पहिल्या चार महिन्यात देशाची वित्तीय तूट 5.47 लाख कोटींवर!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 August 2019

देशाची वित्तीय तूट जुलैअखेर 5.47 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. 2019-20 च्या अर्थसंकल्पात मांडण्यात आलेल्या वित्तीय तूटीच्या वर्षभराच्या उद्दिष्टाच्या 77.8 टक्क्यांवर पहिल्या चार महिन्यातच पोचली आहे.

पुणे : देशाची वित्तीय तूट जुलैअखेर 5.47 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. 2019-20 च्या अर्थसंकल्पात मांडण्यात आलेल्या वित्तीय तूटीच्या वर्षभराच्या उद्दिष्टाच्या 77.8 टक्क्यांवर पहिल्या चार महिन्यातच पोचली आहे. वित्तीय तूट म्हणजे सरकारचा खर्च आणि महसूल यातील फरक. कन्ट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्सने (सीजीए) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे.

2018-19 या आर्थिक वर्षात याच कालावधीत वित्तीय तूट 86.5 टक्क्यांवर होती. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने वित्तीय तूटीचे उद्दिष्ट 7.03 लाख कोटी रुपये ठेवले आहे. मागील आर्थिक वर्षाप्रमाणेच चालू आर्थिक वर्षातसुद्धा वित्तीय तूट जीडीपीच्या 3.4 टक्केच ठेवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. एप्रिल ते जुलै 2019 या कालावधीत सरकारचे महसूली उत्पन्न मागील आर्थिक वर्षाप्रमाणेच अर्थसंकल्पाच्या 19.5 टक्के इतके आहे.

जुलैअखेर सरकारने 3.82 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. संपूर्ण वर्षभरात 19.62 लाख कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. सरकारचा भांडवली खर्च अर्थसंकल्पाच्या 31.8 टक्के इतका आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीत एकूण खर्च 9.47 लाख कोटी रुपये झाला आहे.

मार्च 2020 अखेर एकूण खर्च 27.86 लाख कोटी रुपये अपेक्षित आहे. दरमहिन्याच्या वित्तीय तूटीचे आकडे हे वर्षभराच्या वित्तीय तूटीचे सूचक असतातच असे नव्हे, असे मत सीजीएने व्यक्त केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the first four months the country fiscal deficit stands at 5 point 47 lakh crores