esakal | फिनटेक : डिजिटल आयडेंटिटी
sakal

बोलून बातमी शोधा

फिनटेक

फिनटेक : डिजिटल आयडेंटिटी

sakal_logo
By
अतुल कहाते

सर्वसामान्य आयुष्यात आपल्याला आपली ओळख पटवून देण्यासंबंधीच्या काही प्रसंगांना तोंड द्यावे लागते. अनेक ठिकाणी आपल्याला आपले पॅन कार्ड, आधार कार्ड यांसारख्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. तसेच कामाच्या ठिकाणी आपल्याला आपले ओळखपत्र दाखवावे लागते. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी इंटरनेटवर सातत्याने आवश्यक असल्यामुळे तिथेही आपल्याला आपली ओळख पटविण्यासाठीची तरतूद करावी लागते. आर्थिक कारणांशी संबंधित असलेल्या गोष्टी तर यात अगदी अग्रक्रमाने येतात. उदाहरणार्थ, आपल्या बॅंकेची खाती, क्रेडिट-डेबिट कार्ड यांसारख्या गोष्टी, अनेक वॉलेटसारख्या तरतुदी अशा सर्वांच्या बाबतींमध्ये आपल्याला आपली ओळख पटवून देणे भाग असते. याला तांत्रिक भाषेत ‘डिजिटल आयडेंटिटी’ असे म्हणतात.

अशा प्रकारच्या ऑनलाइन ओळखीच्या सुविधेमध्ये आपण आपले यूजर आयडी, आपण इंटरनेटवर वापरत असलेल्या माहितीचे इतर प्रकार हे सर्व साठवत असतो. अर्थात आपल्या दृष्टीने ‘डिजिटल आयडेंटिटी’चा हा अर्थ असला तरी आपली माहिती गोळा करीत असलेल्या आणि तिचा वापर करीत असलेल्या कंपन्यांच्या दृष्टीने मात्र याचा अर्थ अधिक व्यापक असतो. त्यांच्या दृष्टीने फक्त आपली मूळ माहितीच महत्त्वाची असते, असे नाही; पण इंटरनेटवर आपण कोणती माहिती शोधतो, आपण तिथे कोणते व्यवहार करतो, यासारख्या सर्व गोष्टींचे सर्व तपशील या कंपन्या साठवून ठेवतात. याचे कारण म्हणजे आपल्याला नेमक्या कोणत्या सोयी उपलब्ध करून द्यायच्या, या माहितीचे नेमके काय करायचे, अशा सर्व गोष्टी त्यांच्या डोक्यात असतात. त्यांच्या दृष्टीने लोकांची ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरते.

कधीकधी ‘डिजिटल आयडेंटिटी’ चोरीला जाण्याची शक्यता असते. म्हणजेच इंटरनेटवर आपल्याऐवजी भलतेच कोणीतरी आपण असल्याचे भासवायला लागते. साहजिकच आपल्या खात्याचे व्यवहार करणे, आपली माहिती चोरणे, आपल्या नावावर भलतेसलते प्रकार करणे, अशा गोष्टी त्या माणसाला जमू शकतात. स्वाभाविकपणे आपण आपली ‘डिजिटल आयडेंटिटी’ नीटपणे सांभाळून ठेवणे गरजेचे असते. मुख्य म्हणजे आपले पासवर्ड, आपली इतर गोपनीय माहिती, आपल्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असलेल्या बाबी हे सर्व आपण कोणाच्या हाती लागू नये, याची नीट काळजी घेणे आवश्यक असते. यातूनच ही माहिती चोरीला जाण्यासंबंधीच्या ‘आयडेंटिटी थेफ्ट’च्या घटना घडत असल्याचे आपण काही चित्रपटांमध्ये बघतो. तिथे याचे काहीसे अतिरंजित रूप दाखविले जात असले, तरी या धोक्याची जाणीव आपण सर्वांनी ठेवायला हवी आणि त्याविषयी सजगता बाळगली पाहिजे.

loading image
go to top