गरज बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंडाची!

गणेश झरकर
Monday, 1 February 2021

आज नव्याने गुंतवणूक सुरू करण्याऱ्यांसाठी ही अस्थिरता खूपच आव्हानात्मक ठरते.आजवर असे सर्वच गुंतवणूकदार, जे पारंपारिक गुंतवणूक पर्यायातील सुरक्षिततेचा अनुभव घेत आलेले आहेत.

गुंतवणुकीचा विचार केला जातो, तेव्हा शेअर, सोने, जमीन किंवा अन्य कोणतीही गुंतवणूक असो, त्यातील कामगिरी एका सरळ रेषेत कधीही राहात नाही. विशेषत: गुंतवणूक शेअरमधील असल्यास ही अस्थिरता अधिकच ठळकपणे दिसून येते. म्हणूनच आज नव्याने गुंतवणूक सुरू करण्याऱ्यांसाठी ही अस्थिरता खूपच आव्हानात्मक ठरते.आजवर असे सर्वच गुंतवणूकदार, जे पारंपारिक गुंतवणूक पर्यायातील सुरक्षिततेचा अनुभव घेत आलेले आहेत, त्यांना जवळपास दररोज चालणारी बाजारातील अस्थिरता ही असह्यच ठरते. परंतु, नव्या गुंतवणूकदारांचे शेअर बाजाराच्या अस्थिरतेतून मार्गक्रमण होणार तरी कसे? हीच कोंडी सोडविण्याचे साधन म्हणून म्युच्युअल फंड कंपन्यांनी ‘बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड’ हा गुंतवणूक प्रकार सुरू केलेला आहे.

फंडाचे वेगळेपण काय?
म्युच्युअल फंडामधील हा प्रकार गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीला इक्विटी (शेअर) आणि डेट (रोखे) या दोन्हींमधे विभागण्याची संधी एकाच योजनेच्या माध्यमातून देतो. अशी विभागलेली गुंतवणूक ही तुमच्या पोर्टफोलिओला स्थिरता मिळवून देते. इतकेच नव्हे, तर घेतलेल्या जोखमीसाठी सर्वोत्तम परतावा मिळविण्यासही मदत करते.

आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन

स्वयं-संतुलन यंत्रणा
शेअर अथवा रोखे यांपैकी कोणत्याही एका मालमत्ता वर्गाने (ॲसेट क्लास) घेतलेली लक्षणीय उसळी अथवा घसरगुंडी ही संपूर्ण मालमत्ता वर्गाचे मूल्यांकन बदलवणारी ठरते. त्यामुळे मालमत्ता वर्गाचे फेरमूल्यांकन आवश्यक ठरते. या प्रकारच्या योजनांमध्ये फेरमूल्यांकन पार पाडण्यासाठी विविध मूल्यांकन मानदंडांचा वापर केला जातो. जसे, की किंमत-पुस्तकीमुल्य गुणोत्तर (पी/बीव्ही), किंमत-उत्पन्न गुणोत्तर (पी/ई) आणि लाभांश परतावा आदी.

बाजाराच्यादृष्टीने उपयुक्तता
शेअर बाजाराने सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर बाजारात मोठी अस्थिरता येऊ शकते, तेव्हा या प्रकारच्या योजनांची उपयुक्तता अधिकच अधोरेखित होते. या योजनांमधील गुंतवणुकीतून सुयोग्य मालमत्ता वर्गात विभाजन होत राहण्याची खात्री केली जाते, परिणामी बाजार घसरण्याचा फटका सौम्य राखला जातो. त्यामुळे या प्रकारच्या योजनांमध्ये एकरकमी गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोणासाठी सर्वाधिक अनुकूल?
या योजना कमी-अधिक जोखीम घेणाऱ्या सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी अनुकूल ठरतात. कमालीची अस्थिरता पाहून, शेअर बाजारापासून चार हात दूर राहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. या प्रकारची योजना गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील अस्थिरतेपासून वाचविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून त्यांच्या पोर्टफोलिओला आवश्यक ती स्थिरता देतात. या प्रकारच्या योजना बऱ्याच म्युच्युअल फंड कंपन्यांनी बाजारात आणलेल्या आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

(डिस्क्लेमर - म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. यासंदर्भात तज्ज्ञ आणि अनुभवी सल्लागाराची मदत घेणे हिताचे ठरते.)

(लेखक ‘ॲसेट सिंथेसिस’चे संचालक आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh zarkar writes article about Balanced Advantage Fund