फिनटेकने अधिकारक्षेत्रात काम करावे : आरबीआय गव्हर्नरांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shaktikant Das
फिनटेकने अधिकारक्षेत्रात काम करावे : आरबीआय गव्हर्नरांचा इशारा

फिनटेकने अधिकारक्षेत्रात काम करावे : आरबीआय गव्हर्नरांचा इशारा

मुंबई - डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या फिनटेक कंपन्यांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कठोर इशारा दिला आहे. डिजिटल कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांनी आपल्या अधिकारक्षेत्रात राहून काम केले पाहिजे, केवळ ज्या कार्यासाठी परवाना देण्यात आला आहे, त्यासंबंधित सेवा देणे आवश्यक आहे. शक्तिकांत दास या वेळी बँक ऑफ बडोदाच्या एका कार्यक्रमात संवाद साधत होते.

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, की फिनटेक फर्मने आपल्याला मिळालेल्या परवान्यांतर्गत कामकाज करणे आवश्यक आहे; मात्र ते यापेक्षा अधिक काम करणार असतील तर त्यांना परवानगी घेणे गरजेचे आहे, परंतु परवानगीविना कोणत्याही फिनटेक फर्मने अन्य काही सेवा दिल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.

दास पुढे म्हणाले, की आरबीआय बँक प्रणालीत कोणतीही जोखीम घेण्याची परवानगी देऊ शकत नाही. त्यांनी इशारा दिला, की पुढील काही दिवसांत डिजिटल कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत काही धोरणे आणली जातील. आरबीआय नावीन्यता आणि तंत्रज्ञान याला प्रोत्साहन देऊ इच्छित आहे; मात्र बँकिंग परिसंस्थेला एका नियमांतर्गत सुरू ठेवण्याचा मानस ठेवते. यासंबंधित नियमन बनवण्यासाठी काही कारणांमुळे उशीर होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या परवान्याविना कर्ज उपलब्ध करून दिली जात असल्याबद्दल आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. गव्हर्नर म्हणाले, की आम्ही अनियंत्रित आणि विनापरवाना कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांमुळे चिंतेत आहोत. एवढेच नाही, तर परवाना असलेल्या संस्थादेखील आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील कामकाज करत आहेत. यासंबंधित समस्येवर उपाययोजनेसाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच ही समिती अहवाल सादर करेल.

समितीने दिलेल्या सूचना

आरबीआयने नोव्हेंबरमध्ये स्थापन केलेल्या समितीने डिजिटल कर्ज देणाऱ्या अ‍ॅपवर नियंत्रण आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात नोडल संस्था तयार करण्याचीही सूचना आहे. या संस्थेद्वारे ग्राहकांच्या सुरक्षा निश्चित केल्या जातील. आरबीआयने आपल्या कार्यकारी संचालक जयंत कुमार दास यांच्या नेतृत्वात एका कार्यगटाचेही गठण केले आहे. जे ऑनलाईन कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या प्लॅटफॉर्म आणि अ‍ॅपवर देखरेख ठेवू शकतील.

अ‍ॅपद्वारे बेकायदा कामकाज

आरबीआयनुसार देशात ऑनलाईन कर्ज उपलब्ध करून देणारे जवळपास १,१०० अ‍ॅप उपलब्ध आहेत. ही आकडेवारी १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२२ मध्ये जमा केलेली आहे. यातील जवळपास ६०० अ‍ॅप बेकायदा कामकाज करत आहेत.

जगभरातील चलनांमध्ये चढ-उतार

भारतीय अर्थव्यवस्था जगभरातील अन्य अर्थव्यवस्थांच्या तुलनेत उत्तम स्थितीत असल्याचे मत आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मांडले. रशिया-युक्रेन युद्द आणि कोरोना संसर्गामुळे जगाची स्थिती गंभीर आहे, परंतु भारतीय अर्थव्यवस्थेवर या विपरित परिस्थितींचा नकारात्मक परिणाम त्या तुलनेत कमी आहे. महागाईमुळे जगभरातील चलनांच्या किमतीत चढ-उतार होत आहेत; मात्र त्या तुलनेत भारतीय रुपया चांगल्या स्थितीत आहे. आरबीआयने रुपयाचा कोणताही विशेष स्तर निश्चित केलेला नाही. रुपयाची किंमत लक्षात घेऊन जेथे कमतरता निर्माण होईल तेथे त्या तुलनेत बाजारात आरबीआय डॉलरचा पुरवठा करेल.

टॅग्स :rbiGovernorfintech