मदतीच्या प्रतीक्षेतील पूरग्रस्त शाळा

डॉ. सतीश देसाई
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

पुराचा तडाखा बसलेल्या केरळच्या मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने निधी संकलन करण्यात आल्यानंतर पूरग्रस्तांना नेमक्‍या कोणत्या मदतीची गरज आहे, याची पाहणी फंडाच्या सदस्यांनी नुकतीच केली. या पाहणी दौऱ्याविषयी...

पुराचा तडाखा बसलेल्या केरळच्या मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने निधी संकलन करण्यात आल्यानंतर पूरग्रस्तांना नेमक्‍या कोणत्या मदतीची गरज आहे, याची पाहणी फंडाच्या सदस्यांनी नुकतीच केली. या पाहणी दौऱ्याविषयी...

सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने वालचंद संचेती यांच्यासह केरळला पाहणी करण्यासाठी मी गेलो होतो. केरळमध्ये प्रचंड पाऊस झाला आणि राज्याच्या अनेक भागांचे अतोनात नुकसान झाले. यानिमित्त ‘सकाळ’ने केरळसाठी ‘आपद्‌ग्रस्त साह्य निधी’ उभा केला. नेमके कोणाचे नुकसान झाले आहे, कोणाला मदत केली पाहिजे आणि ती कोणत्या स्वरूपात आणि किती, याचा अंदाज घेण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे आवश्‍यक होते. त्यासाठीच हा दौरा होता.  

कोची जिल्ह्यात अनेक शाळांची पडझड झाली आहे. अनेक मुलांना शाळेपर्यंत पोचता येत नाही, अनेक ठिकाणी बसण्याची व्यवस्था नाही. अशा अनेक लोकांच्या तक्रारी प्रत्यक्ष आणि लेखी स्वरूपात कानावर आल्या होत्या. कोचीपासून जवळपास १०० किलोमीटर आत थिरूवनवनदूर या दुर्गम खेड्यामध्ये आम्ही पोचलो, तेव्हा लक्षात आले, की तेथून शाळा, काईनकारी खेड्यातल्या कुटमंगलम या अंदाजे काही हजार लोकवस्ती असलेल्या गावात आपल्याला जायचे आहे, ते ठिकाण आणखी काही किलोमीटर आत आहे. तेथे जाण्यासाठी कालवा असल्यामुळे छोट्या होडीतून जावे लागते. येथे एका शाळेत जायचे होते. आम्हाला घ्यायला अरुणा सुब्रह्मण्यम, लता सुब्रह्मण्यम आणि व्ही. पुरुषोत्तमन हे तेथील सामाजिक कार्यकर्ते आले होते. जवळपास दोन किलोमीटर आत असलेल्या शाळेमध्ये आम्ही बोटीतून निघालो तेव्हा आजूबाजूला सर्व जलपर्णीने कालवा भरलेला होता. दोन्ही बाजूंना छोट्या घरांची वस्ती होती आणि बहुतेकांकडे स्वत:चे वाहन म्हणून होड्या होत्या. जवळपास अर्धा तास होडीतून आम्ही प्रवास केला होता. रोज शाळेत होडीतून येणाऱ्या मुलांची संख्या शंभराच्या जवळपास होती आणि त्यांना आपल्याकडे जसे बसला पास असतात तसे पासची व्यवस्था केली होती. शाळा सगळ्या बैठ्या होत्या. रोज साधारण ३० ते ३५ शिक्षक होडीने प्रवास करत होते. तीच त्यांची स्कूलबस होती. शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या जुन्या बैठ्या वास्तूमध्ये त्या शाळा भरत होत्या. जवळपास सहा फुटांपर्यंत २५ दिवस त्या शाळेमध्ये पाणी साठले होते. स्वाभाविकच तसेच कचऱ्याचे खूप ढीग पडले होते. तसेच भिजून ओल्याचिंब झालेल्या पुस्तकांचे गठ्ठेच्या गठ्ठे पडले होते. मुला-मुलींची असलेली स्वच्छतागृहेसुद्धा अतिशय खराब अवस्थेत होती. त्याही परिस्थितीत वेगवेगळ्या वर्गामध्ये आम्ही गेलो तेव्हा त्या सर्व मुलांनी आमचे स्वागत तर केलेच; पण त्याबरोबर त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यामुळे शिक्षणाला येणारी बाधा, तुटलेली बाके, बिघडलेले कॉम्प्युटर, भिंतीला अजून ओल असल्यामुळे येणारा कुबट वास हे सगळे त्या ठिकाणची दुर्दशा दाखवत होते. त्याही परिस्थितीत शाळेचे पदाधिकारी, शिक्षक आणि त्या भागातील लोकांनी केलेल्या छोट्या-मोठ्या मदतीमुळे परिस्थिती थोडीफार सुसह्य झाली. आम्ही ‘सकाळ’ या ख्यातनाम वृत्तपत्राकडून काही मदत करता येईल काय, हे पाहण्यासाठी आलो आहोत, हे सांगितल्यानंतर, त्या लोकांना फारच बरे वाटले. विशेषत: त्या मुलांनी एकसुरात ‘होय, तुम्ही आम्हाला मदत करा’ अशी विनंती केली. 

सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने याआधी ‘आपलं घर’ ही नळदुर्ग येथील शाळा, त्सुनामीनंतर अंदमान-निकोबार येथे केलेली मदत, काश्‍मीरमध्ये पाच रुग्णवाहिका देण्याचा उपक्रम, कोयना भूकंपानंतर केलेली मदत, राज्यात अनेक ठिकाणी शेततळी तयार करण्याचा कार्यक्रम अशी कामे अनेक ठिकाणी ‘सकाळ’ने प्रत्यक्ष जाऊन केली आहे. त्यामुळे लोकांना, शेतकऱ्यांना, मुलांना, महिलांना पुन्हा एकदा उभारी मिळाली. ही सर्व मदत सर्वसामान्य महाराष्ट्रातील व्यक्तींनी, संस्थांनी केलेली असते आणि म्हणूनच प्रत्येक वेळेला कितीही अडचणी आल्या, कितीही दूर जावे लागले, तरी प्रत्यक्ष जागेवर परिस्थिती पाहिल्याशिवाय निर्णय घेता येत नाही. केरळमध्ये झालेल्या नैसर्गिक संकटांमुळे ज्यांना मदत करता येईल, अशा संस्थांची, शाळांची प्रत्यक्ष जाऊन म्हणून पाहणी करणे आवश्‍यक ठरले आणि लक्षात आले की, मदतीची किती गरज आहे ती. ‘सकाळ’ आणि सकाळ रिलीफ फंड अशा तऱ्हेचे काम गेले कित्येक दशके करत आहे.

Web Title: Flood Affected School Help Sakal Relief Fund