esakal | फिनटेक : ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’चा वापर
sakal

बोलून बातमी शोधा

फिनटेक : ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’चा वापर

फिनटेक : ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’चा वापर

sakal_logo
By
अतुल कहाते

‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’ची संकल्पना असंख्य ठिकाणी वापरली जाऊ शकते. जिथे जिथे आपल्याला एखादी गोष्ट घडल्यावर आपोआपच दुसरी एखादी गोष्ट घडणे अपेक्षित असते, अशा प्रत्येक ठिकाणी आपण ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’चा विचार करू शकतो. खास करून ज्या ठिकाणी वादविवाद निर्माण होणे, आपल्यावरची जबाबदारी झटकून टाकणे, वेळकाढूपणा करणे अशा प्रकारच्या तंत्रांचा वापर करून एखादी कंपनी किंवा संस्था जर समोरच्याची फसवणूक करण्याची शक्यता असेल, अशा वेळी तर ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’ हे वरदानच ठरू शकते.

उदाहरणार्थ, समजा एखाद्या माणसाने आपले घर भाड्याने द्यायचे ठरवले आहे. अशा वेळी घरमालक आणि भाडेकरू यांच्यामधील करार ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’च्या रूपाने करता येऊ शकतो. त्यामधील तरतुदी आपला विश्वास बसणार नाही अशा असू शकतात. जर्मनीमध्ये प्रायोगिक तत्त्वांवर याची अंमलबजावणी सुरू झालेली असल्यामुळे त्याची एक झलक आपण बघू शकतो. त्यानुसार घराला लावलेले कुलूप हे आपले नेहमीचे कुलूप नसून, एका ‘पासवर्ड’च्या किंवा ‘पिन’च्या रूपात असते. म्हणजेच हा ‘पासवर्ड’ भरला तरच घराचे दार उघडणार, अशी ही तरतूद असते. दर महिन्याच्या एक तारखेला हा ‘पासवर्ड’ आपोआप बदलतो.

भाडेकरूने घरमालकाच्या खात्यामध्ये त्या महिन्याचे आगाऊ घरभाडे जमा करताच हा ‘पासवर्ड’ भाडेकरूच्या मोबाइलवर पाठवला जातो. म्हणजेच जर भाडेकरूने वेळेत भाडे भरले नाही तर घरमालकाला त्या भाड्याची वसुली करण्यासाठी भाडेकरूला साधा फोन करणे किंवा एखादा लघुसंदेश पाठवणे असे काहीही करावे लागत नाही. ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’मध्येच यासाठीची तरतूद करून ठेवलेली असल्यामुळे भाडेकरूला घरात प्रवेश मिळणे बंद होऊन जाते. स्वाभाविकपणे घरमालकाची फसवणूक होण्याची शक्यता मावळते. याचे पुढचे पाऊल म्हणजे फ्रीझ, ओव्हन, दिवे, हीटर, वातानुकूल यंत्रणा, टीव्ही या सर्वांनाही ‘पासवर्ड’ टाकला जाऊ शकतो आणि जोपर्यंत घराचे भाडे भरले जात नाही, तोपर्यंत त्यांचा वापर थांबवला जाऊ शकतो.

तरीही हे साधे उदाहरण झाले. अनेक क्लिष्ट आणि गंभीर स्वरूपाच्या करारांमध्ये ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’चा वापर करून फसवणूक किंवा दिशाभूल टाळता येते. अर्थातच यासाठी नेमके काय झाल्यावर काय केले पाहिजे यासाठीची स्पष्टता संबंधित ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’च्या ‘प्रोग्रॅम’मध्ये असावी लागते; अन्यथा पळवाटा, शाब्दिक खेळ यांचा वापर न्यायालयांमध्ये जसा होतो, तसा येथेही होऊ शकतो. हळूहळू याविषयीची जागरुकता वाढत जाईल, तशी ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’ची संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाईल, असे मानले जाते.

loading image
go to top