नीरव मोदीच्या जामिनावर थोड्याच वेळात होणार फैसला 

वृत्तसंस्था
Friday, 29 March 2019

पीएनबी गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी नीरव मोदीबाबत आज लंडनच्या वेस्टमिस्टर न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे.

लंडन: पीएनबी गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी नीरव मोदीबाबत आज लंडनच्या वेस्टमिस्टर न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान आणखी काही महत्वाचे दस्तावेज आणि पुरावे सादर करण्यासाठी सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि सीबीआयचे संयुक्त पथक लंडनमध्ये दाखल झाले आहे. नीरव मोदीचे वकील त्याच्या जामिनासाठी न्यायालयात आपली बाजू मांडणार आहे. तर दुसरीकडे ईडी आणि सीबीआय त्याला जामीन मिळू नये तसेच भारताकडे सोपवण्यात यावे यासाठी आपली बाजू मांडणार आहेत. लंडनच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार आज सकाळी 11 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे.

लंडनमधील मेट्रो बँकेत खाते उघडण्यासाठी गेलेल्या नीरव मोदीला बँक कर्मचाऱ्याने ओळखल्याने त्याला 20 मार्च रोजी लंडनमध्ये अटक झाली होती.  अटकेनंतर नीरव मोदीने लंडन येथील वेस्टमिन्स्टर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तसेच कर भरल्याचे आणि प्रवासाचे कागदपत्रही सादर केले होते. परंतु जिल्हा न्यायाधीश मॅरी मॅलान यांनी जामीन अर्ज नामंजूर करत 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तेव्हापासून तो दक्षिण-पश्चिम लंडनमधील वैंड्सवर्थ तुरुंगात कैद आहे.

विशेष म्हणजे, वेस्टमिस्टर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एमा आर्बथनॉट यांच्या न्यायालयात आज नीरव मोदीच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. याच न्यायाधीशांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मद्यसम्राट विजय मल्याला भारतात प्रत्यार्पणाचा आदेश दिला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fresh evidence against Nirav Modi to be submitted in UK court in few hours