विम्याचे "प्रीमियम' 25 मार्च ते 14 एप्रिल या तारखेदरम्यान देय असतील अशांना 21 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - "कोरोना'चा प्रसार रोखण्यासाठी देशात 21 दिवसांसाठी "लॉकडाउन'ची घोषणा करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विमा आणि वाहन विमा यांच्या हप्ता (प्रीमियम) भरण्याच्या मुदतीत वाढ करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी केली. ज्या ग्राहकांचे विम्याचे "प्रीमियम' 25 मार्च ते 14 एप्रिल या तारखेदरम्यान देय असतील अशांना 21 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याचा सुमारे 63 कोटी विमा धारकांना फायदा होणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या निर्णयामुळे या काळात "प्रीमियम' न भरल्यामुळे विमा पॉलिसी रद्द होणार नाही. 

"थर्ड पार्टी' वाहन विम्याच्या आणि आरोग्य विम्याच्या 'प्रीमियम' भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. जरी या काळात ग्राहकाने त्याच्या विम्याचे नूतनीकरण केले नाही तर तो विमा रद्द होणार नाही. 25 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीतील विमा नूतनीकरण देय असलेल्या सर्व विमाधारकांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल, असे सीतारामन यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. लॉकडाउनचा विचार करून सामान्य ग्राहकांचे हित जपण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे अर्थ मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. 

नव्या अधिसूचनेनुसार, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने विमा अधिनियम 1938च्या कलम "64 व्हीबी'मध्ये संशोधन केले आहे. या कलमानुसार, विम्याच्या हप्ता भरल्याशिवाय विमा संरक्षण मिळणार मिळत नाही; मात्र आता सरकारने त्यात बदल केला आहे. यामुळे वाहन मालक आणि आरोग्य विमा संरक्षण लाभार्थ्यांच्या पॉलिसीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. विमा पॉलिसीचा अवधी आणखी 10 दिवसांनी वाढला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extension of vehicle and health insurance renewal due to corona